काय सांगता??? भारतीय पासपोर्टची प्रतिष्ठा वाढली???

“शायद….जो लोग विदेश में रहते हैं और जो लोग विदेश जाते-आते रहते हैं, आज भारत के पासपोर्ट की जो इज्जत है आज भारत के पासपोर्ट की को ताकत है, शायद ही पहले कभी इतनी ताकत किसी ने अनुभव की होगी। आज एअरपोर्ट पर एन्टर होते ही इमीग्रेशन ऑफिसर के पास जब भारत का पासपोर्ट कोई रखता है, तो बड़े शान के साथ, सामने वाला बड़े गर्व के साथ उसे देखता है। “

हे शब्द आहेत खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे… काही दिवसांपूर्वीच टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीवरील पत्रकार नविका कुमार यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना मोदी साहेबांनी हे विचार मांडलेत. खरंच भारताच्या पासपोर्टची प्रतिष्ठा वाढली आहे का? जगभरात त्याचा दबदबा वाढला आहे का? की ही फक्त एक तोंडपाटीलकीच आहे?

याबाबत थोडसं आणखी खोलात गेल्यानंतर काही तथ्ये आढळली. टाइम्स नाऊने 21 जानेवारी रोजी रात्री 9 वाजून 49 मिनिटांनी पंतप्रधानांच्या या वक्तव्याचे ट्विट केले आणि योगायोग असा की सध्या दावोसमध्ये चालू असलेली बिझनेस समिट ज्या संस्थेने भरवली आहे, त्या वल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF)च्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवरून त्याच दिवशी रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी म्हणजेच 19 मिनिटे आधी एक ट्विट आलं. ज्यात लिहलं होतं की जगातला सगळ्यात शक्तिशाली पासपोर्ट जर्मनी या देशाचा आहे.

WEF चे हे ट्विट हेन्ले अॅन्ड पार्टनर्स या संस्थेने केलेल्या सर्व्हेनंतर दिलेल्या रेटिंग्सवर आधारीत असल्याचे समजते. ही एक अशी संस्था आहे, की जगभरातील प्रवाशांच्या संख्येचा डेटा एकत्रित करुन त्यावर अभ्यास करते. प्रत्येक देशाला गुण देते आणि त्या आधारे एखाद्या देशाच्या पासपोर्टच्या क्षमतेचे मूल्यांकन सादर करते. हेन्ले अॅन्ड पार्टनर्स या संस्थेने आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघ – IATA यांच्या सहकार्याने हा सुचकांक बनवला आहे. IATA कडे जगभरात होणाऱ्या प्रवासाचा सर्वात मोठा डेटा असल्याचं सांगितलं जातं. 

या सुचकांकासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा विचारात घेतला जातो, तो म्हणजे एखाद्या देशाचा पासपोर्ट धारक नागरिक दुसऱ्या किती देशात विना व्हिसाचा प्रवास करू शकतो. ज्या देशाचा नागरिक जास्तीत जास्त देशांमध्ये विना व्हिसा प्रवास करू शकतो, त्या देशाचा पासपोर्ट अधिक शक्तिशाली मानला जातो. उदाहरणार्थ ‘क्ष’ देशाचा पासपोर्ट धारक 100 देशांमध्ये विना व्हिसा प्रवास करू शकत असेल, तर त्याला 100 गुण. ‘य’ या देशाचा नागरिक 30 देशात विना व्हिसाचा प्रवास करू शकत असेल, तर त्याला 30 गुण, अशाप्रकारे शक्तिशाली पासपोर्ट ठरवला जातो. 

लिंक- https://www.henleyglobal.com/files/download/HPI2018/PI%202018%20INFOGRAPHS%20GLOBAL%20180117.pdf

 

हेन्ले अॅन्ड पार्टनर्सने वर्ष 2018 च्या सूचीनूसार केलेल्या 104 देशांच्या सर्व्हेमध्ये भारत 49 गुणांसह कंबोडिया आणि मध्य आफ्रिका या देशांसमवेत संयुक्तपणे 86 व्या स्थानावर असल्याचे दिसते. थोडक्यात भारताचा पासपोर्ट बाळगणारा व्यक्ती आजच्या घडीला 49 देशात विना व्हिसा प्रवास करू शकतो.

