तेच ते आणि तेच ते… गुळमुळीत प्रश्न आणि गुळमुळीत उत्तरं!

पवारसाहेबांनी एखाद्या आमदाराला ऐन निवडणुकीच्या तोंडावर फोडावे, तसे थेट राज ठाकरेंनाच मुलाखतीच्या दिवशी दुपारी फोडले आणि प्रश्न माहिती करुन घेतले की काय, असे वाटावे. इतके नेहमीचे प्रश्न. नथिंग न्यू. तेच गुळमुळीत प्रश्न आणि तीच गुळमुळीत उत्तरं.

 

खरंतर दोन्ही नेते फेव्हरेट आहेत. फेव्हरेट असण्याचे निकष वेगवेगळे आहेत. दोघांच्या बाबतीतही. एक सडेतोड म्हणून, तर दुसरा अभ्यासू म्हणून. एक बेधडक म्हणून, तर दुसरा सर्वव्यापी म्हणून. आजची मुलाखत पाहण्यासाठी खूप दिवसांपासून आतूर असण्याची ही काही कारणे. पण हिरमोड झाला.

 

राज ठाकरेंकडून असे प्रश्न येतील, ज्यांच्या उत्तरातून शरद पवारांचे नवे पैलू कळतील, अशी एक साधारण अपेक्षा होती. ‘अपेक्षा होती’ असे मुद्दाम म्हटले नाही. जाणीवपूर्वक म्हणतोय. कारण नवे पैलू असे काहीच कळले नाहीत.

 

कदाचित पवारसाहेब हे व्यक्तिमत्व महाराष्ट्राला परिचित आहे. त्यांची बरीचशी माहिती सर्वांना माहित आहे. म्हणून कदाचित नावीन्य असे काही राहिले नसेल. पण इथे राज ठाकरे नावाचा एक हजरजबाबी आणि वेगळ्या धाटणीचा नेता मुलाखत घेणार होता, म्हणून अपेक्षा अर्थात वाढली होती. पण निराशा पदरी पडली.

 

राज यांचे काही प्रश्न तर इतके उथळ वाटले की, राज्याचे राजकारण करणाऱ्याला इतके कमी ज्ञान आहे की सर्वसामान्यांचे प्रश्न म्हणून ते विचारत आहेत, असा साहजिक प्रश्न पडावा.

उदा. “शाहू-फुले-आंबेडकर यांच्यासोबत तुम्ही शिवाजी महाराजांचे नाव का घेत नाही?”. या प्रश्नावरून राज यांची वैचारिक बैठक ‘शिवाजी पार्क लिमिटेड’ असल्याची दिसली. अरे बाबा, महाराष्ट्रात बहुजन चळवळी वगैरे झाल्या. एकदा अभ्यासा. दादरमध्ये नसतील जाती-बिती दिसत. पण या शहरांच्या लखाखत्या काचांबहेर एक ग्रामीण जग आहे, तिथे जा. आहेत तिथे जाती आणि त्यावरुन जीव जाईपर्यंतचे वाद. ते मिटवण्यासाठी शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार कामी येतात. आणि शाहू-फुले-आंबेडकर हे तिघेही आमच्या राजाला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनाच गुरु मानत होते. असो. आरक्षणाचा विषय सुद्धा तसाच होता. पण ज्यांना सामाजिक विण माहित नाही, त्यांच्याकडून अपेक्षा करणे योग्यही नाही. त्यामुळे तेही असो.

 

पवारांनी जे सांगितले ते सारे कधी त्यांच्यावरील लेखातून, कधी त्यांच्या स्वतःच्या भाषणातून, कधी त्यांच्यावरील चरित्रातून, कधी त्यांच्या आत्मचरित्रातून, कधी पत्रकारांच्या गॉसिप्समधून, कधी पवारांच्या जवळच्या माणसांकडून…. कुठून ना कुठून, कधी ना कधी ऐकलेले होते. त्यामुळे राज ठाकरेंनी मुलाखतीतून विशेष असे काय वेगळे, हा प्रश्न आहे? किंवा मीच अपेक्षांचा रबर खूप ताणला होता आणि त्यामुळे तो तुटला असावा, असेही झाले असेल.

 

बाकी दोघंही महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे नेते आहेत. पवारसाहेब राज्यव्यापी लोकनेते, तर राजसाहेब नाही म्हटले तरी मेट्रो सिटींचे नेते आहेत. पवारांना राज्याच्या कानाकोपऱ्याची नस माहित आहे, तर राजना शहरांची. ओव्हरऑल दोघेही मोठेच आहेत. त्यामुळे राज्याच्या दोन वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांना एका व्यासपीठावर पाहणे, तेही मुलाखतीच्या फॉरमॅटमध्ये, ही गोष्ट नक्कीच वेगळी होती.

 

मुलाखतीचे स्वरुप कसे असावे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही मुलाखत. प्रश्न आणि उत्तर. दोन्हींमध्ये वेळेचं अंतर. शांत आणि रचनात्मक. आक्रमक न होता, कुठेही कुणाला न रोखता संवाद. उत्कृष्ट व्यंगचित्रकार, उत्तम वक्ता, सडेतोड राजकारणी इत्यादी गुणांसोबत आता उत्तम मुलाखतकार म्हणूनही राज लक्षात राहतील. एका क्षणी वाटले, सुधीर गाडगीळांच्या पोटावर पाय आणतील की काय. इतका उत्तम संवाद राज यांनी साधला. फॉरमॅटवाईज म्हणतोय मी, कंटेंटवाईज नव्हे.

 

असो. महत्त्वाचे म्हणजे, राज्यातील दोन नेत्यांनी एका व्यासपीठावर येऊन, विरोधक असलो तरी मनभेद नाहीत, हा संदेश दिला. विरोधी विचारांना न जुमानता राजकारण करणाऱ्यांच्या काळात हेही नसे थोडके.

 

पवारसाहेब आणि राजसाहेब, दोघांनाही पुढील वाटचालीस शुभेच्छा.

 

– नामदेव अंजना ( लेखक ABP माझा वृत्तवाहिनीत पत्रकार आहेत )

(लेखातील मतांशी संपादक/मालक सहमत असतीलच असे नाही. आपले लेख आम्हाला contact@thodkyaat.com वर पाठवा)