चर्चा फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींच्या फेट्याची!

राजधानी नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. आपल्या वेशभूषेसाठी चर्चेत राहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही चर्चेत राहिले. चर्चा होती त्यांच्या फेट्याची… 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा जोधपुरी फेटा घातला होता. हा फेटा पंचरंगी होता. खास जोधपूरवरुन हा फेटा मागवला गेल्याची माहिती आहे. भाजपचे वरिष्ठ नेते ओम माथूर यांनी हा फेटा पाठवल्याचं कळतंय. हा फेटा मोदींना शोभून दिसत होता. मोदीही या पेहरावात आनंदी असल्याचे दिसले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोधपुरी फेटा घालण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वीही त्यांनी हा फेटा परिधान केल्याचं दिसून आलं आहे. 

26 जानेवारी 2017 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रजासत्ताक दिनी गुलाबी रंगाचा फेटा घातला होता. यावेळी अबूधाबीचे प्रिन्स जनरल शेख मोहम्मक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

26 जानेवारी 2016 – या प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिवळ्या रंगाचा फेटा परिधान केला होता. फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रांसिसो ओलांद यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

26 जानेवारी 2015- या प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल आणि हिरव्या रंगाची जयपुरी फेट्याची पगडी घातली होती. यावेळी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनच नव्हे तर स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेशभूषा चर्चेचा विषय ठरली. तब्बल 4 स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी देशाच्या विविध भागातील फेट्यांना आपल्या डोक्यावर स्थान दिलं. 

15 ऑगस्ट 2017- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या सलग चौथ्या कार्यक्रमात फेटा घालून हजेरी लावली. हा गुजराती फेटा होता अशी माहिती आहेय यावेळी त्यांच्या फेट्यापेक्षा फेट्याच्या लांबीचीच जास्त चर्चा होती. कारण फेटा चक्क त्यांच्या टाचेपर्यंत लोंबत होता. 

15 ऑगस्ट 2016- स्वातंत्र्यदिनाच्या या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी जयपुरी फेटा घालून लाल किल्ल्यावर आले होते. गुलाबी आणि पिवळ्या रंगाच्या या फेट्याची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती. जोधपूरचा प्रसिद्ध गजशाही फेटा अशी या फेट्याची ओळख सांगितली जाते. यावर्षी तब्बल 5 फेटे मोदींपुढे ठेवण्यात आले होते, मात्र त्यांनी या आकर्षक फेट्याची निवड केली होती.

15 ऑगस्ट 2015 – यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अत्यंत साधा फेटा परिधान केला होता. पिवळ्या रंगाचा आणि हिरव्या लाल धाग्यांचा हा फेटा अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरला होता. अर्थात त्यावेळी मोदींची क्रेझही त्यात होती हा भाग वेगळा.

15 ऑगस्ट 2014 – पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचा हा पहिलाच स्वातंत्र्यदिन होता. मोदी स्वतः तिरंगी रंगाच्या ड्रेसकोडमध्ये दिसून आले. पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा आणि त्यावर केसरी आणि हिरव्या रंगाचा फेटा त्यांनी परिधान केला होता. हा फेटा राजस्थानी बांधणीचा होता.