व्हेलेंटाईन डे मागे आहे भयंकर गोष्ट, वाचा नेमकं काय झालेलं!

व्हेलेंटाईन डे म्हणजे प्रेमी जोडप्यांचा सर्वात आनंदाचा दिवस… वर्षभर ते प्रेमाच्या आणाभाका घेतच असतात, तरीही हा दिवस त्यांच्यासाठी खास असतो. व्हेलेंटाईन डे च्या आदी येणारे डेज् सेलिब्रेट करुन ते प्रेमाची गोडी वाढवतात आणि व्हेलेंटाईन डेच्या दिवशी प्रेमाचा अत्युच्च आनंद घेतात. गुलाब फुलांची देवाणघेवाण होते. गिफ्ट दिले जातात आणि गोडगुलाबी प्रेमाची गोडी आणखी वाढवली जाते. मात्र हा व्हेलेंटाईन नेमका आहे काय? प्रेमी जोडपी तो का साजरा करतात? त्यामागे इतिहासात काही घटना घडून गेलीय का? या सगळ्याची उत्तरं देण्यासाठी हा लेखनप्रपंच….

क्रूरकर्मा क्लॉडियस दुसरा-

इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात क्लॉडियस दुसरा हा रोमन साम्राज्याचा राजा होता. रोमन साम्राज्य केवढं माहीत आहे का? ते साधंसुधं नव्हतं. युरोप आणि उत्तर आफ्रिकेत पसरलेलं ते विशाल साम्राज्य होतं. एवढ्या विशाल साम्राज्याचा राजा असलेला क्लॉडियस अहंकारी आणि क्रूर नसेल तरच नवल. क्लॉडियसचं साम्राज्य विशाल असलं तरी तो यावर समाधानी नव्हता. त्याला आपल्या साम्राज्याला नवनवे भूप्रदेश जोडण्याचा छंद होता. त्यासाठी तो आपल्या साम्राज्याच्या चारही दिशांना सैन्य पाठवत असे. शेजारच्या प्रदेशांवर आक्रमण करुन ते प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडत असे.

क्लॉडियस तुघलकी फतवा-

क्लॉडियसच्या चारही दिशांना सतत मोहिमा चालू असलेल्या त्यासाठी लाखो सैन्य खर्ची पडत होतं. सैनिकांना वर्षानुवर्षे आपल्या कुटुंबियांना भेटता येत नसे. रोमन जनताही आपल्या राजावर खूश नव्हती. सैन्यात भरती व्हायला लोक नकार देऊ लागले. त्यामुळे नव्याने सैन्य तयार करणं क्लॉडियसला अवघड जाऊ लागलं. महत्त्वाकांक्षी क्लॉडियसनं यावर मार्ग काढण्याचं ठरवलं. लोकांचं आपल्या बायका-मुलांवर जास्त प्रेम असतं, त्यामुळे ते सैन्यात भरती होत नाही, या निष्कर्षाप्रत क्लॉडियस पोहोचला आणि त्याने प्रेम करण्यास एवढंच नव्हे तर लग्न करण्यावरच बंदी घातली. क्लॉडियसचा हा फतवा तुघलकी होता. मात्र राजा क्रूरकर्मा होता, त्यामुळे त्याच्या निर्णयाच्या विरोधात बंड करण्याचं धाडस कुणातही नव्हतं. 

संत व्हेलेंटाईन यांचं बंड-

राजाने प्रेम करण्यावर लग्न करण्यावर बंदी घातली. ती बंदी अनेकांना रुचली नाही, त्यापैकी एक होते संत व्हेलेंटाईन… ते रोममधील एक पाद्री होते. त्यांना मानणारा एक वर्ग होता. संत व्हेलेंटाईन यांनी राजाचा निर्णय झुगारुन लावला. प्रेम ही मनुष्याला निसर्गानं दिलेली देणगी आहे, क्लॉडियसचा फतवा निसर्गविरोधी आहे आणि त्याला असा फतवा काढण्याचा काहीच अधिकार नाही, असं या पाद्रीबाबांचं म्हणणं होतं. त्यांनी क्लॉडियसच्या नियमाला फक्त विरोधतच केला नाही तर चक्क काही तरुण-तरुणींची लग्नंही लावून दिली.

