विराट कोहली आणि अनिल कुंबळे वादाच्या “आतल्या गोष्टी”!

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील वाद बऱ्याच दिवसांपासून धुमसत होता. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर तो स्फोट व्हावा, तसा बाहेर आला. 

पण या दोघांमध्ये नेमंक कधी आणि काय झालं, वाचा ‘सविस्तर’ रिपोर्ट-

– विरोधाभास वाद झाकू शकला नाही-

कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा वाद नेमका केव्हा आणि कशावरुन सुरु झाला हे सांगणं अवघड आहे. मात्र वेळोवेळी एकमेकांना विरोध केल्याने तो वाढत गेला. पत्रकारांनी याबाबत विराट एकदा टोकलं असता त्यानं ही एक अफवा असल्याचं उत्तर दिलं. मात्र वेळोवेळी दिसणारा विरोधाभास त्यांच्यातील वाद झाकू शकला नाही.

 

– फक्त ८ चेंडूंपुरता प्रशिक्षक- 

अनिल कुंबळे विराटसाठी फक्त ८ चेंडूंचा प्रशिक्षक ठरला. टोकाच्या वादामुळे दोघंही एकमेकांची तोंडं पाहणं पसंत करत नव्हते. त्यामुळे सरावाला कुंबळेने विराटला शिकवणं लांबच राहिलं. कोहली आणि कुंबळेच्या बातम्या माध्यमांमधून अधून मधून येतच होत्या. मात्र सरावातून हे गुपित उघडं होऊ नये यासाठी चक्क मीडियालाच सराव कव्हर करण्यापासून डावलण्यात आलं. मात्र हा फुगा फुटू नये यासाठी एक दिवस सराव घेऊन मीडियाला काही वेळासाठी प्रवेश देण्यात आला. यावेळी कुंबळेने कोहलीला मोजून ८ चेंडू टाकले. तेवढाच सरावात त्यांचा एकमेकांशी आलेला संबंध

– कोहलीनं कुंबळेला श्रेय देणं टाळलं-

उपांत्या सामन्यात बांगलादेशचा धुव्वा उडवल्यानंतर माध्यमांनी कोहलीला संघातील सपोर्टिंग स्टाफबद्दल विचारलं. यावेळी कोहलीनं बॅटिंग कोच संजय बांगरपासून ट्रेनिंग असिस्टंट राघवेंद्र पर्यंत सगळ्यांना श्रेय दिलं. मात्र यावेळी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेसाठी त्याने चकार शब्द काढला नाही.

– कुंबळे आणि कोहलीत असं का घडलं?-

सुरुवातीला तर विराट कोहली आणि अनिल कुंबळेमध्ये सर्व काही व्यवस्थित सुरु होतं. मग मध्येच असं काय घडलं ज्यामुळे दोघात बिनसलं? याला अनिल कुंबळेची शिस्त कारणीभूत असल्याचं सांगितलं जातंय. एखादा खेळाडू दुखापतीनंतर संघात परतला तर त्याला फक्त फिटनेस टेस्टच नाही तर मॅच फिटनेस सुद्धा सिद्ध करावा लागेल, असं अनिल कुंबळेचं धोरण असायचं. 

– हा वाद बाहेर कसा आला?-

प्रशिक्षक अनिल कुंबळेचा हा खाक्या विराट कोहलीला पसंत नव्हता. नाराज झालेल्या कोहलीनं बीसीसीआयमधील आपल्या जवळच्या अधिकाऱ्याला मेसेज पाठवला. तो असा होता,”तो फारच घमेंडी आहे.” हा प्रकार बाहेर यायला विराटच कारणीभूत होता असं नाही. माध्यमातील काही लोक सांगतात, की अनिल कुंबळेने माध्यमातील काही जवळच्या लोकांचा ग्रुप बनवला होता. त्यांच्यासोबत तो आतल्या सर्व गोष्टी शेअर करत होता.

