नेतेहो!!! आतातरी तुमच्यातील छिंदम प्रवृत्तीला ठेचा, अन्यथा…

श्रीपाद छिंदम नावाचा एक विषारी प्रवृत्तीचा मानव(?) नगरच्या महापालिकेत उपमहापौर पदावर राज्य करत होता. ज्या छत्रपतींनी रयतेचं राज्य म्हणजेच स्वराज्य निर्माण केलं, त्या राजांच्या जयंतीच्या तोंडावरच इतक्या गलिच्छ पद्धतीचं वक्तव्य केल्याचा निषेध किती करावा आणि कसा करावा हे कळत नाहीय.

आज छिंदम नावाची प्रवृत्ती थेट सत्तेत बसली हे या पुरोगामी महाराष्ट्राचं मोठं दुर्दैव आहे. राज्याच्या राजकारणात असेल किंवा देशाच्या राजकारणात असेल अशा छिंदमांची कमी नाही. बोलताना तोल गेला आणि मग माफी मागितली. आत्मचिंतन केलं, सत्ता सोडली, पदावरून हटवलं, दिलगिरी आणि अटक हे सगळं सगळं घडत राहील, घडतंय आणि घडेलही. मात्र ही प्रवृत्ती वेळीच ठेचणं गरजेचं आहे.

विरोधात राजकारण करत भाजपा आज सत्तेत बसली असताना त्या खुर्चीला किती काटे असतात, याचा त्यांना आता प्रत्यय येत असेल मात्र बेरजेचं राजकारण करताना निष्ठावंतांची वजाबाकी झाली हेही पक्षश्रेष्ठीना कळत असेल. मोदी लाट म्हणत चालत्या वाहनाला हात करत आत आलेले डोमकावळे खऱ्या अर्थाने भाजपा नावाची नौका डूबवणार, असं ठाम चित्र आज डोळ्यासमोर दिसतंय. राजेंच्या जयंतीच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी करत असताना कामाला होणारा विलंब हा समाज समजू शकतो, मात्र त्या बोलण्यामध्ये असणारी मस्ती, गुर्मी, शब्दांची पातळी हा समाज कधीच विसरणार नाही.

गडकिल्ल्यांचा इतिहास जर श्रीपाद छिंदम नावाच्या मस्तवाल माणसाला माहित नसेल तर त्याच गडावर घोड्यांच्या टापांना बांधून त्याला फरफटत तो दाखवायला हवा. समाजात शांतता प्रस्थापित होते न होते तोच कुणीतरी राजकारणी उठतो आणि सडकछाप बोलून जातो. तुम्ही आम्ही केवळ निषेध करायचे, पुतळे जाळायचे, चौकात येऊन घोषणा द्यायच्या, सभा घ्यायच्या. मात्र आता ही प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी सरसावलं पाहिजे.

भडक वक्तव्य केल्यानं समाजात प्रसिद्धी मिळते या भ्रमात असणाऱ्या मूर्ख राजकारण्यांना गाडायला शिकलं पाहिजे. कोणतीही सत्ता जर पूर्णतः एकतर्फी गेली तर त्यात हवा शिरते आणि आता तीच हवा पावलोपावली उभा महाराष्ट्र पाहतो आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करताना श्रीपाद छिंदम

अन्नपुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्यातील कलंदर आणि वासनांधपणा ‘हिरवा देठ’ आणि ‘चल म्हणलं की चालली’ या वाक्यांमधून दिसतो. मद्य विक्रीत वाढ व्हावी म्हणून त्याला महिलांची नावे द्यावीत, अशी शक्कल लावणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन असतील, खेड्यामातीत राबराब राबून अन मातीत गाडून घेऊन काळ्या मातीतून पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना अस्सल गावरान हासडत ‘साले’ म्हणणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे असतील, संभाजी महाराज वडिलांशी भांडून मुघलांना मिळाले असे, अक्कलेचे तारे तोडणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरातून हिंदू दहशतवादी तयार केले जातात म्हणणारे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे असतील, शेतकरी पाणी मागत असताना पाणी नाही तर धरणात मुतू काय? म्हणणारे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, सकल मराठा समाजाच्या मोर्च्याची टिंगल उडवताना मुका मोर्चा म्हणत काढलेलं व्यंगचित्रं असेल, देशाच्या पंतप्रधानांना नीच म्हणणारे मनीशंकर अय्यर असतील, गळ्यावर सुरी ठेवली तरी भारत माता की जय म्हणणार नाही असं म्हणणारी ओवेसी नावाची औलाद असेल, नाहीतर काश्मीर भागात लष्कराचे जवान महिलांवर बलात्कार करतात, म्हणत अक्कल पाजळनारा समाजवादी पक्षाचा आझम खान असेल. शिक्षणमंत्री असणाऱ्या विनोद तावडेंचा शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी ढोल वाजवण्याचा प्रकार असेल, सैनिक सीमेवर असताना त्यांना मुलं होतात कशी ? अशी आपली विचारांची लायकी दाखवणारे प्रशांत परिचारक असतील. माजी मंत्री असणाऱ्या आणि मर्यादेच्या सीमा ओलांडलेल्या लक्ष्मण ढोबळेंना तर स्त्रीयांबद्दल अपमानास्पद बोलल्यामुळे नागपूरच्या अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनातून पळून जावं लागल्याचं जगजाहीर आहे. अशी अनेक नावे या यादीत जोडता येतील.

आज श्रीपाद छिंदम नावाची विखारी औलाद या माध्यामातून समोर आली असली तरीही ती प्रवृत्ती ही मूळतः कुठल्या संस्काराची आहे हे तपासावं लागेल. सातत्याने पक्ष बदलत सत्तेचा मलिदा खाण्याचा प्रकार समोर येतोय. मूळतः काँग्रेसी असणारा छिंदम काहीकाळ शिवसेनेतही होता. आज लाटेत बसून भाजपात आला आणि मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतही… मात्र भाजपाला या प्रकाराने झटका बसणं काही वाईट नाही. वर्षानुवर्षे झेंडे वागवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नशिबी सतरंज्या देऊन अायारामांची बडदास्त करणारे कोणत्या संस्काराचे असतात हे तरी या निमित्ताने जाणले असेल. तरी अशा अनेकांचा पक्ष प्रवेश राहिला आहे, महाराष्ट्रात काही ठिकाणी हातापाया पडण्याचा धंदाही जोरात सुरुय.

वाल्याचा वाल्मिकी करताना लायकी नसणारेही सत्तेत बसतात अन् मग विखार पसरत जातो हे लक्षात घ्यायला हवं. श्रीपाद छिंदमला आयुष्यभर लक्षात राहील, अशी सजा देताना नवी छिंदम प्रवृत्ती जन्म घेणार नाही याची काळजी घ्यायला हवी आणि जागीच ठेचायला हवं. रयतेचं स्वराज उभं करणारा माझा राजा आशीर्वाद घेऊन सत्ता मिळवत मस्ती येऊ देणारा नव्हता, मस्ती उतरवणाराही होता हे तरी लक्षात येईल…

-विकास विठोबा वाघमारे ( लेखक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहेत. )

( लेखात दिलेल्या मतांशी संपादक/मालक सहमत असतीलच असे नाही. तुमचे लेख आम्हाला contact@thodkyaat.com वर पाठवा. )