“बाबा उठा, बाबा उठा”… “कोण? आदुबाळ? एव्हढ्या पहाटे?” वाचा पुढे…

“बाबा उठा बाबा उठा”

डोक्यावरचे पांघरून बाजूला न काढता, आतुन आवाज…

“मी लाथ मारीन, मी लाथ मारीन”

“बाबा तुम्ही झोपेत अशा लाथा मारून मारून तीन बेड तोडलेत, उठा”

तोंडावरचे पांघरून थोडे बाजुला करत,

“कोण? आदुबाळ? एव्हढ्या पहाटे?”

कपाळावर हात मारत,

“पहाटे? बाबा दुपार झालीय उठा, ते राजकाकांच्याकडे पहा”

“काय पहाण्यासारखे आहे त्याच्यात?” डोळ्यावर चष्मा लावत.

“अहो ते पहाटे उठतात, बारामतीच्या आजोबांनी सांगितल्या पासून, सेल्फी टाकू का पण म्हणलेत”

ताडकन बेडवर उभे राहत

“खामोश” दोन्ही मुठी आवळुन “आदु, आदु माझं अंग थरथरतय, रक्त उसळतय, मस्तकातील शिर उडायला लागलीय रे”

घाबरून

“बाबा, डॉक्टरांना बोलावू का?”

“खामोश, मला राग येतोय”

घाबरत,

“बाबा तुम्ही पहिले बेडवरून खाली उतरा, रागाच्या भरात, लाथा मारून मारून हा नवीन बेड तोडून टाकाल.”

टुनुक,

“आलो खाली, आता बोल”

“का रागवलात बाबा, का?”

“तु सकासकाळी…”

मध्येच तोडत, “बाबा दुपारी”

“तेच ते”

“काय?”

“सकासकाळी… सॉरी आपलं… दुपादुपारी, का यांची नावे घेतोस माझ्या समोर?”

“काय झालं बाबा?”

“काय झालं? काय झालं म्हणुन काय विचारतोस? आम्ही दोन दिवसात चार वेळा लाथ मारायची धमकी दिली, पण मीडियात हे न दाखवता फक्त यांचीच चर्चा”

“कसली चर्चा?”

“या दोघांनी गुपचुप पुण्यनगरी नामक सुभ्यात जाहीर कार्यक्रम घेतला.”

“त्यात काय एव्हढं? तुम्ही पण चोरून भेटला होतातच की”

“शु…… असं बोलायचं नाही, मग आम्ही नाय बोलणार जा”

“असं रुसू नका ना प्लिज”

हाताची घडी घालून दुसरीकडे तोंड फिरवत,

“आम्ही रुसणार”

हताशपणे,

“तुम्ही एव्हढ्या वेळा रुसलात, पण समजुत घालायला कोणी येतंय का? देवेन काका पण दुर्लक्ष करतात हल्ली.”

कपाळावर आट्या पाडत,

‘नावं नको घेऊ, या सर्वांनी मिळून तर आम्हाला एकटे पाडायचा कट केलाय”

“एकटे कुठे? बारामतीचे आजोबा तर म्हणत होते ……”

“काय म्हणत होत?”

“तुम्ही चोरून पाहिलंय की”

“नाही नाही कदापी नाही”

“मी चोरून पाहिलंय, तुम्ही चोरून पहाताना”

तोंडावर बोट ठेवत,

“शु…… असं बोलायचं नाही”

“पण बाबा, नक्की काय म्हणाले हो बारामतीचे आजोबा?”

“तेच तर समजलं नाही ना, म्हणून तर राग येतोय.”

“पण स्तुती तर करत होते आपली”

समजावण्याच्या सुरात,

“आदुबाळ, तिथंच तर खरी गोम आहे, त्यांनी स्तुती केली की घाबरायला होतं.”

आश्चर्यचकित होत,

“का?”

“गोड बोलुन आवळा देऊन कोहळा काढण्यात पटाईत आहेत ते”

निरागसपणे,

” म्हणजे?”

“आता बघ, महाराष्ट्रावर आपलं पेटंट, मुंबईवर आपलं पेटंट, मराठी माणसावर आपलं पेटंट, विदर्भ आपलाच, आणि बाळासाहेब तर घरचेच”

अति निरागसपणे,

“हो, मग?”

“अरे एका मुलाखतीत पळवलेरे आपल्या पासून”

डोक्यावर हात मारत,

“ऑ?”

“हां”

“मग आता?”

मोबाईल काढत,

“संजय काकांना फोन लावतो आता”

सेकंदात फोन उचलला गेला,

इकडून “संजु काय करतोयस?”

तिकडून “अग्रलेख लिहतोय”

इकडून “कशावर?”

तिकडून “मायना लिहून तयार आहे, फक्त नावे टाकायची राहिलेत”

इकडून “म्हणजे?”

तिकडून “मायना रोजचाच आहे, दुसऱ्यांच्या नावाने बोंब, कोणालाही सूट होईल”

इकडून “हुश्शार ते माझं बाळ”

तिकडून “तुम्ही फक्त आदेश द्या, कोणाचं नाव टाकायचं?”

इकडून “बारामतीकर.”

 

लेखक- अमोल शिंदे, संपर्क- amolshinde25@gmail.com

(लेखातील मतांशी संपादक/मालक सहमत असतीलच असे नाही. आपले लेख आम्हाला contact@thodkyaat.com वर पाठवा)