#शालजोडीतून | वैनींचं दिव्य गायन आणि बापुडे आम्ही…

आम्ही तडक वर्षा बंगला गाठला, गेटवरचे शिपाई कानात हेडफोन घालून बसले होते, आत गेलो तर इतर कामगार कानाभोवती मुंडासे बांधून एका बाजूला बसलेले दिसले…

एकाने आम्हाला खुणेनेच रस्ता दाखवला…

आम्ही डायरेक्ट आत गेलो, कानावर शब्द पडत होते,

“.ध .नि सा म, ध नि ध म, म प ध ग_ , म ग_ रे………..”

आम्ही: वैनी… ‘नि’ कोमल घ्या (आम्ही नको तिथं ज्ञान पाजळलं)

तसं वैणींनी आमच्याकडं रागानं बघितलं…

वैनी: (रियाजात व्यत्यय आणल्याने त्रासिक मुद्रा करून) काय काम काढलंत सकासकाळी?

आम्ही: अभिनंदन वैनी अभिनंदन…

वैनी: (लाजत) धन्यवाद, कसं वाटलं गाणं???

आम्ही: म्युट करून पाहिलं, छान वाटलं.

वैनी: म्हणजे? ऐकलं नाही का???

आम्ही: नुकताच कानातला मळ काढलाय, डॉक्टरने सांगितलंय, कानठळ्या बसवणारे आवाज ऐकू नका, कानाचे पडदे फाटायचा धोका आहे….

वैनी: (रागावून) चला उठा इथून…

रागावल्याचा पवित्रा पाहून आम्ही सावध भूमिका घेतली…

आम्ही: गम्मत केली वैनी, एकदा नाही तर दहा वेळा ऐकलं…

वैनी: (लाजत) तुम्ही तर ना… कसं वाटलं?

आम्ही: दहा वेळा ऐकलं पण समजलं नाही, म्हणून तर इकडं आलो.

वैनी: ऑSSSSS…..

आम्ही: लिहून दिलं तर समजेल तरी, नक्की तुम्हाला काय गायचं होतं ते… (अनावधाने हे वाक्य बाहेर पडल्याने आम्ही जीभ चावली)

वैनी: छान जोक करता हं तुम्ही…

आम्ही: हाहाहा

वैनी: बस, किती मोठ्याने हसता तुम्ही? पुढच्या माणसाचा विचार तरी करत जावा..

आम्ही: (स्माईल देत) तुम्ही पण छान जोक करता वैनी. पण मानलं पाहिजे वैनी तुम्हाला.

वैनी: का हो?

आम्ही: तुम्ही साहेबांना पण ब्रेक दिलात…. 

वैनी: हो ना… ते अगोदर नाहीच म्हणत होते, मी पडद्यावर मावायचो नाही म्हणाले, पण मी फोर्स केला, माझ्या शब्दाबाहेर नाहीत हं ते, लगेच तयार झाले…

आम्ही: पण आम्हाला एक गोष्ट खटकली…

वैनी: कोणती?

आम्ही: साहेबांचा डान्स व्हायला पाहिजे होता, उगा त्यांनी शाखेतल्या कवायती करून दाखवल्या.

वैनी: शु… हळु बोला, ऐकेल कोणी, (आम्ही इकडं तिकडं बघितलं) तुम्हाला म्हणून सांगते, चार महिने प्रॅक्टिस घेतली यांची, पण यांचं शरीर कवायती मध्ये एव्हढं रुळलंय की …… जाऊद्या ते…

आम्ही: जाऊद्या हो, एव्हढं केलंय ते काय कमी नाही, तुम्ही होता म्हणून त्यांना ब्रेक तरी मिळाला, नायतर…

वैनी: नायतर काय?

आम्ही: (रागरंग बघून विषय वळवावा लागला) ते सुधीर भाऊ?

वैनी: छानच काम केलं नं त्यांनी? खास नवीन सूट शिवून घेतला त्यांनी यासाठी…

आम्ही: काय सांगता? छान, मला तर पहिल्यांदा वाटले, जुन्या पिक्चर मधला व्हिलन अजितच डान्स करतोय की काय?

वैनी: (कपाळावर हात मारून घेत) तुम्ही पण ना… असं बोलणार असाल तर मग आम्ही नाय बोलत जा…

आम्ही: गंमत केली हो वैनी, पण विनोद अण्णा, नाथाभाऊ, पंकजाताई यांच्यावर अन्यायच केला की तुम्ही, त्यांना पण ब्रेक द्यायला पाहिजे होता…

वैनी: (कडाकडा बोटं मोडत) जळतात मेले…

(आपण चुकून दुसऱ्याच विषयाला हात घातला हे आमच्या वेळीच लक्षात आले)

आम्ही: पण वैनी खरं सांगू का? सोनू पण तुमच्यापुढे फिका वाटला हो…

वैनी: ( खुषीत ) अय्या खरंच????? 

आम्ही: आपण खोटं बोलतो की काय?

वैनी: आता माझं पुढचं गाणं येतंय, समुद्रावर…. थांबा हं मी तुम्हाला ऐकूनच दाखवते…

हे ऐकून आमच्या काळजात धस्स झाले, डॉक्टरांनी सांगितलेला सल्ला आठवला, आणि आम्ही अर्जंट काम आठवलं सांगत तिथून पोबारा केला….

 

लेखक- अमोल शिंदे, संपर्क- amolshinde25@gmail.com

(लेखातील मतांशी संपादक/मालक सहमत असतीलच असे नाही. आपले लेख आम्हाला contact@thodkyaat.com वर पाठवा)