#व्हेलेंटाईन स्पेशल | विश्वास नांगरे-पाटील यांची लव्हस्टोरी

बस नाम ही काफी है… असं ज्या काही मोजक्या लोकांसाठी म्हणता येतं, त्यापैकी एक नाव म्हणजे विश्वास नांगरे पाटील… एक शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अशी त्यांची ख्याती… याशिवाय हॉटेल ताजमध्ये कसाब आणि त्याचे दहशतवादी शिरले असताना आपल्या प्राणांची पर्वा न करता थेट हॉटेलमध्ये घुसणारा जिगरबाज पोलीस अधिकारी… विश्वास नांगरे-पाटलांची ही सगळी रुपं तुम्हाला नक्कीच माहीत असतील, मात्र यापलिकडेही विश्वास नांगरे-पाटील यांचं आयुष्य आहे. एक आयुष्याभराच्या जोडीदाराचं तर दुसरं बाप माणसाचं… रुपाली मुळे या त्यांच्या अर्धांगिणी… पाहुयात त्यांच्याच लग्नाची गोष्ट…

विश्वास नांगरे-पाटलांना लग्नाचा प्रस्ताव-

ऐकून आश्चर्य वाटेल मात्र विश्वास नांगरे-पाटील यांचं अरेंज मॅरेज आहे. औरंगाबाद हे ते शहर जे त्यांच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं ठरलं. इथं त्यांच्या नोकरीची सुरुवात तर झालीच शिवाय त्यांना त्यांच्या आयुष्याचा जोडीदारही याच शहरात मिळाला. 1999 साली विश्वास नांगरे पाटील आयपीएस झाले आणि त्यांना औरंगाबादमध्ये प्रोबेशनवर पाठवण्यात आलं. विश्वास नांगरे-पाटील याठिकाणी रुजू झाले. त्यांच्याकडे सिल्लोड-कन्नड-फुलंब्री हा भाग होता. 

आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांची ओळख कल्याण औताडे यांच्याशी झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं आणि याच मित्राने त्यांच्यासाठी लग्नाचा प्रस्ताव आणला. मुलीचं नाव होतं रुपाली…. रुपाली मुळे… उद्योजक पद्माकर मुळे यांची मुलगी… विश्वास नांगरे-पाटील यांनीही मुलगी पाहायला होकार दिला…

मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात गोंधळ-

मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आपल्याकडे कसा असतो तुम्हाला चांगलाच माहीत असेल. मुलगी चहा-पोहे घेऊन येते आणि आल्या पावली परत जाते. विश्वास नांगरे पाटलांसोबत असंच काहीसं घडलं. ते आपल्या मित्राला सोबत घेऊन गेले होते. एका टीव्ही चॅनेलशी बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला होता. विश्वास नांगरे-पाटील त्यावेळी रुपालींशी काही बोलले नाहीत, मात्र मित्राला सोबत नेल्यामुळे गोंधळ झाला. विश्वास नांगरे-पाटलांनी मुलगी पाहिली. मात्र मुलीला नवरा मुलगा नेमका कोणता ते काही कळालं नाही. 

गोंधळाची परिस्थिती झाल्यामुळे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी पुन्हा ठरवण्यात आला. पण यावेळी मात्र हुशारी करण्यात आली आणि मुला-मुलीला दोघांनाच भेटण्याचं ठरु देण्यात आलं फक्त मुलीचा भाऊ सोबत गेला होता. एका कॅफेमध्ये दोघे भेटले. यावेळी दोघांनी तासभर चर्चा केली. 

ड्रेसकोड पाहून प्रेमात पडल्या रुपाली-

विश्वास नांगरे-पाटलांना कॅफेमध्ये भेटायला गेलेल्या रुपाली तेव्हा चांगल्याच बावरुन गेल्या होत्या, कारण नांगरे पाटील तेव्हा युनिफॉर्ममध्ये आले होते. त्यांना तशा वेषात पाहून रुपाली यांच्या तोंडातून शब्द निघत नव्हता. मी काय बोलायचं हे विसरुन गेले होते, असं रुपाली सांगतात.

