विद्यापीठ निवडणुकीत प्राध्यापकांच्या स्फुक्टो-पुटा संघटनेत उभी फूट

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीवरुन प्राध्यापकांच्या स्फुक्टो-पुटा संघटनेत उभी फूट पडलीय. विद्यापीठाच्या इतिहासात 43 वर्षांत पहिल्यांदाच प्राध्यापकांमध्ये अशी फूट पडल्याचं पहायला मिळतंय. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभा व विद्यापरिषद निवडणूक 21 जानेवारी 2018 रोजी होत आहे. या निवडणुकीत नगर, नाशिक आणि पुणे असे मिळून सुमारे 9 हजार प्राध्यापक मतदार असून नवीन विद्यापीठ कायद्यामुळे होणारे बदल लक्षात घेऊन ही निवडणूक प्रथमच चुरशीची ठरणार आहे.

सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या प्राध्यापकांनी 71 दिवस आंदोलन केलं होतं. या दिवसांचा पगार त्यांना अद्यापही देण्यात आलेला नाही, त्यामुळे प्राध्यापकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. त्यामुळे नाराज असलेल्या अनेक प्राध्यापकांनी स्फुक्टो-पुटा संघटनेला सोडचिठ्ठी दिली आहे.

ADVT

विनाअनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यपकांच्या समस्यांकडे स्फुक्टो-पुटा संघटना फारशी लक्ष देत नाही, अशीही प्राध्यापकांची तक्रार आहे. संघटना काही लोकांच्या दावणीला बांधल्याचा आरोप करत संघटनेतील अनेक सदस्यांनी संघटनेतून फुटून वेगळी चूल मांडलीय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षक संघ अशा नावाने नवी संघटना बांधण्यात आलीय. याशिवाय संगमनेरचे डॉ. पांडुरंग चौधरी आणि कोपरगावचे डॉ. बालासाहेब तुरकणे यांनी बंडखोरी करत शिक्षक संघाकडून उमेदवारी दाखल केलीय, तर माहिती अधिकाराचा वापर करुन विद्यापीठातील विविध घोटाळे उघडकीस आणणारे प्राध्यापक डॉ. अतुल बागुल यांनी स्वतंत्र अर्ज दाखल केलाय. 

प्राध्यापकांच्या संघटनेतील फूट आणि बंडखोरीमुळे आधीच विद्यापीठात वातावरण तापलेलं आहे. त्यातच विद्यापीठाची अधिसभा व विद्यापरिषद निवडणूक लागली आहे, त्यामुळे ही निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याचं दिसतंय.