महाराष्ट्र कवेत घेण्याची क्षमता असणारा नेता… जयंत पाटील!

जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत आदराने घेतलं जाणारं नाव…, सारा महाराष्ट्र जयंत राजाराम पाटील यांच्याकडे एक अत्यंत उच्चशिक्षित, सुसंस्कृत आणि समर्थ राज्यकर्ता म्हणून पाहतो. त्यांच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कर्तृत्वाचा घेतलेला हा आढावा..!

खरं तर जयंतराव पाटील राजकारणात येतील असं त्यांचे वडील आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील धुरंधर नेते राजारामबापू पाटील यांना स्वप्नातही वाटले नसेल. जयंतराव लहानपणापासूनच अत्यंत दर्जेदार अशा शिक्षण संस्थांत शिकलेले, इतकंच काय तर अमेरिकेतही उच्च शिक्षण घेतलेले पण राजाराम बापू यांच्या अकाली निधनाने त्यांना राजकारणात यावं लागलं.

राजकारणात आल्यानंतर जयंतराव राजकारणात असे काही रमले की जणू काही जन्मल्यापासून राजकारणात असावेत अमेरिकेत उच्चशिक्षण घेत असलेला हा उमदा मुलगा सांगलीत आला आणि त्यानं त्याच्या व्यक्तिमत्वाने सांगलीतील जनतेला अशी काही भुरळ घातली की आज गेली 40 वर्षे सांगलीतील जनता त्यांच्यावर भरभरून प्रेम करते आहे. जयंतरावांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य काही असेल तर ते म्हणजे त्यांची विकासाची दृष्टी. यांच्याइतका विकासाची दृष्टी असलेला नेता महाराष्ट्राच्या राजकारणात तरी नाही.

जयंत पाटील यांनी केलेला इस्लामपूरचा विकास पाहिला तर अक्षरशः थक्क व्हायला होतं. जेव्हा भारतात ‘वायफाय’ हा शब्ददेखील नवीन होता त्याच्या आधीच जयंतरावांनी इस्लामपूरला भारतातील पहिली वायफाय सिटी बनवलं देखील होतं..! आज इस्लामपूरमधील प्रत्येक घटकाच्या आयुष्यात जयंतराव यांनी विकास नेऊन पोहचवला आहे. आज राज्यभर आणि देशभर बेरोजगारीचा प्रश्न तीव्र असताना जयंत पाटील यांनी इस्लामपूर मधील प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळवून दिला आहे. राजारामबापू उद्योग समूह, राजारामबापू सूतगिरणी, कृष्णा दूध, राजारामबापू सहकारी बँक अशा कितीतरी संस्था जयंत पाटील यांनी सहकाऱ्यांना बरोबर घेऊन उभ्या केल्या आहेत. केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशियातील इंजिनियरिंगच्या सर्वोत्तम शिक्षण संस्थानपैकी एक गणली जाणारी ‘राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ हि देखील जयंत पाटील यांनीच उभी केली.

जयंतराव हे एकदोन नव्हे तर गेली तब्बल 35 वर्ष वर्षे इस्लामपूर मधून सातत्याने निवडून येत आहेत. इतकंच काय तर सलग 15 वर्षे त्यांनी राज्यातील अर्थ, गृह, ग्रामविकास अशी अत्यंत महत्वाची खाती सांभाळली आहेत.

26/11 च्या भीषण हल्ल्यानंतर गृह खात्याची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर येऊन पडली, त्यांनी ती अत्यंत समर्थपणे पार पडली. गृह खात्याची जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाचे आधुनिकीकरण केले. महाराष्ट्र पोलिसांचं खचलेलं मनोधैर्य वाढवलं, आज राज्यात कोणत्याही आव्हानाला तोंड देऊ शकणारी पोलीस यंत्रणा उभी करण्याचं संपूर्ण श्रेय हे जयंत पाटील यांनाच जातं.

आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात जयंत पाटील एक अत्यंत सुसंस्कृत आणि स्वच्छ प्रतिमेचे अभ्यासू नेते म्हणून परिचित आहेत. राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रश्नाची अचूक जाण असणारा नेता म्हणून जयंत पाटील यांना ओळखलं जातं. शांतपणे विकासाची कामे करत राहणे ,लोकांचे प्रश्न सोडवणे हे जणू काही त्यांचे छंदच आहेत.

अगदी सकाळी 7 वाजल्यापासून ते मध्यरात्री 2-3 वाजेपर्यंत जयंतराव लोकांत रमतात. शरद पवार यांच्याप्रमाणेच शांतपणे अथक काम करण्याची जयंत पाटील यांची क्षमता आहे. आजही अनेक आमदार जयंत पाटील यांच्याकडे शरद पवार यांचा सर्वाधिक विश्वास असलेले नेते म्हणून पाहतात.

आपण केलेल्या कामाचा जयंतराव कुठेही गवगवा करत नाहीत. महाराष्ट्र कवेत घेण्याची क्षमता असलेल्या या नेत्याचे पाय मात्र अजून जमिनीवर आहेत. कदाचित हेच त्यांच्या आजवरच्या यशाचं गमक असावं. अशा या लोकोत्तर नेत्याला संपूर्ण महाराष्ट्रातर्फे वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!!! जिवेत शरद शतम..!

-भूषण राऊत (लेखक कायद्याचे विद्यार्थी आहेत)

(लेखात व्यक्त केलेली मतं लेखकाची स्वतःची आहेत. त्यासोबत संपादक/मालक सहमत असतीलच असे नाही. आपले लेख आम्हाला thodkyaat@gmail.com वर पाठवा. चांगल्या लेखांना आपल्या नावासह प्रसिद्धी दिली जाईल.)