समय बडा पहेलवान है! गडकरींपुढे झुकले लक्ष्मण ढोबळे…

राष्ट्रवादीचा दलित नेता म्हणून राज्याचे पाणीपुरवठा आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केलेल्या लक्ष्मणराव ढोबळे यांना एकेकाळी भाजपा विचारसरणीची प्रचंड शिसारी येत होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि परिवार यांचा त्यांना प्रचंड पराकोटीचा द्वेष होता आणि त्यावरच अनेक वर्षे राजकारणही केलं. मात्र समय बडा पहेलवान है. १५ वर्षाची आघाडी सरकारची सत्ता गेली, दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीने पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला, विधानसभा उमेदवारी नाकारली तरीही अपक्ष नशीब आजमावून बघितलं, मात्र ते आपले डिपॉझीटही वाचवू शकले नाहीत. राजकीय ग्रहण अधिक गडद होत गेलं आणि मग कुटुंबातील महिला जिल्हा परिषदेत सदस्यही होऊ शकली नाही. भाजपात जावून वाल्मिक होण्याची शक्कल त्यांनी काढली आणि जो नेता प्रदेश, राष्ट्रीय पातळीवरून येतो त्यांच्या पुढे नतमस्तक व्हायचं, अशी प्रार्थना सुरु झाली. आज केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी आले तेव्हाही आपली लक्ष्मणरेषा ओलांडून पार चरणस्पर्श झालेला फोटो पाहायला मिळाला.

हे सगळं पाहताना मला २ जानेवारी २०१६ चा न विसरणारा दिवस आठवतो. तो भाजपानेही लक्षात ठेवावा. नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रीय सहभागी असल्याच्या कारणाने जेलमध्ये असलेल्या मात्र जामिनावर बाहेर असलेल्या शीतल साठे व कबीर कला मंचचा शाहिरी जलसा नावाचा कार्यक्रम याच लक्ष्मण ढोबळे सरांनी आपल्या महाविद्यालायात आयोजित केला होता. पोलिसांकडे शीतल साठे आणि सहकाऱ्यांची नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याची धक्कादायक माहिती असतानाही मुद्दामहून सोलापूरसारख्या शहरात बोलावून वातावरण गढूळ करण्याचं काम ढोबळेंनी केलं.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तो कार्यक्रम उधळून लावला, त्यावेळी उपस्थित असलेल्या या महाशयांनी स्वतः व गुंडाकरवी आम्हा कार्यकर्त्यांना प्रचंड मारहाण केली. उपस्थित असलेला २५० ते ३०० संख्येचा जमाव आमच्या अंगावर धावून आला. पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला, मात्र तो क्षण विसरता येणार नाही आणि एक अभाविप कार्यकर्ता आणि देशाप्रति अभिमान असलेला नागरिक म्हणून कधी विसरणारही नाही.

दलितांच्या मतांचे ध्रुवीकरण करत आणि त्यांच्या अज्ञानाचा वापर करत माझ्या वाघोलीसारख्या गावातून मोहोळ तालुका अन् राज्याचा मंत्री म्हणून सत्ता भोगलेल्या या महाशयांनी आता सपशेल लोटांगण भाजपासमोर घालणं तेवढंच राहिलं आहे. भाजपाला मोहोळ तालुक्याला सक्षम चेहरा आणायचा विचारही असू शकेल मात्र लक्ष्मण ढोबळे यांचा विचार जर मोहोळ तालुका, सोलापूर जिल्ह्याच्या भाजपाच्या राजकारणात करणार असतील तर मात्र आगामी काळातली परिस्थिती कठीण आहे.

देशप्रमी संघटन म्हणून आम्ही महाविद्यालयात भारत मातेच्या घोषणा देत अभिमानाने काम करतो. भारत मातेचा जयजयकार करणं, राष्ट्रपुनर्निमाणाचे कार्य, सामाजिक समरसता हे एकेकाळी वाईट वाटणाऱ्या, द्वेषाने भरलेल्या आणि माजी मंत्री असणाऱ्या लक्ष्मणराव ढोबळे यांना आज थेट वाकून पाया पडताना अभिमानही वाटला, मात्र आगामी काळात भाजपामध्ये त्यांचा चेहरा दिसणं प्रचंड वाईट आहे. त्याला भाजपाचे आत्मघातकी पाऊलही म्हणू शकतो. वाल्याचा वाल्मिकी होण्याच्या स्थितीत ढोबळे सर अजिबात नाहीत. त्यांच्या इतिहासावर नजर टाकून जिल्ह्याचे, राज्याचे भाजपा नेतृत्व त्यांना कधी भाजपामय करणार नाही, अशी आशाही आहे. शेवटी पार्टी विथ डिफरन्स यालाही जागलं पाहिजे…..!

-विकास विठोबा वाघमारे ( लेखक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहेत.)

 

( सदर लेखातील मते ही लेखकाची आहेत. त्या मतांशी सविस्तरचे मालक/संपादक सहमत असतीलच असे नाही. आपणही आपले लेख आम्हाला contact@thodkyaat.com वर पाठवू शकता. निवडक लेखांना आपल्या नावासह प्रसिद्धी देण्यात येईल. )