वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलताना उदयनराजे नेमकं काय म्हणाले?

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. 

या कार्यक्रमात बोलताना उदयनराजे काय म्हणाले???

-सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. मला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या शरद पवार आणि तुम्हा सर्वच लोकांचे आभार मानतो. जेव्हा सर्व मान्यवर त्यांचे मनोगत व्यक्त करत होते, तेव्हा मी इकडे-तिकडे आवर्जून पाहात होतो की, इथं कोणी हरभऱ्याचं झाड लावलं आहे का???? कारण नसताना माझी स्तुती केली, त्यामुळे माझं मन भारावून गेलं. पण खरं सांगतो. काल, आज आणि उद्या जे करणार ते तुम्हा सगळ्यांना आणि या मान्यवरांना केंद्रबिंदू ठेऊन… माझं कर्तव्य म्हणून करणार…. त्यात कुठेही कमी पडणार नाही…

-सत्ता असो वा नसो त्याला मी फार किंमत देत नाही. मात्र जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत तुमच्या सगळ्यांसाठी मी लढणार. आपण सर्व वेळ काढून आलात, त्यामुळे या कार्यक्रमाला शोभा आली. अनेकांनी त्यांचं मनोगत व्यक्त करताना माझं एवढं कौतुक केलं. मला वाटलं आता मला डायबिटीस व्हायचा पण खरोखरच ईश्वरचरणी अशी प्रार्थना करतो की, आपल्या सर्वांचं प्रेम कायमस्वरुपी मिळत राहो. यामुळे काम करत राहण्याची एक उर्जा मिळते….

-आज फार बोलण्यापेक्षा मी फक्त एकच सांगेन, आपण एवढं प्रेम दिलं त्यानेच मी धन्य झालोय. मला आज शब्द अपुरे पडतायेत. फक्त एवढीच विनंती करतो, मी सुद्धा तुमच्या सारखाच एक माणूस आहे. कदाचित अनावधानाने चूक झाली असेल… होत असेल तर मला जरुर सांगत जा…. तुमच्या प्रेमाचा माझ्याकडून अवमान होणार नाही…

-भाऊसाहेब एक गंमत म्हणून सांगतो… मागे एका सभेत मी म्हणालो होतो की, 365 दिवस 24 तास कधीही मला हाक मारा मी तुमच्या सेवेशी हजर आहे… रात्री पावणे दोन वाजले होते… मला फोन आला…. मी उचलला… मला वाटलं काही महत्त्वाचं काम आहे…. मला वाटलं जायला हवं… 2 मुलं होती,

ते म्हणाले…. “काय नाय… आत्ताच पिच्चर सुटला… तुम्हीच सांगितलं 365 दिवस 24 तास कधीही फोन करा म्हणून केला.”

मी म्हटलं, “आत्ता आहात कुठे?

म्हणाले… “मोती चौकात आहोत.”

म्हणालो, “थांबा तिथंच मी आलोच.”

हा झाला गंमतीचा भाग… काय आहे.. जिल्ह्यातील विकासासंदर्भात काहीही काम असो, समस्या असो. कधीही घेऊन या त्या मार्गी लावल्या जातील, असं यानिमित्तानं मी तुम्हाला सांगतो…

-खरंच आज फार बोलण्यापेक्षा एकच सांगतो, आज तुमच्यामुळे मी आहे… इतरांसारखं कोणी बोलत असेल की, माझ्यामुळे सगळं जग आहे. पण मी सांगतो समाजामुळे आमच्यासारखे लोकं आहेत. हे मी कदापि विसरणार नाही…