 

– कोहलीनं कुंबळेला प्रशिक्षक म्हणून नाकारलं-

भारतीय संघाचा प्रशिक्षक ठरवण्याचं काम क्रिकेट सल्लागार समिती करते. या समितीमध्ये सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्ही. व्ही. एस लक्ष्मण या माजी खेळाडूंचा समावेश आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर अनिल कुंबळेची कारकीर्द संपत होती. मात्र क्रिकेट सल्लागार समितीने अनिल कुंबळेची मुदत वाढवण्यास मान्यता दिली. या निर्णयाला विराट कोहलीनं तीव्र विरोध केला.

– रवी शास्त्रींसाठी कोहलीचा आटापिटा-

अनिल कुंबळेच्या राजीनाम्यानंतर असं बोललं जातंय, की विराट कोहलीला प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री हवे होते म्हणून त्यानं हा सारा आटापिटा केला. कुंबळेची शिस्त कोहलीच्या पचनी पडली नाही, त्यापेक्षा रवी शास्त्रींसोबत कोहलीचं चांगलं पटतं. म्हणून कुंबळेनंतर त्यांनाच प्रशिक्षक करावं, अशी मागणीही कोहलीनं केलीय.

– तर सचिन, गांगुली आणि लक्ष्मण यांची काय गरज?-

क्रिकेट सल्लागार समिती प्रशिक्षक ठरवते, अर्थात त्यात कर्णधाराचं मत विचारात घेतलं जातं. मात्र  त्याला फारशी किंमत दिली जात नाही. मात्र कोहलीने या समितीचा निर्णय धुडकावून लावत कुंबळे प्रशिक्षक म्हणून नकोत असा आग्रह धरला. हा प्रकार समोर आल्यानंतर कर्णधार स्वतःच प्रशिक्षक निवडणार असेल तर सचिन, गांगुली आणि लक्ष्मण यांची काय गरज?, असा सवाल लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनी विचारलाय. त्यामुळे अनेकांचा वेळ वाचेल असा टोलाही त्यांनी लगावलाय.

– बॅटिंग घ्यायची ठरलं असताना कोहलीनं बॉलिंग का घेतली?-

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकल्यास पहिल्यांदा बॅटिंग घ्यायचा निर्णय भारतीय संघानं घेतला होता. प्रत्यक्षात टॉस जिंकल्यानंतर कोहलीने बॉलिंग घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये काय परिस्थिती असेल ही सांगण्याची आवश्यक्ता नाही. मात्र ड्रेसिंग रुममध्ये परतलेल्या विराटला कुंबळेनं याबाबत जेव्हा विचारणा केली तेव्हा त्यांनी चक्क उडवाउडवीची उत्तरं दिली. या प्रकारामुळे कुंबळे जबरदस्त संतापला होता. अखेर याच निर्णयानं भारताचा घात झाला आणि पाकिस्तानचं डोंगराएवढं आव्हान न झेपल्यानं भारताचा पराभव झाला. 

– पराभवानंतरचं ‘ते’ हसणं-खिदळणं आणि कुंबळेचा राग-

पाकिस्तानकडून मानहानीकारक पराभव झाल्यानंतर एकाही खेळाडूच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेश नव्हता. त्यातच पारितोषिक वितरण समारंभात कोहली आणि टीमने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हास्यविनोद करण्यात वेळ घालवला. माध्यमांनी हे सगळं खिलाडूवृत्तीने घेतलं असलं तरी अनिल कुंबळेला या गोष्टीचा खूपचा राग आला होता. त्यानं त्यावरुन ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंना सुनावलंही होतं.

अशा प्रकारे कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या वादाला कंगोरे आहेत. मात्र हा वाद भारतीय संघाच्या कामगिरीवर वाईट परिणाम करणारा ठरला. कुणाची मस्ती नडली, कुणाची घमेंड नडली? हे हा वादाचा विषय आहे. मात्र प्रबळ दावेदार असूनही नवघ्या पाकिस्तानकडून भारताला लाचार पराभव पत्करावा लागला हे शल्य आहे. ते पुढे कित्येक दिवस बोचत राहील. एवढ्या मोठ्या महाभारतातून भारतीय क्रिकेट संघानं नक्कीच योग्य ती शिकवण घ्यायला हवी.

तुम्हाला सविस्तर विश्लेषण आवडलं असेल तर खालील शेअर बटणांवर क्लिक करुन फेसबुक किंवा व्हॉट्सअॅपवर नक्की शेअर करा…