926 कोटी रुपयांचा दरोडा हाणून पाडणाऱ्या पोलीस शिपायाची गोष्ट

मंगळवार, 6 जानेवारी…  रात्रीचे साधारणतः दीड वाजले असावेत… जयपूरमधील अॅक्सिस बँकेबाहेर एक इनोव्हा कार अत्यंत वेगानं येऊन थांबली. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच इनोव्हातील पाच-सहा जण वाऱ्याच्या वेगानं बँकेच्या भितींवरुन उड्या मारुन आत आले. दोघे-तिघे गाडीतच दबा धरुन बसले होते. बँकेच्या कम्पाऊंडच्या आत उड्या मारणाऱ्या सर्वांनी तोंडाला रुमाल बांधले होतै. त्यातल्या दोघा तिघांकडे पिस्तुलही होते. सुरक्षेसाठी गेटवर तैनात असलेल्या प्रमोदला हे दरोडेखोर आहे हे समजण्यास उशीर लागला नाही, मात्र त्याने काही अॅक्शन घेण्याच्या आतच ते त्याच्याजवळ पोहोचले. त्यातल्या दोघांनी त्याला पकडलं आणि एकाने त्याचे हातपाय बांधण्यास सुरुवात केली, तर दुसऱ्या दोघांनी गेट तोडण्यास सुरुवात केली. एका बँकेच्या बाहेर मध्यरात्री हा थरार सुरु होता आणि जयपूरसारख्या मोठ्या शहरात त्याचा कुणालाही थांगपत्ता नव्हता.

प्रमोदनं जिवाच्या आकांतानं ओरडण्याचा प्रयत्न केला, मात्र अस्फुटशी किंचाळी सोडली तर त्याला दरोडेखोरांच्या पुढे काहीच करता आलं नाही. त्यांनी त्याच्या तोंडात बोळा कोंबळा. प्रमोदचे हातपाय बांधण्यात आले. प्रमोद तरीही झटापट करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र दरोडेखोरांनी त्याला लाथा घालून बेजार केलं.

बाहेर हा राडा सुरु असताना बँकेच्या आत तिजोरीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीतारामला मात्र बाहेर काहीतरी वेगळंच शिजत असल्याचा कानोसा लागला. प्रमोदची अस्फुटशी किंचाळी किंवा त्याने दरोडेखोरांशी केलेली झटापट त्याच्या कानावर गेली असावी. असुरक्षिततेची खात्री पटताच सीतारामनं सावध पवित्रा घेतला. कानोसा घेत त्यानं बाहेर काय चाललंय ते पाहण्याचा प्रयत्न केला. खिडकीतून त्याला जे दिसलं ते अंगाचा थरकाप उडवणारं होतं. एवढे दरोडेखोर पाहून खरंतर एखाद्याचं अवसान गळालं असतं, मात्र सीतारामला आपल्या कर्तव्याची जाणीव होती, शिवाय त्याच्यासोबत होती त्याची सखी, म्हणजेच रायफल… क्षणाचाही विलंब घात करणारा ठरला असता…. सीताराम रायफाल रोखली आणि गोळीबार केला.

खिडकीतून झालेला गोळीबार दरोडेखोरांसाठी अनपेक्षित होता. सीतारामची गोळी कुणाला लागली नाही, मात्र त्या आवाजानेच त्यांची पाचावर धारणा बसली. त्यांनी आल्या पावली पळून जाणं पसंत केलं. लॉक तोडलेल्या गेटमधून त्यांनी पार्श्वभागाला पाय लावून पळ काढला. सीतारामला दुसऱ्यांदा गोळीबार करण्याची गरज सुद्धा पडली नाही. दरोडेखोरांचा दरोड्याचा प्रयत्न सीतारामनं मोठ्या धैर्यानं हाणून पाडला होता. दरोडा यशस्वी झाला असता तर थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 926 कोटी रुपयांची रक्कम दरोडेखोरांच्या हाती लागली असती. लाखो जणांच्या आयुष्यातील जमापुंजीवर त्यांनी डल्ला मारला असता. सीताराम होता म्हणून देशातील सर्वात मोठा दरोडा यशस्वी होण्यापासून राहिला.

अॅक्सिस बँकेवरील सर्वात मोठा दरोड्याचा प्रयत्न फसल्याची बातमी सकाळी हाहा म्हणता वाऱ्यासारखी पसरली. सीताराम एका रात्रीत स्टार झाला होता. सकाळी त्याला याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यानं सांगितलं, की “हा खरंच भीतीदायक प्रसंग होता. मी मोठ्या धैर्यानं सामोरं गेलो. मात्र या प्रसंगामुळे मला फार मोठी हिंमत मिळाली आहे. ही हिंमत यापुढे माझ्या कामी येईल.

सीताराम तसा खूपच साधाभोळा आहे. त्याने आपल्या या हिमतीचं सारं श्रेय त्याच्या वरीष्ठ अधिकाऱ्याला दिलं. तो सांगतो, “28 जानेवारी मी ड्युटीवर होतो. माझी ही पहिलीच पोस्टींग होती. डीओ सुरेंद्र सिंह पाहणीसाठी आले होते. त्यांनी मला रायफल दाखवण्यास सांगितली. मी त्यांना रायफल दाखवली मात्र चुकीच्या पद्धतीने… त्यामुळे सुरेंद्र सिंह यांनी मला चांगलंच झापलं. मी त्या प्रसंगाने  दुःखी झालो मात्र सतर्क राहीन असा निश्चय मी त्यादिवशी केला. या घटनेच्या अवघ्या 10 दिवसांनीच दरोड्याची घटना घडली आणि सुरेंद्र सिंहांचे शब्द माझ्या ध्यानात आले.सुरेंद्र सिंह यांच्यामुळेच मी हे धाडस करु शकलो, असं सीतारामचं म्हणणं आहे.

सीताराम मूळचा सीकर जिल्ह्यातील पुनियाना गावचा रहिवासी… खरंतर त्याला बीएड करुन शिक्षक व्हायचं होतं. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. बीएड करत असतानाच हवालदार भरतीत त्याची निवड झाली. मास्तर होणं प्रतीष्ठेचं असलं तरी त्यानं हवालदार होणं पसंत केलं. बँक लुटीच्या घटनेनंतर वडिलांनी पहिल्यांदा त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली तेव्हा सीतारामच्या डोळ्यात पाणी साठलं होतं…