#शालजोडीतून… | कथा बाजारवाडीचा बाजार उठल्याची…

बाजारवाडीचा बाजार उठल्याची सकासकाळी दबकत चाललेली कुजबुज, सूर्य जसजसा वर यायला लागला तसतशी पारावर, कट्ट्यावर, चावडीत, बांधावर, खळ्यावर, बोळाबोळात, घराघरात उघडउघड चर्चा चालू झाली.

“परसाकडं गेलुवतो तवा वरच्या बांधान गठूळ घेऊन जाताना दिसलं कोणतरी, बहुतेक त्योच असावा’ सदाआप्पान माहिती दिली,

“काय पण म्हणा, पण सरपंचाला भावकीचा लैच पुळका, पळून जायला फूस बघा याचीच असणार” दात कोरत कोरत बणे मास्तरांनी मुद्द्याला हात घातला.

“व्हय, बरोबर हाय, असल्या कामधाम सोडून गावभर उंडरणाऱ्याच्या बोडक्यावर वाडीची सगळी कमाई घालावीच कशाला सरपंचांन? ऑ? काढा पुडी.”

सदाआप्पान हात पुढं केला,

तिरळे अण्णांनी आप्पाच्या हातात बटवा ठेवत, “आता उपटण्याशिवाय आपल्या हातात राहिलंय तरी काय?” खंत व्यक्त केली.

अशी पारावर चर्चा चालू असतानाच इकडं घराघरात, मढ बसवलं त्यज, कुठं उलातला काय माहित?, पचणार नायर भाड्या तुला, वगैरे वगैरे कमलपुष्प महिलावर्गाकडून उधळली जात होती.

एकूण प्रकरण गंभीर होते, गावकऱ्यांनी स्वकष्टाने उभ्या केलेल्या बाजारवाडी सहकारी पतसंस्थेचा बाजार उठला होता.

सोनाचांदीचे मोठे दुकान काढतो म्हणून, सरपंचाच्या मागे लागून चेअरमन ला हाताशी धरून अकरा लाख रुपयांचे कर्ज काढून, निरवबापूने पोबारा केला होता.

सरपंच असा भावकीवर वरदहस्त ठेवत असतो हे गावकऱ्यांना पण आता कळून चुकलं होत, पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण?

सरपंच पण लय तयारीचा माणूस, गावचा रागरंग ओळखून आपल्या चेल्याचपाट्यांना कामाला लावलं,

आधीच्या सरपंचाने त्याला बँकेतल पैसे दिले, आपल्या या सरपंचाचा काय हात नाय, असं ही चेली गावभर सांगत सुटली, चार दोन ठिकाणी लाटणी, फुकण्या कपाळावर बसल्यावर, गप येऊन चावडीत बसली.

गावभर बोंब झाल्याने सरपंचाने लागलीच मर्जीतले चार अधिकारी बोलावलं, आणि निरवबापूच्या घरावर धाड टाकून, जप्ती चालू करायला सांगितली.

घरात किडुक मिडुक मागं सोडून सगळं सोननान, पैसे गाठीला बांधून निरवबापूने पोबारा केल्यावर आता कसला पंचनामा करायचा हा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर होता.

पण सरपंचान तंबी दिल्यानं, जप्ती चालु झाली.

“घराची किंमत सात लाख रुपये” अधिकारी ओरडला, दुसऱ्याने टिपून घेतले.

“आवं, पन्नास हजारात पण कोण घेणार नाय, सगळं घुशीन पोखरलंय, कौलं फुटल्यात, आन तुम्ही सात लाख…….” कोणतरी गर्दीतून ओरडलं,

सरपंचान रागानं गर्दीकडं बघितलं, तशी गर्दी चपापली.

“बाजलं ३७००० लाव”

“ऑ मोडलंय ते, त्याचं ३७०००….…” गर्दीत कोणतरी पुटपुटलं.

तसं सरपंच बाह्यसारून पुढं धावलं, गर्दी चार पावलं मागं सरली, मग पंचनामा सुरळीत सुरू झाला.

“चार ताटे २२००० लाव”

“दोन प्लास्टिक बादल्या, ८९५६”

“दोन खुर्च्या ३३६४५”

“चार पातेली ५२४६७”

“तीन घमेली २३७८५”

“आठ चमचे १३४६४”

“चहाची गाळण २२५६”

“वापरलेलं ब्लेड १२४५”

असं एक एक जिन्नस काढून त्याची किंमत ठरवली गेली, एकूण सर्व गोष्टीचा पंचनामा झाल्यावर गोळाबेरीज चौदालाख बावन हजार तीनशे ब्याऐंशी रु. झाली,

सरपंचाने मिशिवरून हात फिरवून गावकऱ्यांकडे पाहिलं,

“बघा आपण त्याला अकरा लाख दिलते, अन माल कितीचा जमा केला? ऑ? साडेचौदा लाखाचा, अडीच लाख हाय का नाय फायद्यात?”

एव्हढं म्हणायचा अवकाश, चेल्या चपाट्यांनी मोठा जल्लोष केला,

बाकी सारपंचाचा हा पंचनामा बघून दोघ जाग्यावर चक्कर येऊन पडली, तिघांची दातखिळी बसली, पाच जणांनी तोंडं वासली, बाकीची डोकं खाजवित होती.

अशाप्रकारे सगळ्या बाजारवाडीचा बाजार उठवून सरपंच आठ दिवसासाठी महाबळेश्वर कडे रवाना झाले.

 

लेखक- अमोल शिंदे- amolshinde25@gmail.com

(लेखातील मतांशी संपादक/मालक सहमत असतीलच असे नाही. आपले लेख आम्हाला contact@thodkyaat.com वर पाठवा)

1 Comment

  1. भट्टी मस्त जमलीय अमोल
    चालुदे
    शुभेच्छा आहेतच

Comments are closed.