क्लॉडियसचा संताप आणि व्हेलेंटाईनचा छळ-

संत व्हेलेंटाईम यांनी राज्याच्या निर्णयाविरुद्ध थेट बंड केलं. कोणत्याही जुलमी राजाला हे बंड रुचणारं नव्हतं. क्लॉडियस तर त्या तुलनेत अत्यंत निष्ठूर होता. राज्यविस्तारापुढे त्याची मती कुंठीत झाली होती. संत व्हेलेंटाईन करत असलेल्या गोष्टी त्याच्या कानावर गेल्या तसं त्याचं डोकं सरकलं. त्यानं व्हेलेंटाईन यांना कैद करण्याचा आदेश दिला. सैन्य राजाच्या आदेशाचं ताबेदार, त्यांनी या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी केली. संत व्हेलेंटाईन यांना तुरुंगात टाकलं. एवढ्यावरच थांबेल तर क्लॉडियस कसला? त्यांना संत व्हेलेंटाईन यांच्या कृत्याची शिक्षा म्हणून त्याचा छळ करण्याचा आदेश सोडला. 

 

जाताजाता संत व्हेलेंटाईन लिहितात,”तुझाच व्हेलेंटाईन”-

तुरुंगाच्या काळकोठडीत संत व्हेलेंटाईन यांना अनन्वित छळ सुरु झाला. त्यांच्यावर रोज अत्याचार होत. अखेर राजाने संत व्हेलेंटाईन यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. शिक्षेची तारीख पक्की झाली, तारीख होती 14 फेब्रुवारी… संत व्हेलेंटाईन यांना सुळावर चढवलं जाणार होतं. दरम्यानच्या काळात संत व्हेलेंटाईन यांनी तुरुंगातल्या जेलरच्या मुलीशी मैत्री झाली होती. तारुण्यसुलभ मुलगी संत व्हेलेंटाईन यांच्या प्रेमात पडली होती. सुळावर जाण्यापूर्वी त्यांनी या तरुणीला एक पत्र लिहिलं. पत्राचा शेवट त्यांनी “तुझाच व्हेलेंटाईन” असा केला होता. 

व्हेलेंटाईन यांना संतपद-

काळ पुढे सरकत गेला तशी संत व्हेलेंटाईन यांची महतीही तोंडोतोंडी पुढे सरकत गेली. प्रेमासाठी केलेल्या असीम त्यागाबद्दल लोक त्यांना आठवू लागले त्यांना पुजू लागले. त्यांनी प्रेमासाठी दिलेल्या बलिदानाबद्दल त्यांना संतपद देण्यात आलं.

14 फेब्रुवारी हा दिवस प्राचीन काळापासून ल्युपरकॅलिया उत्सवाशी निगडित होता. या उत्सवात तरुण मुलींच्या नावाच्या चिठ्ठ्या बनवून एका भांड्यात ठेवतात आणि तरुण मुलं त्या चिठ्ठ्या उचलतात. त्यानंतर चिठ्ठीत ज्या मुलीचं नाव निघेल त्या मुलीशी त्या मुलानं मैत्री करायची, असा संकेत होता. गॅलेसियस नावाच्या पोपने पुढे या उत्सवावर बंदी घातली आणि हा दिवस व्हेलेंटाईन डे म्हणून साजरा करण्याचे आदेश दिले. 

सुमारे 1700 वर्षांपूर्वी प्रेमाला विरोध झाला होता, तेव्हा संत व्हेलेंटाईन यांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. मात्र आज 1700 वर्षांनंतरही प्रेमाला होणारा विरोध तसाच सुरु आहे. तो भविष्यातही तसाच सुरु राहील, मात्र म्हणतात ना… प्यार करनेवाले कभी डरते नहीं, जो डरते है वो प्यार करते नहीं…

happy valentine day…