चघळायला चोथा न मिळाल्याचे शल्य…

अखंड महाराष्ट्राला उत्सुकता लागलेली मा. राज ठाकरे घेणार असलेली आदरणीय पवार साहेबांची ती बहुप्रतिक्षित मुलाखत काल अखेर पुण्याच्या BMCC मैदानावर पार पडली. मुलाखती दरम्यान काय झाले? कोणते प्रश्न विचारले गेले? काय उत्तरं मिळाली? यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. ते सर्वांसमोर आहे. परंतु एक राजकीय कार्यकर्ता म्हणून मुलाखतीतून मला काय महत्वाचं वाटलं? हे सांगायलाच पाहिजे.

काल झालेली मुलाखत आमच्यासारख्या नवख्या राजकारण्यांना एखाद्या प्रथितयश विद्यापीठाच्या नावाजलेल्या प्राध्यापकाच्या लेक्चरपेक्षा कमी नव्हती. राजकारण हे एकमेव असं क्षेत्र आहे, ज्याचं शिक्षण तुम्हाला सहजा-सहजी मिळत नाही. ते तुम्हाला कष्टातून, कार्यातून, अपयशामधून, जाणिवांमधून, अनुभवातून अक्षरशः कमवावं लागतं. कालची मुलाखत अशाच 5 तपांच्या अनुभवाला ओझरत का होईना प्रत्यक्ष अनुभवायची एक संधी होती. आमच्यासारखे नव्या पिढीचे कार्यकर्ते आज मूल्यांच्या आणि विचारांच्या राजकारणाला कुठेतरी पारखे झालेत, कदाचित तसे मार्गदर्शकच आता बोटावर मोजण्याइतपत राहिलेत. यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्या मूल्याधिष्ठित राजकारणाचा पाया या महाराष्ट्रात रचला ते एव्हाना एखादी प्राचीन संस्कृती लुप्त व्हावी, असं लुप्त होऊन गेलंय.

कालच्या मुलाखतीमधून काय घ्यावं? याचा जर परिपाक काढायचा ठरवला तर, ती मुलाखत वारंवार पाहणं, वेळ असेल तेव्हा पुन्हा पुन्हा त्याची पारायणं करणं गरजेचं आहे. साहेब जेव्हा बोलतात तेव्हा 100% विचारांती बोलत असतात, असा आजवरचा अनुभव. त्यांच्या प्रत्येक शब्दाला अनेक कंगोरे असतात. ते एकदाच वाचून ऐकून लक्षात येणे दुरापास्त. त्याला वारंवार वेगवेगळ्या अँगलने पाहावं लागतं. जितकं तुम्ही पाहाल तितकं नवनवीन तुम्हाला त्यातून शिकायला मिळतं. कालची मुलाखत ही त्याच धाटणीची…

कालचा मुलाखत घेणारा पण काही लेचपेचा नव्हता. निर्भीड, खोचक आणि सडेतोड प्रश्न विचारण्याची धमक असलेला तो राजकारणी होता. तो पत्रकारछाप मुलाखत घेईल, अशी अपेक्षाच चुकीची… त्यामुळे कालची मुलाखत ही खऱ्या अर्थाने वेगळी, ऐतिहासिक आणि महाराष्ट्राच्या राजकीय परंपरांना वेगळी दिशा देणारी होती यात शंकाच नाही.

राज ठाकरेंनी साहेबांना विचारलेला पहिलाच प्रश्न इतका तुफान वेगाच्या चेंडूसारखा होता की, पाहणाऱ्यांना वाटलं गेली विकेट!! पण मुरलेल्या बॅट्समनने अगदी लिलया टोलवून लावावा, असा सहज तो प्रश्न टोलावला. राज ठाकरेंनी अनेक यॉर्कर, लो पिच, गुगली लाईन आणि लेंथवर टाकले. एखाद दुसरा शॉर्ट पिच आणि फुलटॉस पण होता. साहेबांनी प्रत्येक प्रश्न अगदी हसत-हसत आणि चेहऱ्याच्या रेषा इकडच्या तिकडं होऊ न देता उत्तरीत केले. अशा मुलाखतीनंतर मीडियाने भल्याभल्यांच्या ‘ऑफ द ग्राउंड’ विकेट पाडल्याचं पाहिलं आहे.

