दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांनी स्वारी; पाहा कसा रंगणार शिवजयंती सोहळा

19 फेब्रुवारी या दिवशी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गड किल्ल्यांवर, गाव-खेड्यात शिवभक्त मोठ्या उत्साहात ती साजरी करतात. या दिवशी मिरवणुका काढल्या जातात, पोवाड्याचे कार्यक्रम होतात, रक्तदान शिबीरं आयोजित केली जातात.. शिवजयंतीला असे बरेच उपक्रम शिवप्रेमी करत असतात…

यावर्षी शिवजयंती हा महाराष्ट्राचा वारसा सांगणारा उत्सव सगळा देश पाहणार आहे. त्याचं कारण या वर्षी 19 फेब्रुवारीला शिवजयंती देशाच्या राजधानीत साजरी होणार आहे. त्याचबरोबर पुढचा महिनाभर दिल्लीत विविध मराठी सांस्कृतीक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

-दिल्लीत पहिल्यांदाच राष्ट्रपतींच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारीला सुरुवात देखील झाली आहे.

-19 फेब्रुवारीला दिल्लीत महाराष्ट्र सदनापासून ते इंदीरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रापर्यंत शोभायात्रा काढली जाणार आहे. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत पुढील कार्यक्रम होईल. त्या शोभायात्रेत महाराष्ट्रातील विविध कला सादर करणारे कलाकार सहभागी असणार आहेत.

-शोभायात्रेत सहभागी होणाऱ्या कलाकारांमध्ये पुण्याच्या 300 कलाकारांचं स्वराज्य ढोल पथक, 200 वारकऱ्यांची दिंडी, 20 शाहिरांचं पथक, 80 मर्दाणी खेळ दाखवणाऱ्या कलाकारांचं पथक, धनगरी ढोल पथक या सगळ्यांचा समावेश आहे. हे सर्व कलाकार दिल्लीवासियांना महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवणार आहेत.

-रामलीला मैदानावर 11 मार्च ते 18 मार्च दरम्यान महाराष्ट्रातील वारकऱ्यांची परंपरा सांगणारा, ज्ञानेश्वरी महापारायण आणि हरिनाम सप्ताहचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातून 50-60 हजार वारकरी सहभागी होतील, असा आयोजकांचा अंदाज आहे.

-या सप्ताहात मराठी कीर्तनकारांसोबत हिंदी कीर्तनकार देखील सहभागी होणार आहेत. तसेच बाबा रामदेव, योगी आदित्यनाथ यांना बोलवण्याची तयारी देखील आयोजक करत आहेत. 

-शिवाजी महाराजांचे पराक्रम सांगणारं ‘जाणता राजा’ हे महानाट्य दिल्लीत लाल किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर 6 एप्रिल ते 11 एप्रिल या काळात सादर केलं जाईल. महाराष्ट्राबाहेरील लोकांना शिवराय कळावेत, यासाठी हे महानाट्याचं हिंदीत नाट्यरुपांतर करण्यात आलं आहे.

-‘जाणता राजा’ हे महानाट्य महाराष्ट्रात बऱ्याचदा सादर झालं असेल, दिल्लीत लाल किल्ल्यासमोर हे जेव्हा पहिल्यांदा सादर होईल तो क्षण दिल्लीवासfय मराठीजणांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

-या कार्यक्रमाला देशाचे राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील उपस्थित राहावं, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.