सिद्धीविनायकाची दिवसाढवळ्या लूट, कोण आहेत सिद्धीविनायकाचे लुटारु?

प्रभादेवीचं सिद्धीविनायक मंदीर म्हणजे समस्त मुंबईकरांचं श्रद्धास्थान… मात्र मुंबईकरांच्या याच श्रद्धास्थानावर दिवसाढवळ्य़ा सुरुय लूट. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भातील व्हिडिओनं धुमाकूळ घातला आहे. आतीश करंजावणे देशमुख नावाच्या तरुणाने काढलेला व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झाला आहे. जाणून घेऊया तुमच्या आमच्या धार्मिक भावनांशी नेमका कशाप्रकारे छळ सुरु आहे-

काय आहे प्रकरण?

अतिश करंजावणे-देशमुख नावाचा मुंबईत राहणारा ब्रॉडकास्ट इंजिनिअर असलेला तरुण 9 फेब्रुवारी रोजी सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी गेला होता. दर्शन झाल्यानंतर त्याने दानपेटीत टाकण्यासाठी काही रक्कम पुजाऱ्याकडे दिली. मात्र पुजाऱ्याने ती रक्कम दानपेटीत न टाकता स्वतःच्या कंबरेला खोचली. हा प्रकार पाहून अतिशला धक्काच बसला.

मंदिर प्रशासनाकडे तक्रार-

पुजाऱ्यांच्या वागण्याने हैराण झालेल्या अतिशने पुजाऱ्याला सुनावण्याचा प्रयत्न केला. मात्र पुजाऱ्यांपुढे त्याचा निभाव लागला नाही. त्याने मंदिराचे उपाध्यक्ष रवी जाधव यांची भेट घेतली. यावेळी अतिशने आक्षेप घेतलेले पुजारी चंद्रकांत मुळे यांना रवी जाधव यांनी बोलावून घेतले. यावेळी त्यांचं सोवळं तपासलं असता त्यात मोठी रक्कम आढळल्याचं अतिश सांगतो. यावेळी पुजाऱ्याने आपण ही रक्कम दानपेटीत टाकणार असल्याचं सांगितलं. अतिशने याप्रकरणी सिद्धीविनायक ट्रस्टकडे लेखी तक्रार नोंदवली आहे. तसेच दादर पोलीस ठाण्यातही तक्रार दिलीय.

पुजाऱ्यांवर काहीच फरक नाही-

अतिशने काही दिवसांनंतर पुन्हा सिद्धीविनायक मंदिराला भेट दिली तेव्हा तिथं चाललेला प्रकार पाहून त्याला धक्काच बसला. पुजाऱ्यावर काहीच कारवाई झाली नव्हती उलट दानपेटीत टाकण्यासाठी भाविकांनी दिलेले पैसे स्वतःच्या सोवळ्यात खोचण्याचं प्रकार राजरोसपणे सुरु होतं. छोट्या किंमतीच्या नोटा पुजारी दानपेटीत टाकत होते. मात्र पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा मात्र स्वतःच्या सोवळ्यात लपवत होते. अतिशने यावेळी मात्र या प्रकाराचा व्हिडिओ बनवला.

पाहा अतिशने बनवलेला व्हिडिओ-

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल-

सिद्धीविनायक मंदिरात श्रद्धेच्या नावाखाली भक्तांची कशी लूट सुरुय हे सर्वसामान्यांना कळावं यासाठी अतिशनं फेसबुक लाईव्ह केलं. तसेच मंदिरात शूट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की पुजारी पैसे दानपेटीत टाकल्याचा अभिनय करुन प्रसादाच्या भांड्यात पैसे लपवत आहे आणि नंतर स्वतःच्या सोवळ्यात खोचत आहे. पुजाऱ्याची हुशारी व्हिडिओत दिसत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. तसेच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला. त्याचा हा व्हिडिओ साडेतीन लाख लोकांनी पाहिला असून साडेचार हजार लोकांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

आता पुढे काय???

अतिशने याप्रकरणी मंदिर प्रशासन तसेच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. मात्र अद्याप तरी कोणतीहीह कारवाई करण्यात आलेली नाही. पुजाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात येतंय. तसेच त्यानंतर कारवाईचं ठरवू, असं मंदिर प्रशासनाचं म्हणणं आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाकडून उडवाउडवीचं उत्तरं दिली जात असल्याचं दिसतंय. पोलिसांकडूनही याप्रकरणी अद्याप कोणतंच आश्वासक पाऊल उचलण्यात आलेलं नाही. ज्या दिवशी हा प्रकार घडला त्या दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज मिळावं, अशी मागणी माहिती अधिकार कायद्यांतर्गत अतिशने मंदिर प्रशासनाकडं केली आहे. मात्र अद्याप तरी त्याला हे फुटेज देण्यात आलेलं नाही. 

अतिशला हवीय तुमची साथ!-

अतिशच्या तक्रारीला मंदिर प्रशासन तसेच पोलिसांकडून केराची टोपली दाखवल्याचं दिसतंय. त्यामुळे भाविकांचे पैसे लाटण्याच्या या धंद्यात पुजाऱ्यांसोबत मंदिर प्रशासनातील बड्या धेंडांचा तर समावेश नाही ना? असा सवाल उपस्थित होतोय. पुजारी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला हवी, मात्र त्याला पाठीशी घालण्याचं काम केलं जातंय. पुजाऱ्यासोबत बडी धेंडं यात सहभागी असतील आणि सगळ्यांच्या संगनमताने पैसे लाटण्याचा प्रकार घडत असेल तर तुम्ही आम्ही दानापोटी दिलेले हजारो कोटी रुपये आजपर्यंत यांनी स्वतःच्या घशात घातले असतील.

अतिश म्हणतो, “हा लढा जसा माझा आहे तसा तो सर्वसामान्य जनतेचा आहे. आज सोशल मीडियाची ताकद खूप मोठी आहे ती एखादी सत्ता उलथवून लावू शकते हे आपण पाहिलंय. त्यामुळे लोकांनी जोर लावला, तर हा घोटाळा सहज समोर येऊ शकतो. याप्रकरणी नागरिकांनी माझ्यासोबत उभं राहावं, असं आवाहन अतिशनं केलंय. 

पहा अतिश काय म्हणतोय-

तुम्ही अतिशच्या लढ्यात सहभागी आहात का? असाल तर ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा…