धुळ्यात दीड टन ‘सोनं-चांदी’चं गुप्तधन सापडलं? नक्की काय आहे सत्य???

ब्रिटीशकालीन सोनं सापडण्याच्या घटना काही नवीन नाहीत. आजपर्यंत अनेकवेळा अशा प्रकारच्या बातम्या आल्या आहेत. अनेकदा अशा बातम्या खोट्या असल्याचं आढळलं आहे सध्या सोशल मीडियात अशाच प्रकारची एक बातमी मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे. 

काय आहे बातमी???

“Breaking news धुळे शहरात खजाना सापडला। आज सकाळी 10:30 वाजता नकाणे रोड पांझरा नदी किनारी रोड बनत आहे। रोडची लेवल करतांना जमीन खाली ब्रिटीश कालीन सोने व चांदीचे नाणे सिपडले। सोन्याचे वजन जवळ जवळ दीड टन च्या वर आहे। खुप लोकांनी सोन्याचे नाणी घेऊन गेले । बघ्यांची खुप गर्दी आहे।”

ही ती पोस्ट आहे जीची सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा आहे. धुळे आणि परिसरातच नव्हे तर मुंबई-पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हाहा म्हणता ही पोस्ट व्हायरल झाली आहे. फेसबुक आणि ट्विटरवर तर ही पोस्ट पहायला मिळतेच आहे मात्र सर्वाधिक वेगात ही पोस्ट व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे. मात्र लोक एवढ्या प्रमाणात ही पोस्ट शेअर करत आहेत, तर खरंच असं आहे का? ही पोस्ट सत्य आहे का? हे तपासण्याचा आम्ही प्रयत्न केला.

काय आहे सत्य?

-एखाद्या शहरात अशा प्रकारे खजिना सापडला असेल तर सर्वात आधी पोलीस त्याठिकाणी पोहोचतात. त्यामुळे आम्ही पोलिसांना यासंदर्भात विचारणा केली. पोलिसांनी ही घटना सत्य नसल्याचं सांगितलंय. हा फेक मेसेज असून लोकांनी तो शेअर करु नये, असं आवाहन पोलिसांनी केलंय. 

-एखाद्या शहरात एखाद्या जागी जुना खजिना सापडला तर त्याठिकाणी पुरातत्व खात्याला पाचारण केलं जातं. मात्र पुरातत्व खात्याला या घटनेचा पत्ताही नाहीये. पुरातत्व खात्यानेही आपल्याकडे अशी कोणतीच घटना झाली नसल्याचं सांगितलंय. पोलीस नाहीत किमान पुरातत्व खात्याला अशा घटनेचा गंध नसेल याचा अर्थ नक्की धुळे किंवा परिसरात अशी कोणतीच घटना घडली नसणार.

-शहरात घडणाऱ्या कोणत्याही घडामोडींवर पोलिसांच्या बरोबरीनं लक्ष असतं त्या भागातील पत्रकारांचं… धुळ्यातील नामवंत पत्रकार दीपक बोरसे यांना आम्ही यासंदर्भात फोन केला. त्यांनीही ही फक्त एक अफवा असल्याचं सांगितलं. त्यांनी यासंदर्भात पोलीस आणि पुरातत्व खात्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता मात्र त्यांनी या माहितीला दुजोरा दिला नाही. त्यामुळे या कसोटीवरही ही पोस्ट टिकली नाही.

-ज्या ठिकाणी ही घटना झाली त्याठिकाणचा कुणी प्रत्यक्षदर्शी मिळतो का? यासंदर्भात आम्ही शोधाशोध सुरु केली. बीएसएनएलमध्ये अधिकारी असलेले आणि त्याच भागात राहणारे तुळशीराम पाटील यांच्याशी आम्ही संपर्क केला. त्यांनीही या भागात अशी घटना घडली नसल्याचं सांगितलं, त्यामुळे ही पोस्ट खोटी असल्याचं समोर आलं. 

-घटना सत्य नाही मग अफवेनं जोर का पकडला?

कोणत्याही अफवेनं जोर पकडण्यामागे काही कारणं असतात त्याशिवाय त्या अफवा जोर पकडत नाहीत. आम्हीही ही अफवा जोर पकडण्याचे मागे काय कारण आहे? हे शोधण्याचा प्रयत्न केला. पत्रकार दीपक बोरसे यांनीच आम्हाला यासंदर्भात माहिती दिली. 

व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये खजिना ज्या ठिकाणी सापडला त्या ठिकाणाचं नाव देण्यात आलंय. पांझरा नदी किनारी नकाणे रोडचं काम सुरु असताना हा खजिना सापडला, असा दावा करण्यात येतोय. लोकांचा या पोस्टवर विश्वास या कारणामुळे बसला, की खरंच पांझरा नदीकिनारी नकाणे रोडचं काम सुरु आहे आणि व्हायरल झालेल्या फोटोंमधील त्या जागेचा फोटो या जागेशी अगदी मिळताजुळता आहे.

दुसरा मुद्दा असा की अलिकडे लोक कुठलाही विचार न करता किंवा स्वतःचं डोकं न लावता पोस्ट फॉरवर्ड करण्याचं काम करतात. त्यातही ही पोस्ट गुप्त खजिन्याची आहे आणि गुप्त खजिना किंवा एवढं मोठं घबाड सापडलं असेल तर अशा गोष्टींमध्ये लोकांना जास्त रस असतो. ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होण्यामागे हेही एक महत्त्वाचं कारण आहे.

त्यामुळे आता डोकं वापरा आणि खजिन्याची नव्हे तर ही पोस्ट व्हायरल करा!