उदयनराजेंच्या वाढदिवसाला शरद पवार नेमकं काय म्हणाले?

उदयनराजेंच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात एका खास सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवर नेत्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी उदयनराजेंबद्दल बोलताना शरद पवार काय म्हणाले वाचा-

“साताऱ्यातील विकासाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातारा येथे बोलावून उदयनराजे यांनी पुढाकार घेतला. ज्या घराण्याने नेहमीच रयतेचा विचार केला, त्याचप्रकारे आज उदयनराजे यांनी आपल्या जन्मदिनी रयतेचा विचार करण्याचीच भूमिका घेतली.”

“उदयनराजेंना मी दिल्लीत पाहतो. अनेक वर्षांपासून ते संसदेत आहेत. देशातल्या कानाकोपऱ्यातल्या खासदारांना कुणाचे औत्सुक्य असेल तर ते उदयनराजे यांचे असते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याच्या प्रतिनिधींना आपल्याला एकदा भेटता आले याचे त्यांना समाधान असते.”

“संसदेत काम करताना उदयनराजे महाराष्ट्र आणि साताऱ्याचे प्रश्न हिरीरीने मांडत असतात. उदनराजे यांनी जनतेच्या कामासाठी नेहमीच स्वतःला झोकून दिले आहे. हे काम पुढेही करत राहता यावे यासाठी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळो, अशी शुभेच्छा व्यक्त करतो.”