#MeeToo ट्रेंड जितका चालेल, तितका तुमच्या-आमच्यासाठी लाजीरवाणा असेल…

#MeeToo

सध्या फेसबुक आणि ट्विटरवर #MeeToo हा ट्रेण्ड चांगलाच गाजतोय. जगभरातील तरूणी #MeeToo असा हॅशटॅग वापरून व्यक्त होताना दिसत आहेत. जगभरात साधारणपणे 10 पैकी 7 तरूणी या लैंगिक शोषणाच्या बळी ठरत असतात. दर दिवसाला लैंगिक शोषणाचे असंख्य प्रकार घडतात. पण त्यातले निम्म्याहून अधिक प्रकार समोर येत नाहीत. कोणी भीतीपोटी ते सांगत नाहीत तर कोणी समाजात होणारी बदनामी टाळण्यासाठी पुढे येत नाही.  पण या ट्रेण्डमुळे जगभरातील तरूणी आपल्यावरच्या अन्यायाबद्दल बोलू लागल्या आहेत.

प्रत्येक मुलगी आपल्या आयुष्यात किमान एकदा तरी छेडछाडीला किंवा लैंगिक शोषणाला बळी पडलेली असते. पण याबद्दल उघडपणे बोलणाऱ्या फार कमी मुली आढळतात.  #MeeToo या ट्रेण्डमुळे जगभरातील तरूणी आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल बोलू लागल्यात, यामुळे त्यांच्यावरील अन्यायाला किमान वाचा फुटल्याचं दिसून येतंय.

#MeeToo ट्रेण्ड कसा सुरु झाला?

ऑस्कर विजेते निर्माते हार्वे वाइनश्टीन यांच्यावर 20 पेक्षा जास्त जणींनी शारीरिक आणि लैंगिक शोषणाचा आरोप केला. त्यानंतर या लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या एलिसा मिलानो या अभिनेत्रीने त्याबद्दल सोशल मीडियावर भाष्य केलं. माझ्यासोबतही असं घडलंय असं सांगताना तिनं #MeeToo असा हॅशटॅग वापरला. बघता बघता जगभरात हे ट्विट चांगलंच व्हायरल झालं. अनेकजणी आपल्यासोबत घडलेल्या लैंगिक शोषणाबद्दल बोलू लागल्या. सोशल मीडियावर आपल्या फ्रेण्डलिस्टपैकी किमान 80 टक्के स्त्रिया हा हॅशटॅग वापरताना दिसतात. त्यामुळे हा ट्रेण्ड जगभरात  हीट ठरत असला तरीही तो तितकाच चिंताजनक म्हणावा लागेल.

#MeeToo बद्दल आणखी सांगण्यासारखं-

आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर शारीरिक आणि लैंगिक शोषण झालेल्या महिलांनी जर #MeeToo लिहून स्टेटस शेअर केलं, तर कदाचित स्त्रियांच्या शोषणाचा प्रश्न किती गंभीर आहे हे लोकांच्या लक्षात येईल, असं ट्विट अभिनेत्री एलिसा मिलानेने केलं. त्यानंतर काही वेळातच जगभरातील तरूणी त्यावर व्यक्त होऊ लागल्या. या ट्विटनंतर प्रत्येक वयोगटातील स्त्रिया आपल्या आयुष्यातील ‘तो किस्सा’ मांडू लागल्या. #MeeToo ट्विट स्त्रीया कोणत्याही एका वयोगटातील नाहीत. तरुणींपासून वृद्धांपर्यंत अनेक महिला या विषयावर व्यक्त होत आहेत.

भारतातही हा ट्रेण्ड बघता बघता चांगलाच व्हायरल झाला. या ट्रेण्डमुळे आपल्यावरच्या अन्यायावर हक्काने बोलण्यासाठी, आपली बाजू मांडण्यासाठी व्यासपीठ मिळाल्याची भावना या स्त्रियांमध्ये दिसून येतीय. देश तितक्या विविधत जगाच्या पाठीवर आहेत, मात्र स्त्रियांच्या शोषणाचा प्रश्न मात्र सगळीकडे सारखाच आहे. मग ती अमेरिका असो वा भारत किंवा पाकिस्तान. कुठे कमी तर कुठे जास्त. कुठे छुपे तर कुठे उघड-उघड महिलांचं शारीरिक आणि लैंगिक शोषण होताना दिसतं.

हार्वे वाइनश्टीन या निर्मात्यासारखी वृत्ती कोणत्याही देशात, कोणत्याही ठिकाणी सर्रास आढळते. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक स्त्रीला कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर अशा अनुभवाचा सामना करावा लागल्याचं आता समोर येतंय. चिमुकल्या कळ्यांपासून ते अगदी 70 वर्षांच्या आजीबाईंपर्यंत सगळेच ‘वासना’ नावाच्या विकृतीला बळी पडलेत. जगभरातला गुन्ह्यांबाबतचा हा कॉमन ‘ट्रेण्ड’ खूप भीषण आणि भितीदायक आहे, याची प्रचिती #MeeToo या ट्रेण्डमुळे येतेय. परंतु हा ट्रेण्ड सोशल मीडियावर जितका व्हायरल होईल, तितकाच तुमच्या-आमच्यासाठी लाजीरवाणा असेल…

 -प्रणिता मारणे