माणिक सरकार… कार-फोन न वापरणारा आणि सर्जिकल स्ट्राईक करणारा मुख्यमंत्री!

माणिक सरकार… ज्यांच्या नावातच सरकार आहे, मात्र कोणत्याही सरकारपेक्षा निश्चितच वेगळा आहे असा मुख्यमंत्री… त्याच्या सवयी ऐकाल तर तोंडात बोटं घालाल आणि कामं ऐकाल तर तुमचाच तुमच्या कानांवर विश्वास बसणार नाही. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या अहवालातील सर्वात गरीब मुख्यमंत्री… मात्र सर्व मुख्यमंत्र्यांपेक्षा वरचढ अवलिया…

मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला तर कोण हूल उठली. मात्र एखादा मुख्यमंत्री सर्जिकल स्ट्राईक करु शकतो. तोही दुसऱ्या देशावर आणि धक्कादायक बाब म्हणजे एकदा दोनदा नव्हे तर तब्बल 20 वेळा…. होय, तुम्ही बरोबर ऐकताय माणिक सरकारांनी तब्बल 20 वेळा सर्जिकल स्ट्राईक केलंय. कुठल्या राष्ट्रावर माहीत नसेल तर नाव लक्षात ठेवा… बांगलादेश…

मुख्यमंत्री असताना बांगलादेशवर 20 सर्जिकल स्ट्राइक केले, फुटीरतावाद्यांचा नायनाट केला, त्रिपुरात राहणाऱ्या लोकांना त्यांचं सामान्य जगणं परत दिलं आणि तरीही 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेला हा व्यक्ती आजही चक्क सायकलवर फिरतो…

त्रिपुरा भारताचं अगदी पुर्वेकडील राज्य आहे. अशा राज्याचे मुख्यमंत्री असलेले माणिक सरकार त्यांच्या साध्या राहणीमुळे नेहमीच चर्चेत असतात. चार वेळा मुख्यामंत्री पद भुषवणारा हा गडी देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री आहे. चारदा मुख्यमंत्री होणं हे श्रीमंत होण्यापेक्षा अवघड असेल का? मात्र ते त्यांचं सगळं वेतन पक्षनिधीसाठी देउन टाकतात. उलट पक्षाकडूनच त्यांना घरखर्चासाठी दरमहा 5000 रुपये भेटतात. 

माणिक सरकार प्रामाणि असतील, साधेपणाने राहात असतील. त्यांच्यावर एकाही गुन्ह्याची नोंद नसेल तरीही त्यांच्यावर एक आरोप नेहमी केला जातो. तो म्हणजे स्वपक्षातील असो वा विरोधी पक्षातील… कोणताही नेता वरचढ झालेला त्यांना पाहावत नाही. हवी तर एकाधिकारशाहीच म्हणा ना… 

माणिक सरकार यांची राहणी साधी असल्याची सगळीकडे बोंब असली तरी त्यांचे विरोधी मात्र त्यांना नावं ठेवतात. त्यांची राहणी साधी नसल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यासाठी ते सांगतात की माणिक सरकार यांच्याकडे शेकडो कुर्ते आहेत, ते 60,000 रुपये किंमतीचा चष्मा वापरतात, 6000 रुपयांची चप्पल वापरतात.

विद्यार्थी राजकारणातून पुढं आलेले माणिक सरकार राजकारणाच्या पायऱ्या खूप भरभर चढले. त्यांना कुठलाही राजकीय वारसा नाही, अशा वेळी राजकरणात यशस्वी होणं वाटतं तेवढं सोप्पं नसतं.

22 जानेवारी 1949 त्रिपुराच्या उदयपूर मध्ये जन्मलेले माणिक एका सर्वसाधारण परिवारात वाढले. त्याचे वडील अमूल सरकार टेलर होते, तर आई अंजली सरकार आरोग्य विभागात नोकरी करत होत्या. माणिक सरकार यांची राजकारणात विद्यार्थी सचिव म्हणून सुरु झालेली कारकीर्द त्रिपुराच्या मुख्यामंत्रीपदापर्यंत पोहचली. 

1998 साली माणिक सरकार धनपूर मधून आमदार झाले, त्याना त्रिपुराचं मुख्यमंत्री पद मिळालं, मग त्यांना कोणीही हटवू शकलेलं नाही. त्यांच्या पक्ष भारतीय कम्युनिस्ट पार्टी  – मार्कसिस्टने राज्यात आतापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणूका 50% पेक्षा जास्त मतांनी जिंकल्या आहेत. देशभरात विजय मिळवणाऱ्या भाजपसमोर देखील त्रिपुराचे माणिक सरकार आव्हान म्हणून उभे आहेत. 

जेव्हा माणिक सरकार मुख्यमंत्री बनले, तेव्हा त्रिपुरामध्ये फुटीरतावादी लोकांनी हैदोस घातला होता. त्रिपुरा हे राज्य भारतापासून वेगळं करण्याचे प्रयत्न केले जात होते. एक वर्षापासून राज्यात लष्करी कायदा आफ्सपा लागलेला होता. पण माणिक सरकार यांनी केंद्र सरकारचीची कामं देखील स्वत:च करत बांगलादेशसोबत बोलणी केली आणि 20 वेळा बांग्लादेशमध्ये सर्जिकल स्ट्राईक केलं. फुटीरतावाद्यांची लपण्याची ठिकाणं नष्ट केली. काही वर्षात त्यांनी राज्यातून फुटीरतावाद कायमचा संपवला. माणिक सरकार यांच्या प्रयत्नांमुळेच 2015 मध्ये त्रिपुरामधून आफ्सपा देखील हटवण्यात आला.

माणिक सरकार यांची ही माहिती वाचल्यावर अनिल कपूरचा नायक सिनेमा आठवल्याशिवाय राहात नाही. देशातील प्रत्येक राज्याला असा ‘माणिक’ मिळाला तर जनता अशा ‘सरकार’ला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही. त्रिपुरा त्याबाबत भाग्यवानच म्हणावं लागेल.

महाराष्ट्राला असं सरकार कोण देऊ शकेल? खालील कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा….

जय महाराष्ट्र!!!

1 Comment

Comments are closed.