सोशल मीडियात फोटो पाहून हळहळलात? मात्र नेमकं काय सुरुय सीरियात???

सीरिया… मध्यपूर्वेतला असा देश जिथं गेल्या काही काळापासून सतत अशांतता आहे. आता तर तिथला काही भाग नरक बनला आहे. फुटीरतावाद्यांविरोधात सुरु असलेल्या बॉम्बच्या वर्षावात शेकडो जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यामध्ये चिमुकल्यांची संख्या लक्षणिय आहे…

नेमकं काय आहे प्रकरण???

गेल्या 7 वर्षांपासून सीरियात अंतर्गत संघर्ष सुरु आहे. जैश अल इस्लाम ही फुटीरतावादी संघटना सीरियन सरकारला आव्हान देत आहे. त्यांनी सीरियाचा काही प्रदेश आपल्या ताब्यात घेतला असून सीरियन सरकारविरोधात सशस्त्र लढा पुकारला आहे. या सगळ्या घटनाक्रमामध्ये रशिया सीरियन सरकारसोबत खांद्याला खांदा लावून उभी आहे. फुटीरतावाद्यांना ठेचण्यासाठी आवश्यक ती सगळी मदत रशियाकडून सीरियाला पुरवली जात आहे. युद्धविराम करण्याची घोषणा मध्यंतरी झाली मात्र हे सगळं कागदावरच… प्रत्यक्षात फुटीरतावादी आणि सीरियन सरकारमधील संघर्ष काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. 

सध्या नेमकं काय सुरुय?

सीरियात सुरु असलेला संघर्ष रोखण्यासाठी 30 दिवसांच्या युद्धविरामावर संयुक्त राष्ट्रात एकमत झालं होतं. सुरक्षा परिषदेतील सर्व 15 देशांनी पीडित भागामध्ये मदत आणि वैद्यकीय सुविधा पोहोचवण्याच्या बाजूने मतदान केलं होतं. 

या घडामोडी घडत असतानाच मानवाधिकार कार्यकर्त्यांनी सीरियन सरकारवर गंभीर आरोप लावले आहेत. सरकारने हवाई हल्ले आणि तोफांचा भडीमार केल्याचा त्यांचा आरोप आहे. रशियाने मात्र हा दावा फेटाळून लावलाय. फुटीरतावाद्यांनीच नागरी भागात बॉम्बवर्षाव केला, ज्यामुळे नागरी भागातील लोकांना बाहेर पडणं मुश्कील झालं, असं रशियाचं म्हणणं आहे.

सीरियाची राजधानी दमिश्कच्या जवळ सुमारे 3 लाख 93 हजार नागरिक अडकून पडले आहेत. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनूसार फुटीरतावाद्यांच्या ताब्यात असलेल्या गूता शहरावर सीरियन सरकार गेल्या काही दिवसांपासून सतत हवाई हल्ले आणि बॉम्ब वर्षाव करत आहे. या हल्ल्यामध्ये 500 पेक्षा अधिक लोक मारले गेले आहेत.

युद्धविरामची घोषणा केल्यानंतरही हवाई हल्ले-

सीरियात सुरु असलेला संघर्ष मागे घेण्यास सीरियन सरकारचा विरोध होता. त्याला रशियाचाही पाठिंबा होता. संयुक्त राष्ट्रात जेव्हा यासंदर्भात प्रस्ताव मांडण्यात आला तेव्हा त्याला रशियाने विरोध केला. या प्रस्तावात बदल करण्याची गरज रशियाने बोलून दाखवली. अमेरिकेसह पश्चिमी राष्ट्रांनी मात्र ही रशियाची चाल असल्याचं म्हटलंय. रशिया जाणूनबुजून वेळकाढूपणा करत आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेची प्रतिनिधी निकी हैलीने तात्काळ युद्धविराम लागू करण्याची मागणी केलीय, मात्र सीरिया याचं कितपत पालन करेल, याबाबत शंका व्यक्त केली.

निकी हैलीची शंका खरी ठरली कारण युद्धविराम घोषित केल्यानंतरही संघर्ष थांबला नाही. या घोषणेच्या अवघ्या काही मिनिटांनंतर गुतावर हवाई हल्ला चढवण्यात आला. संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनिया गुटेरेश स्वतः म्हणतात की, “गूतामध्ये नरकापेक्षा वाईट परिस्थिती आहे.”

सोशल मीडिया चिमकल्यांसाठी कळवळला!-

सीरियात सुरु असलेल्या संघर्ष काही निवळण्याचं नाव घेत नाहीये. गेल्या 7 वर्षांपासून सुरु असलेल्या संघर्षानं आता भीषण रुप घेतलं आहे. 500 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे जे आकडे समोर आलेत, त्यामध्ये 135 पेक्षा जास्त मुलं असल्याचं कळतंय. सत्तेच्या संघर्षात सुरु असलेली मुलांची जीवघेणी ससेहोलपट आणि त्यांच्या मृतदेहांचे फोटो आता सोशल मीडियात व्हायरल झालेत. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या फोटोंमुळे सध्या जगभरातून हळहळ व्यक्त होत आहे.