संभाजी उर्फ मनोहर भिडे यांचं नेमकं शिक्षण काय?

कट्टपाने बाहुबली को क्यों मारा? या प्रश्नानं गेल्या वर्षी सोशल मीडियात चांगलाच धुमाकूळ घातला होता. बाहुबली आला आणि गेला मात्र या प्रश्नाचं उत्तर आणि त्याच्यावरुन भारतातील वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं. या प्रश्नाची आठवण येण्याची कारण असं, की याच धर्तीचा प्रश्न सध्या उभ्या महाराष्ट्राला पडला आहे. तो प्रश्न म्हणजे “संभाजी भिडे यांचं नक्की शिक्षण काय?” 

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यासह संभाजी भिडे यांच्यावर गुन्हे नोंदवले गेले आणि दोघे प्रकाशझोतात आले. संभाजी भिडे यांच्यावर मीरज दंगलीमध्येही आरोप झाले होते. आता कोरेगावच्या रुपानं आणखी तशाच प्रकारचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला.

हे सगळं घडत असताना “संभाजी भिडे म्हणजे कोण?” अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले/करण्यात आले. काही मेसेजेसमध्ये संभाजी भिडे यांचं गुणगाण करण्यात येत होतं, तर काही मेसेजेसमध्ये त्याच्या उलट माहिती सांगितली जात होती. या सगळ्यामध्ये त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न समोर आला. कारण प्रत्येक मेसेजमध्ये त्यांच्या शिक्षणाविषयी वेगवेगळे दावे करण्यात आलेले होते. 

प्रत्येक मेसेजमध्ये संभाजी भिडे यांच्या शिक्षणाविषयी वेगवेगळे दावे करण्यात आल्यामुळे समाजातील एका गटासाठी हा चेष्टेचा विषय ठरला, त्यावरुन संभाजी भिडे यांना लक्ष्यही करण्यात आलं. त्यातील निवडक ट्विट खाली देत आहोत…

ज्या शिक्षणावरुन त्यांची खिल्ली उडवली जात होती. त्याचेही काही ट्विट संभाजी भिडे यांच्या समर्थकांनी केले होते, मात्र त्याला कोणताही पुरावा नव्हता.

या सगळ्या गोंधळात भर म्हणजे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी संभाजी भिडे यांच्या शिक्षणाविषयी नवीच माहिती दिली. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भिडे यांनी गणितात पीएचडी केल्याचं सांगितलं. अर्थात त्याला कुठला आधार होता हे उदयनराजे यांनाच माहिती, मात्र ही माहिती ‘संभाजी भिडे यांचं नेमकं शिक्षण काय?’ शोधणारांच्या गोंधळात भर घालणारी होती.

संभाजी भिडे यांचं शिक्षण नेमकं काय? याचा शोध घेण्यासाठी आम्ही जेव्हा त्यांची संघटना असलेल्या श्रीशिवप्रतिष्ठान संघटनेची वेबसाईट पाहिली, तेव्हा तिथे मात्र त्यांच्या शिक्षणाचा स्पष्ट उल्लेख आढळून आला. संभाजी भिडे रसायन शास्त्रात सुवर्णपदक विजेते असल्याचं याठिकाणी लिहिण्यात आलं आहे. ही नवीनच माहिती होती. मात्र कुठून? केव्हा? याबाबत काहीही तपशील याठिकाणी देण्यात आलेला नाही. अर्थात तो द्यायचा की नाही हा शिवप्रतिष्ठान किंवा भिडे गुरुजी यांचा खासगी विषय आहे. मात्र त्यामुळे या माहितीवर कितपत विश्वास ठेवायचा हा देखील प्रश्नच आहे.

 

शिवप्रतिष्ठानच्या वेबसाईटचा स्क्रीनशॉट

कट्टपाने बाहुबलीला का मारलं? या प्रश्नाचं उत्तर जरी लोकांना मिळालं असलं, तरी संभाजी भिडे यांचं शिक्षण काय? या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांना अद्याप मिळालेलं नाही. काही लोक फॉरवर्डेड मेसेजेसवर विश्वास ठेवण्यात समाधान मानत आहेत. तर काहीजण हे मेसेजेस जसेच्या तसे फॉरवर्ड करण्यात धन्यता मानत आहेत. मात्र खरं काय? हे अद्याप तरी अनुत्तरितच आहे. त्यामुळे संभाजी भिडे यांचं शिक्षण काय? या प्रश्नाचं उत्तर आता त्यांच्या मनात आलं तरच कळू शकतं.