आता प्रश्न येतो, की मोदीजी म्हणल्याप्रमाणे खरंच आपला पासपोर्ट पहिल्यापेक्षा अधिक ताकदवान झाला आहे का? त्याचा रुबाब वाढला आहे का? त्यासाठी आपल्याला मागील काही वर्षांचे रेटिंग्स तपासावे लागतील.

-2017 साली झालेल्या सर्व्हेमध्ये भारतीय पासपोर्ट 104 देशात 49 गुणांसह 87 व्या स्थानावर होता ज्यात यावर्षी एका स्थानाची प्रगती आपण केली आहे.

-2016 मध्ये आपण 52 गुणांसह 104 देशात 85 व्या स्थानावर होतो.

-2013 या साली आपला पासपोर्ट 93 देशात 52 गुणांसह 74 व्या स्थानी असल्याचे दिसते.

अधिक माहितीसाठी सोबत तक्ता दिला आहे.


वरील तक्ता पाहिल्यानंतर लक्षात येते की 2014 म्हणजे मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर आजतागायत या रँकिंगमध्ये भारतीय पासपोर्टची सातत्याने घसरण झालेली आहे. ही घसरण मोठ्या प्रमाणात नसली तरी आधीच्या काँग्रेस सरकारच्या तुलनेत नक्कीच कमी असल्याचे आढळते. मग मोदी कोणत्या आधारावर भारताचा पासपोर्ट शक्तिशाली झाल्याच्या वार्ता करत आहेत?

काँग्रेसच्या काळात या क्षेत्रात खूप काही चांगलं काम झालंय, असं म्हणता येणार नाही. परंतु भाजपच्या काळात सद्यस्थितीत आपण घसरत चाललो आहोत, हे स्पष्ट आहे. मुळात हा एकूणच मुद्दा द्विपक्षीय संबंध आणि इतर देशांशी आपला असणारा संवाद यावर आधारित आहे. मोदी सत्तेत आल्यापासून मोठ्या प्रमाणात करत असलेले परदेश दौरे एव्हाना सर्वश्रुत झाले आहेत. त्याआधारे भाजप देशाच्या द्विपक्षीय संबंधात वाढ होत असल्याचे दावे वेळोवेळी करत आली आहे. भारताचा दबदबा, भारताची प्रतिष्ठा या दौऱ्यांद्वारे वाढत असल्याचे दावेही त्यांच्याकडून केले जातात, परंतु प्रत्यक्षात मात्र वेगळीच स्थिती असल्याचे निदर्शनास येते.

थेट परकीय गुंतवणुकीला सगळी दारे खुली केल्यानंतर देखील परकीय गुंतवणूक म्हणावी तशी होताना दिसत नाही. वारंवार प्रत्येक गोष्टीत दिशाभूल करणारी वक्तव्ये करून ते काय साध्य करू इच्छितात? अशा दिशाभूल करणाऱ्या अर्धवट गोष्टी सांगून स्युडो राष्ट्रवाद चेतवत ठेवणे, मूळ विकासाच्या मुद्द्यांवर चिकित्सक चर्चा न करणे, मुद्दे भरकटवण्यासाठी वादग्रस्त विधाने करणे, ही सर्व गेल्या साडे तीन वर्षातील मोदी सरकारच्या ढिसाळ कारभाराची लक्षणे समजावीत का? उत्तर तुम्हाला आम्हालाच शोधावं लागेल. विचार करावाच लागेल. प्रश्न विचारावाच लागेल.

 

लेखक- डॉ. सुरज मोटे, गिरवली, ता. भूम, जि. उस्मानाबाद

 

 

 

 
-आपले लेख आम्हाला पाठवा – contact@thodkyaat.com