तुम्हा-आम्हाला ‘हुप हुप’ करायला लावणारं ‘माकड’!

शहरातला वर्दळीचा रस्ता… कुठल्याश्या एका कोपऱ्यात एक मदारी आपल्या माकडांसह बसलेला. हळूहळू गर्दी वाढायला लागते. मदारी आपल्या खेळाला सुरुवात करतो. माकडांना नानाविध सूचना करतो. माकडंही त्याचा शब्द खाली पडू देत नाही. उलट्या उड्या काय मारतात, पुढाऱ्यासारखं चालून काय दाखवतात, सलमानसारखा डान्स काय करतात… असं काहीही, अगदी मदाऱ्याला वाटेल तसं… खेळ रंगतो… रस्त्यानं जाणारा मध्यमवर्गीय, कष्टकरी हा खेळ पाहून पोटभर हसतो, मात्र त्याला कुठं माहीत असतं, की हाच खेळ आपल्या आयुष्यासोबतही खेळला जातोय. व्यवस्था असते मदारी आणि आपण असतो माकड…

हे सगळं मांडण्याचं कारण म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवर आलेलं नवं नाटक, ज्याचं नाव आहे ‘माकड’… या नाटकाचा पुण्यातील शुभारंभाचा प्रयोग नुकताच बालगंधर्व नाट्य मंदिरात पार पडला. चैतन्य सरदेशपांडे यांनी हे नाटक लिहिलंय तर अभिजित झुंजारराव यांनी ते दिग्दर्शित केलंय. व्यवस्थेनं तुम्हा-आम्हा अनेकांना माकड कसं केलंय, हे या नाटकातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. बालगंधर्व रंगमंदिरात आपलं झालेलं माकड पहायला तशी जेमतेमच गर्दी होती. तरीही ‘माकड’च्या टीमनं केलेलं सादरीकरण केवळ अप्रतिम होतं.

बँकेत अधिकारी असलेला ‘मध्या’ आणि शिक्षिका असलेली ‘मिली’ या जोडप्याच्या आयुष्यात आलेलं वादळ म्हणजे हे नाटक. मध्या आणि मिलीशिवाय या नाटकात आणखी दोन पात्रं आहेत. टिपीकल राजकारणी ‘साहेब’ आणि त्याचा प्रत्येक शब्द झेलणारा हवालदार ‘कोडगे’. मध्या आणि मिलीच्या गुलाबी आयुष्याचं सादरीकरण करुन या नाटकाला सुरुवात होते. गुजराती बिल्डरचा लोन पास करण्यासाठी मध्याला आलेला फोन नाटकाला गंभीर वळण देतो. मध्या लोन पास करणं नाकारुन व्यवस्थेचा भाग होण्यास नकार देतो आणि त्यांच्या घरात अनधिकृतपणे शिरतात ‘राजकारणी साहेब’ आणि ‘हवालदार कोडगे’.  

मध्या आणि मिली टिपीकल मध्यमवर्गीय… म्हणजे मतदान न करता सुट्ट्या एन्जॉय करायला जाणारे, कर चुकवणारे आणि वरुन व्यवस्थेवरच खापर फोडणारे… राजकारणी साहेब आणि हवालदार कोडगे यांनी टाकलेल्या फासात ते हळूहळू फसत जातात आणि सुरु होतो मदारी आणि माकडाचा खेळ… नाटक गंभीर असलं तरी बेरकी कोरडे आपल्याला हसवल्याशिवाय राहात नाही. मध्याचा श्वास न घेता व्यक्त होणारा आक्रोश प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवून जातो. मिली अंगावर येते तर राजकारणी साहेब आपल्या मनात चीड निर्माण केल्याशिवाय राहात नाही. 

राजकीय व्यवस्थेला उघडं पाडण्याचा प्रयत्न या नाटकात करण्यात आलाय. इथली व्यवस्था आपलं माकड करते हे खरं असलं, तरी त्याला काहीअंशी आपणच जबाबदार असतो. लोकशाहीचा सुजान नागरिक म्हणून आपली काही कर्तव्य असतात, ती आपण पार पाडणं गरजेचं असतं. ती कर्तव्य पार पाडण्यात आपण कमी पडतो तेव्हा व्यवस्थेचा घटक असलेले इथलेच काहीजण मदारी बनतात आणि आपल्या मानगुटीवर बसतात. फक्त आपलं माकड झालंय हे आपली वेळ आल्याशिवाय आपल्याला कळत नाही, त्यासाठी हे नाटक पहायलाच हवं.