चड्डी फुल झाली, मात्र बुद्धीचं काय?

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलताना या छिंदमची जीभ कशी नाही झडली? हा पहिला प्रश्न, दुसरं म्हणजे “छिंदम ही मोघलांची अवलाद तर नाही ना?” असे एक ना अनेक प्रश्न आज सर्वांच्या डोक्यात घोंघावतायत. कारण आज छिंदमनं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलून भाजप आणि आरएसएसच्या नावाला कालिमा तर फासलाच आहे, पण त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीलाही डाग लागलाय.

ज्या महाराष्ट्राच्या मातीत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, समाजसुधारक महात्मा फुले इत्यादी जन्मले, आपल्या विचारांनी महाराष्ट्राचा झेंडा सातासमुद्राबाहेर फडकवला, आज त्यांनीच रुजवलेल्या विचारांना महाराष्ट्रातल्याच एका छिंदमनं छेद दिला. ही बाब महाराष्ट्रासाठी दुर्देवी आहे. अशा बुसरटलेल्या विचारांवर जगणाऱ्या “छिंदमला महाराष्ट्रात राहायचा काय अधिकार आहे”? यापुढे “छिंदमनं तरी महाराष्ट्रात का रहावं?”

‘चले चलो मोदींजीं के साथ, शिवछत्रपतीं का आशीर्वाद!!’ ही टॅग लाईन घेऊन भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली. राज्यात एक आनंदाचं वातावरण होतं, शिवभक्तांमध्ये उत्साह होता, सळसळत्या तरुणाईनं महाराजांचं नाव घेत भाजपला मतदान केलं, कारण या तमाम जनतेबरोबर माझ्या राजाला मानणाऱ्या शिवभक्तांचे ‘अच्छे दिन’ येणार होते. पण पदरी निराशा पडली, बरं निराशा कोणी केली तर, जी भाजप महाराजांच्या नावानं सत्तेवर आली, त्यांच्याच उपमहापौरांनं माती खाल्ली. जो छिंदम आरएसएसच्या मुशीत वाढला, शाखेत हेच संस्कार दिले का? बरं हे एका छिंदमचं रूप समोर आलं, असे किती छिंदम लपले आहते, कोणास ठाऊक?

खरं तर २१ व्या शतकात आज छिंदम सारखा नीच प्रवृत्तीचा माणूस आपल्या महाराष्ट्रात असणं ही लाजिरवाणी बाब आहे. एकीकडे इतिहासाच्या पुस्तकातून आपण महापुरुषांचे धड़े द्यायचे आणि दुसरीकडे अशी भाषा वापरून आपली लायकी दाखवायचं काम छिंदमसारखी लोक करतायत, या प्रवृत्तीला ठेचण्याची जबाबदारी कोणा एकाची विशिष्ठ जातीतल्या वर्गाची नाहीय तर, तमाम महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांची आहे. हा प्रश्न एका जातीचा नाहीय तर, आपल्या महाराष्ट्राच्या मातीचा आहे. भाजप सरकार हे आधीच बदनाम होत चाललंय, त्यात छिंदमनं त्यावर अधिकृतरित्या शिक्कमोर्तब केलं.

महाराष्ट्र असेल किंवा गुजरात राज्य जातीजातीत विभागलं जातंय. देशहितासाठी ही बाब चांगली नाहीय. पण आरएसएसच्या शाखेतल्या लोकांच्या हाती जेव्हापासून देशाची सूत्रं गेलीयत तेव्हापासून ही प्रकरणं जास्त वाढत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करतोय. शेतात काबाडकष्ट करणारा शेतकरी रोज आत्महत्या करतोय पण दुसरीकडे गांधी तुमचे, सावरकर आमचे असा भेदभाव होताना दिसतोय.

आम्ही सामान्य आहोत, नोकरी-धंदा, शेतीतून मिळणारी भाकरी खाणारे आहोत. पण शाहू-फुलेंच्या विचारांवर जगणारे आहोत. त्यामुळे गांधी कोणाचे आणि सावरकर कोणांचे हा वाद रंगवण्यापेक्षा त्यांचे विचार छिंदमसारख्या लोकांवर केले असते, तर आज ही वेळ आली नसती. मुळात कोणाचे विचार, कोणावर आणि ते कोणी लादावे यासाठी सध्या चढाओढ सुरु आहे. आरएसएसच्या विचारसरणीच्या विरोधात बोलणारे आणि वागणारे या देशात कमी नाहीत. महाराष्ट्रात आरएसएस म्हणजे शिवछत्रपतींचे विचार न माननारी संघटना असं एक चित्र उभं केलंय.

काही दिवसांपूर्वीच नितीन गडकरींचा एक फोटो व्हायरल झाला, त्यामध्ये दिल्लीच्या राजपथावर लोकमान्य टिळकांचा चित्ररथ आला तेव्हा गडकरी उभे राहिले होते आणि यंदा छ्त्रपतींचा देखावा आला तेव्हा गडकरी बसले होते. गडकरीबद्दल व्हायरल झालेले हे फोटो आरएसएस कसं छत्रपतींच्या विचारांना झुगारणारं आहे, हे सांगण्यासाठी पुरेसं आहे. त्यात छिंदमनं केलेलं वक्तव्य हे त्यावर मोहर उमटवणारं आहे.

छिंदमनं केलेलं वक्तव्य हे त्यांच्यातला मुजोरपणा दाखवणारं आहे. सरपंच ते प्रधानमंत्री हे घोषवाक्य दिलं, त्यामुळे सर्वच स्तरावर भाजपनं सरशी मारलीय. सत्तेची हवा इतकी डोक्यात गेली की काम जनतेचं करायचं असतं याचा विसर पडू लागला, हळूहळू मुजोरीची भाषा बाहेर पडू लागली, पत्रकार असतील किंवा शेतकरी सर्वांनाच हमरी-तुमरीची भाषा ऐकावी लागतेय. जनतेनं निवडून दिलं ते जनहिताच्या कल्याणासाठी पण इकडे मुजोरीपणानं कळस गाठलाय.

आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवतांनी कमाल केलीय. लढाईबद्दल केलेलं वक्तव्य तर हास्यास्पद होतं. सीमेवर रोज एक तरी जवान शहीद होतोय, जवानांचं कुटुंब चितेंत आहे, अशात जवानांना धीर देण्याचं काम करण्यापेक्षा त्याचा आत्मविश्वास कमी करण्याचं काम भागवतांनी केलंय. भागवत असतील किंवा छिंदम असेल दोघेही एकाच शाळेतले विद्यार्थी, त्यामुळे मास्तरांनी यांची चड्डी फुल जरी केली असली तरी बुद्धीचं काय? या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरीत आहे.

-वैभव परब (लेखक पत्रकार आहेत)

( तुमचे लेख आम्हाला contact@thodkyaat.com वर पाठवा. )