विश्वास नांगरे पाटलांच्या वडिलांना सोडावा लागला आग्रह-

विश्वास नांगरे-पाटलांच्या वडिलांचा सातारा-सांगली-कोल्हापूरकडची सून हवी, असा आग्रह होता. मात्र रुपाली तर औरंगाबादच्या होत्या. मराठवाड्यातील सून त्यांना पसंद पडणं अवघड होतं. मात्र विश्वास यांच्या पसंतीला त्यांच्या वडिलांनी अखेर मान्यता दिली. त्यांनी आपला आग्रह सोडला आणि त्यांच्या लग्नाला परवानगी दिली.

लग्नापर्यंतची हुरहूर आणि किस्से-

विश्वास नांगरे-पाटील आणि रुपाली यांच्या साखरपुड्यापासून लग्नाच्या दरम्यान 6 महिन्यांचा कालावधी होता. त्यातच विश्वास नांगरे पाटलांचा प्रोबेशनचा कालखंड संपला आणि त्यांना अॅटॅचमेंट प्रोग्रामसाठी काश्मीर, भोपाळ आणि गडचिरोली अशा ठिकाणी जावे लागले. त्यावेळी आजच्यासारखे फोन नव्हते. विश्वास नांगरे पाटील रुपाली यांना एसटीडी बूथवरुन फोन करायचे. ते तासनतास रुपाली यांच्याशी बोलायचे. त्यावेळी दोन बंदुकधारी एसटीडी बूथबाहेर थांबलेले असायचे. लोकांना याचं फार आश्चर्य वाटायचं.

लग्न आणि विश्वास नांगरे पाटील यांची पहिली पोस्टिंग-

प्रोबेशनचा कालावधी संपल्यानंतर विश्वास नांगरे पाटील यांना धुळ्यात पोस्टिंग मिळाली. ते डीवायएसपी म्हणून रुजू झाले. ते तिथं रुजू होताच घरच्यांनी लग्नाची घाई केली. 8 नोव्हेंबर 2000 रोजी विश्वास नांगरे-पाटील आणि रुपाली विवाहबंधनात अडकले. रुपाली यांची जबाबदारी आता चांगलीच वाढली होती. त्या एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नी होत्या. त्यांनी या गोष्टींसोबत जुळवून घ्यायला सुरुवात केली, विश्वास नांगरे-पाटलांनीही त्यांना याकामी चांगलीच मदत केली. 

26/11च्या हल्लावेळी रुपाली यांची काय अवस्था होती?-

मुंबईवर 26/11चा हल्ला झाला. त्यावेळी विश्वास नांगरे-पाटील थेट हॉटेलमध्ये घुसले होते. धुमश्चक्री सुरु होती आणि आपलं काय होईल याची विश्वास-नांगरे पाटील यांनाही कल्पना नव्हती. त्यातच विश्वास नांगरे पाटील यांना दहशतवाद्यांनी पकडलंय, असा संदेश एका अधिकाऱ्याच्या पत्नीने रुपाली यांना दिला, त्यावेळी त्यांच्या काळजाचे ठोके चुकले होते. ती रात्र जागून काढल्याचं रुपाली सांगतात. विश्वास नांगरे-पाटील यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना सांगितलं, की माझ्या घरी तर अंत्यसंस्काराची तयारी करा, असे संदेश गेले होते. 

कुटुंबियांनाही वेळ देतात विश्वास नांगरे-पाटील-

सहा दिवस तुमचेच… तुम्हाला आम्ही काही बोलणार नाही. मात्र एक दिवस आमचा, असं रुपाली यांनी विश्वास नांगरे-पाटलांना सांगून टाकलं होतं. त्यामुळे विश्वास नांगरे-पाटील दर रविवारी आपल्या कुटुंबासोबत आपला कार्यक्रम आखतात. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्यांच्यासोबत रनिंग करणं, ट्रेकिंगला जाणं अशा प्रकारचे कार्यक्रम त्यांचे सुरु असतात. ते अनेकदा सहकुटुंब मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्याचंही तुम्ही पाहिलं असेल… पोलीस सेवेत ज्या कर्तव्यदक्षपणे काम करतात, तेवढ्याच तत्परतेने आपल्या कुटुंबासाठीही वेळ देतात. आज 18 वर्षांनंतरही रुपालीताईंच्या साथीने त्यांचं वैवाहिक आयुष्य त्यामुळेच एका आनंदी वळणावर आहे. त्यांचं पुढील आयुष्य असंच आनंदी जावं त्यासाठी शुभेच्छा…