फडणवीसांना रुमणं दाखवणारं शेतकऱ्याचं पोर सध्या काय करतंय?

शेतकरी आंदोलन ऐन भरात असताना शेतकऱ्याच्या पोेराचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. हातात रुमणं घेतलेला गडी टोकदार शब्दात आपली भूमिका मांडत होता. फडणवीसांना रुमणं दाखवून या मुलानं त्यांना चक्क आव्हान दिलं होतं. त्य़ानंतर शेतकरी आंदोलनाचं काय़ झालं हे तुम्हा-आम्हाला चांगलंच माहीत आहे. सुकाणू समितीची वाताहत झाली. शेतकरी आंदोलन मोडीत काढण्यात सरकारला यश आलं. मात्र या मुलाची सोशल मीडियावरील क्रेझ काही कमी झाली नाही. आजही त्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर पाहिला जातोय. व्हायरल इन इंडिया या यूटयूब चॅनेलवर हा व्हिडिओ 7 लाखपेक्षा अधिक लोकांनी पाहिलाय, तर आणखी काही यूट्यूब चॅनेलवरही हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिलाय. त्यामुळेच आम्ही हा मुलगा सध्या काय करतो हे शोधण्याचा प्रयत्न केला. 

-दयानंद शिंदे-पाटील असं या व्हिडिओत रुमणं घेतलेल्या तरुणाचं नाव आहे…

-दयानंद मूळचा बीड जिल्ह्यातील केजमधील होळ गावचा रहिवासी आहे

-दयानंदचं 10 पर्यंतचं शिक्षण गावातच तर बारावीपर्यंचं शिक्षण आंबेजोगाईमध्ये झालं.

-दयानंद पुढील शिक्षणासाठी पुण्यात आला असून सध्या तो मराठवाडा मित्र मंडळाच्या महाविद्यालयात कायद्याचं शिक्षण घेतोय. 

-शेतकरी धर्मा पाटलांनी मंत्रालयात नुकतीच विष पिऊन आत्महत्या केली. तेव्हा दयानंदमधील शेतकरी जागा झाला आणि त्याने मित्रमंडळींना सोबत घेऊन पुण्यातील गुडलक स्ट्रीटवर मूक निदर्शनं केली.

-तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून तरुण या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. “हे सरकार खुनी आहे”, असं लिहिलेले फलक त्यांच्या हातात होते. 

शेतकरी आंदोलन आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यावर जेव्हा आम्ही दयानंदला बोलतं करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यानं जे सांगितलं ते त्याच्याच शब्दात…

“शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांची फसवणूक झाली ही खरी गोष्ट आहे. शेतकरी आंदोलन सरकारनं लाख फोडलं असेल मात्र शेतकऱ्याची हिंमत या सरकारला फोडता येणार नाही. खडकातून सोनं पिकणारी आमची जात आहे याचं भान सरकारनं ठेवावं. शेतकऱ्यांच्या मागण्यांना गाजर दाखवण्याचं काम सरकारनं केलं आहे याची फळं त्यांना निश्चितच भोगावी लागतील. शेतकऱ्यांशी प्रतारणा करणाऱ्यांना मी यापुढेही शिंगावर घेण्यास मागेपुढे पाहणार नाही.”