भाजप कसं आणि कधी फेडणार 9 चिमुकल्यांच्या हत्येचं पातक?

बिहारमध्ये घडलेल्या एका घटनेनं देशाला हादरा बसलाय. भाजपच्या एका नेत्यानं रस्त्यानं चाललेल्या लहान मुलांना आपल्या कारखाली चिरडलं. यापैकी 9 मुलांचा मृत्यू झाला असून 7 मुलं मृत्यूशी झुंज देत आहेत. 20 मुलं जखमी आहेत. धक्कादायक प्रकारानंतर भाजपनं या नेत्याची पक्षातून हकालपट्टी केली, मात्र गायब झालेला हे नेता काही पोलिसांच्या हाताला लागत नाहीये.

काय आहे प्रकार?

24 फेब्रुवारी… बिहारच्या मुझफ्फरनगरपासून 15 किलोमीटर अंतरावर मीनापूर नावाचा भाग आहे. येथील धरमपूरमध्ये सरकारी शाळेत शिकणाऱ्या मुलांची 1 वाजता शाळा सुटली होती. मुलं घरी निघाली होती. राष्ट्रीय महामार्ग 77 लागल्यानंतर मुलांनी लाईन केली आणि एकामागोमाग एक ती चालली होती.  घरी गेल्यावर काय खायचं? काय प्यायचं? काय खेळायचं? असा विचार त्यांच्या मनात सुरु होता. तेवढ्यात सुसाट वेगानं आलेल्या बोलेरो कारनं त्यांच्या या स्वप्नांचा चक्काचूर केला. 7 मुलांची हत्या करुन ही गाडी जवळच्या एका शेतात घुसली. 20 मुलं रस्त्यावर वेदननं तडफडत पडली होती. क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं. आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलांना रुग्णालयात दाखल केलं.

कोण आहे हा भाजप नेता?

मुलांना चिरडून जी गाडी शेतात शिरली त्या गाडीच्या पुढच्या भागात एक पाटी लावण्यात आली होती. मनोज बैठा, प्रदेश मंत्री, महादलित प्रकोष्ठ, असं या पाटीवर लिहिलेलं होतं. दुर्घटना घडली तेव्हा हाच मनोज गाडी चालवत… चालवत कसला उडवत होता. दारु पिलेले लोक गाडी थोडीच चालवतात, ते तर गाडी उडवतात ना? हो… बरोबर वाचलं तुम्ही हा महाशय दारु पिऊन गाडी चालवत होता. त्याच राज्यात ज्या राज्यात दारुबंदी आहे. ज्या नितीशकुमार यांनी बिहारमध्ये दारुबंदी केली त्यांच्याच मांडीला मांडी लावून सत्तेत बसलेल्या एका नेत्यांनं त्यांच्या निर्णयाला काळं फासलं होतं. एवढंच नव्हे तर 9 निष्पाप चिमुरड्यांची हत्या केली होती.

भाजपनं हाकललं मात्र पोलिसांना सापडेना-

मनोज बैठाला भाजपनं तर लगेच पक्षातून काढून टाकलं. भाजपमध्ये अशा प्रकारचं कोणतंच पद नसल्याचं स्पष्टीकरण भाजपकडून देण्यात आलंय. मात्र नितीशकुमार सरकारच्या पोलिसांना आता हा बैठा सापडत नाहीये. अशा कुठल्या बिळात बैठा लपून बसलाय की बिहारच्या पोलिसांना तो सापडायला तयार नाहीये हा एक प्रश्नच आहे. बैठाला राजकीय सपोर्ट असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केलाय. त्यांनी तर बैठाच्या अटकेसाठी सभागृह डोक्यावर घेतलं. बिहारच्या दारुबंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन नितीशकुमार यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. मात्र नितीशकुमार सरकारवर अद्याप तरी याचा काहीच फरक पडलेला नाहीये.

भाजप नेत्यांचं काय म्हणणं आहे?

आरोपी कोणत्याही पक्षाशी संबंधित असू द्या. त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. पोलिसांना तसे आदेश दिले असल्याचं असं बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी म्हटलंय. खरं पाहिलं तर याच सुशील मोदी यांच्यासोबत मनोज बैठाचा एक फोटो व्हायरल झालाय. सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर केला जातोय. 

नितीश कुमार

मुख्यमंत्री नितीश कुमार काय करत आहेत?

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घटना घडल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांना लगेचच आर्थिक मदतीची घोषणा केली. प्रत्येक पीडित कुटुंबाला 4-4 लाख रुपये मिळणार आहेत. आरोपींना कडक शासन होईल, असं त्यांनी म्हटलंय. मात्र त्यांनी आणखी एक घोषणा केलीय, यंदा होळी साजरी न करण्याची….

असं असलं तरी काही प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. 9 निष्पाप मुलांचा मारेकरी पोलिसांना का सापडत नाहीये? त्याच्या मागे राजकीय हात आहे का? नितीश सरकारला खरंच घटनेचं गांभीर्य आहे का??? मनोज बैठा पोलिसांना सापडला नाही आणि त्याला कडक शासन झालं नाही तर बिहारच्या रस्त्यावर मृतदेहांचे ढीग लावण्यासाठी असे अनेक बैठा पुढे सरसावतील एवढं मात्र नक्की…