कसा आहे पद्मावत??? ‘एबीपी’चे वृत्तनिवेदक अमोळ किन्होळकर यांचा ब्लॉग

पद्मावतीबद्दल उत्सुकतेपोटी तुम्ही जर गेल्या दिवसांमध्ये काही वाचलं असेल, ऐकलं असेल, पाहिलं असेल.. तर ते विसरून पद्मावतला जा.. कारण पद्मावतमध्ये सुरूवातीला डिस्क्लेमर चालवून भन्साळींनी सिनेमाचा पार मेलोड्रामा करून टाकलाय..

राणी पद्मावतीनं स्वयंवर रचून विवाह केला, रतन सिंगनं खिलजीला पद्मावती आरशात दाखवली, खिलजीनं छल कपटानं राजा रतन सिंगला दिल्लीत कैदेत ठेवलं तेव्हा राणी स्वतः राजाला सोडवायला दिल्लीला गेली होती का? बरं गेली तर तिला खिलजीच्या बायकोनंच मदत करून भुयारी मार्गातून मेवाळला पाठवलं. या सर्व संदर्भात इतिहासात संभ्रम आहे.. पण राणी पद्मावती दिल्लीला गेलीच नव्हती, सेनापती गोरा आणि त्यांचा पुतण्या बादल यांनीच राजा रतन सिंगला सोडवून आपल्या प्राणांची आहुती दिली.. असा उल्लेख आढळतो. पण पद्मावतमध्ये हे असं काहीच आपल्याला पाहायला मिळत नाही.. प्रत्येक फ्रेममध्ये नाट्य भरून मनोरंजनाचा पावरपॅक्ड भन्साळींनी बनवलाय.. त्यामुळे फार संदर्भ, इतिहासात फिरण्यापेक्षा थ्रीडीमध्ये उत्तम कलाकृतीचा आनंद घेण्यासाठी पद्मावत बघावा.

कलाकारांच्या अभिनयापेक्षाही मेवाडच्या चित्तोडगडाचा सेट अप्रतिम आहे.. दीपिका पदुकोन ही सिंहल देशाची राजकन्या ते सती जाण्यापर्यंत प्रत्येक फ्रेममध्ये सुंदर दिसली.. म्हणजे ती आहेच सुंदर.. बोलणं थोडं धाडसाचं होईल पण तिच्यापेक्षाही सुंदर दिसली आहे ती खिलजीची मलिका आदिती राव हैदरी.. खिलजी हा कपटी, क्रुरकर्मा, स्त्रीलंपट होता, यासोबत त्याचा आणखी एक गुण भन्साळींनी सिनेमात दाखवलाय. तो गुण म्हणजे खिलजी हा प्रचंड कॉमेडी होता.. रणवीरनं साकारलेला खिलजी हा राग येईल असं वागण्यापेक्षा आपल्याला हसू येईल असंच काहीसं वावरत असतो.. मलिक काफूर आणि खिलजीचे समलैंगिक संबंध अतिशय प्रामाणिकपणे दाखवल्याबद्दल भन्साळी अभिनंदनास पात्र आहे.. पण खलबली नामक गाण्यात रणवीर म्हणजे खिलजी माकडासारख्या उड्या मारत नाचतो. तेव्हा मात्र हे सगळं बालीश वाटायला लागतं.. मुळात खिलजी हा 46 व्या वर्षी दिल्लीच्या तख्तावर बसला.. त्यानंतर वयाच्या 55 व्या वर्षी तो असा उड्या मारत का बरं नाचेल.. पण कोणालाही कधीही आपल्या गाण्यावर भन्साळी नाचवू शकतात.


राजा रतन सिंगचं काम शाहीद कपूरनं उत्तम केलंय.. पण शाहीदऐवजी कोणी उंचपुरा, तगडा अभिनेता असता तर तो अधिक शोभून दिसला असता.. राजपुताना संस्कार आणि केसरीया तलवारीचा दैदिप्यमान इतिहास संवादातून अधिक प्रभावी होत जातो.. सेनापती गोरा आणि बादल यांच्या शौर्याच्या कथा खरंतर राजा रतनसिंगपेक्षाही अधिक प्रसिद्ध आहेत.. पण त्यांना पद्मावतमध्ये फार काही स्पेस दिली नाही.. 3 तासात ते सगळं शक्यही नाही.


घूमर आणि एक दिल.. ही दोन गाणी सोडली तर बाकी गाणी अज्जीबात लक्षात राहत नाही.. मुळात ती अनावश्यक होती.. सगळ्याच कलाकारांनी पद्मावतची फ्रेमन फ्रेम सजवलीय.. थ्रीडीमध्ये तर हे सगळं बघणं अद्वितीय अनुभव आहे.. मुळात भन्साळींचे सिनेमे हे ऐतिहासिक नसतात.. ते एखाद्या पात्राभोवती फिरतात.. मग ते बाजीराव मस्तानी असो किंवा पद्मावती.. ते पात्र सोडून त्यात ऐतिहासिक संदर्भ वगैरेंशी भन्साळींना घेणं देणं नसते.


किमान 500 कोटी भन्साळी कमावतीलच.. पण तोपर्यंत 500 कोटींच्या सरकारी मालमत्तेचं नुकसान होऊ नये, म्हणजे मिळवली…

-अमोल किन्होळकर ( लेखक एबीपी माझा वृत्तवाहिनीत वृत्तनिवेदक आहेत )