काय शुद्ध, काय अशुद्ध? आतातरी माझ्या बोलीभाषेची उपेक्षा नको!

दर 30 किलोमीटर वर भाषा बदलते असं म्हणतात. स्थानिक बोलीभाषेची लकब, स्थानिक शब्द प्रयोग, स्थानिक संदर्भ, स्थानिक इतिहास, स्थानिक भूगोल, अगदी स्थानिक शिव्या सुद्धा, या सर्वांचाच तिथल्या भाषेवर प्रभाव असतो आणि तो भाषेचाच भाग असतो. मराठी भाषा वळवावी तशी वळते म्हणतात ते ही तितकंच खरं…

जेव्हा केव्हा भाषेच्या संवर्धनाचा विषय निघतो तेव्हा माझ्या मते त्या भाषेच्या व्याकरणाच्या संवर्धनाचाच विषय असतो की काय असंच वाटतं. मुळात कोणती भाषा शुद्ध आणि कोणती अशुद्ध याचे संदर्भ आणि मोजमाप व्याकरण ठरवतं. पण हे व्याकरण वगैरे भाषा समृद्ध करण्यासाठी महत्वाचं असतं असं मला मुळीच वाटत नाही. असं असतं तर कदाचित ग्रामीण साहित्य, दलित साहित्य असे प्रकार उदयास आले नसते.

बोली भाषा ही तिथल्या समाजमनाच प्रतिबिंब दर्शवणारं माध्यम असतं. त्या भाषेला विनाकारण शुद्धतेच्या मोजपट्ट्या लावणे मला पटत नाही. त्या ठिकाणचं समाजमन समजून घ्यायला तिथली भाषाच मला महत्वाची वाटते. बोलीभाषांना विचारात न घेता भाषेच्या समृद्धीकरण वगैरे कल्पना तोपर्यंत तरी माझ्यासाठी शुद्ध भंपकपणा आहेत.

मराठी भाषा हे असंच पंचपक्वान्न असलेलं ताट आहे. ज्यात तिखट, तुरट, आंबट, खारट, कडू, गोड, तेलकट, तूपकट असे सगळेच पदार्थ वेगवेगळ्या भागातल्या बोलीभाषेच्या माध्यमातून वाढून ठेवलेले दिसतात. एवढं सगळं भरलेलं ताट व्याकरण नावाच्या सकस आहारापोटी एकाच पठडीत टाकून बेचव करणं मला पटत नाही.

भाषेच्या संवर्धनाकरिता स्थानिक बोलीभाषांचं स्वतंत्र अस्तित्व टिकणं, ते अबाधित राहणं मी महत्वाचं मानतो. एकमेकांच्या बोलीभाषांचं शुद्धतेच्या अन सभ्यतेच्या नावावर होणारं अतिक्रमण समृद्धता वाढवणारं ठरू शकत नाही. आजही आमच्या भाषेवरूनच आमच्या सभ्यतेचे निकष ठरवले जातात, जे मी चुकीचं मानतो. भाषा हे ज्ञानाचं माध्यम मानत असताना त्यात कशाचा आलाय शुद्ध अशुद्धपणा. ज्ञान शुद्ध भाषेतच सांगितल्यावर ज्ञान असतं असं तर नक्कीच नाही. पुढच्या व्यक्तीला जी भाषा कळते त्या भाषेत साधलेला संवाद अधिक आपुलकीचा आणि आपलेपणाची भावना देणारा असतो. इतकंच नाहीतर ते आपापसातलं ज्ञान अधिक वृद्धिंगत करणारं असतं. भाषेचा आदर राखा असं सांगताना मी बोलीभाषेचाही आदर राखा असं सांगेल.

बोलीभाषा ही ज्याची त्याची मायभाषा आहे अन् लेकरू कितीही शिकलं सावरलं तरी आपली माय ते विसरत नसतं. माझी मराठवाडी भाषा बोलताना पाश्चिम महाराष्ट्रातली रांगडी मराठी, विदर्भातली वऱ्हाडी, कोकणी, पुणेरी, अहिराणी या मला सगळ्या माझ्या मावश्या वाटतात. त्यांचा गोडवा कायम राहावा अन टिकावाही अशी आजच्या जागतिक मराठी दिनानिमित्त मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि सर्वांना शुभेच्छा देतो..!

 

-डॉ. सुरज मोटे, गिरवली, ता. भूम, जि. उस्मानाबाद. संपर्क – soorajmote.sm@gmail.com

(लेखातील मतांशी संपादक/मालक सहमत असतीलच असे नाही. आपले लेख आम्हाला contact@thodkyaat.com वर पाठवा)