मीडियाला हवं ते चर्वण काल मिळू शकलं नाही, याचं हेच शल्य असावं. काय करणार शेवटी त्यांचाही धंदा आहे. TRP चा!! त्यांच्या हिशोबाने कालची मुलाखत डोंगर पोखरून उंदीर निघाल्यासारखीच आहे. कारण ‘ब्रेकिंग न्यूज’ च्या धंदेवाईक जमान्यात ‘मेकिंग न्यूज’ नुकसान करणाऱ्याच ठरतात. त्या त्यांना कशा परवडतील? कालची मुलाखत माझ्या मते खऱ्या अर्थाने मेकिंग म्हणजे काहीतरी वेगळं घडवू पाहणारी होती. एक वेगळा विचार एक वेगळा पायंडा पाडणारी होती. दोन वेगवेगळ्या विचारधारेची पण आपापसात एक आपुलकी असणारी व्यक्तिमत्वं भारतभरात एकत्र आलेली मी पाहिलेली नाहीत. आली असली तरी त्यांच्यात अशी खेळीमेळीचा संवाद शक्य नाही. कालच्या मुलाखतीची खासियतच ही की, वैचारिक भिंती वैयक्तिक संबंधांच्या आड येऊ शकल्या नाहीत. अनेक मतभेदाअंती ज्या गोष्टीसाठी हे झगडणं सुरू असतं ती गोष्ट एकच आहे. तेव्हा विचारांचा तात्पुर्तेपणा राजकारणात महत्वाचा असतो, हे साहेबांचं राजकारण बघता लक्षात येतं. विचार आणि राजकारण ह्या परस्परविरोधी बाबी आहेत पण याचा योग्य ताळमेळ राजकारणात असणे महत्वाचे असते. आणि साहेबांनी हे लिलया पेललंय.

कालचा दोन पिढ्यांचा संवाद आजची आमची तिसरी पिढी डोळे भरून पाहत होती. आठवणींमध्ये साठवत होती. कदाचित हे आमच्या नशीबी पुन्हा असेल की नाही, परंतु ही शिदोरी आम्हाला आयुष्यभर पुरेल इतकी मोठी आहे. काय केलं, काय नाही, यापेक्षा काय करायला हवं हे जास्त सांगणारी कालची मुलाखत होती. आणि माझ्या दृष्टीने तेच महत्वाचं होतं.

मीडिया ही मीडियाच आहे. चघळायला चोथा न मिळाल्याचे शल्य त्यांना असणारच. प्रत्येकवेळी त्यांना जे हवं असतं तेच लोकांना हवं असतं, असं कदापि नसतं. कालच्या मुलाखतीने लोकांचा नव्हे तर फक्त मीडियाचा भ्रमनिरास झाला, तो का झाला हे मी समजू शकतो. एका कार्यकर्त्याच्या नजरेतून पाहाल तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रात अनेक नवी स्थित्यंतरे घडवणारी कालची घटना आहे. फक्त धंद्याच्या दृष्टिकोनातून हे मीडियाचं नुकसान आहे यात शंका नाही. सरतेशेवटी एकच सांगणं. आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात मीडियाचे चष्मे लोकांना घालायला भाग पाडू नका. कंटाळा आलाय त्यांना तुमच्या मसालेदार, आचर-वचर, फास्टफूड छाप बातम्यांचा. जरा सकस, हेल्दी येऊ देत जा अधे मधे. हीच अपेक्षा अन ह्याच शुभेच्छा..!

-डॉ सूरज मोटे, गिरवली, ता. भूम, जि. उस्मानाबाद.

(लेखातील मतांशी संपादक/मालक सहमत असतीलच असे नाही. आपले लेख आम्हाला contact@thodkyaat.com वर पाठवा)