सीरियातील पुनर्वसन छावण्यांमध्ये सेक्सच्या मोबदल्यात विकलं जातं जेवण!

Photo- pixabay

सीरियात सध्या यादवी सुरु आहे. कोणत्याही युद्धात सर्वाधिक हाल कुणाचे होत असतील तर ते महिला आणि मुलांचे असं मानलं जातं. सीरियातील ही यादवीदेखील या वाक्याला दुजोरा देते. सीरियातील लहानग्यांच्या होत असलेल्या ससेहोलपटीचे फोटो तसेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जगभरातून त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जातोय. मात्र महिलांसोबत काय होत असेल यांची तुम्ही कल्पना करु शकता का? दहशतवादी संघटनांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशातील महिलांचं सोडा, पुनवर्सन छावण्यांमध्ये असलेल्या महिलांसोबतही दुर्व्यवहार सुरु आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र चक्क अन्नाच्या मोबदल्यात या महिलांच्या शरीराचे लचके तोडले जात आहेत. 

नेमका काय सुरु आहे प्रकार?

सीरियामध्ये संयुक्त राष्ट्र तसेच आंतरराष्ट्रीय संघटनांकडून पुर्नवसन छावण्या चालवल्या जातात. या छावण्यांमध्ये अन्नासाठी महिलांकडे चक्क सेक्सची मागणी केली जाते. मागणी पूर्ण न करणाऱ्या महिलांना अन्न दिलं जात नाही. सीरियात संयुक्त राष्ट्र किंवा अन्य आंतरराष्ट्रीय संघटनांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंसेवकांकडून हा प्रकार सुरु असल्याचा दावा बीबीसीने केला आहे. 

पुनर्वसन छावण्यांमध्ये सुरु असलेल्या या प्रकाराचा तेथील महिलांनी चांगलाच धसका घेतला आहे. महिला अन्न किंवा अन्य सामग्री आणण्यासाठी वितरण केंद्रात जायला नकार देत आहेत. 

तीन वर्षांपूर्वीही हा प्रकार समोर आला होता. तेव्हा स्वयंसेवी संस्थांना तसेच स्वयंसेवकांना स्पष्ट शब्दांमध्ये सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र हा प्रकार काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. सीरियाच्या दक्षिण भागात अद्यापही हा प्रकार राजरोस सुरु असल्याची माहिती आहे. 

मानवी अधिकारावर काम करणाऱ्या काही संघटनांना या प्रकाराची कल्पना आहे, मात्र ते या प्रकाराकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप होतोय.

Photo- pixabay

दोन वेळच्या जेवणासाठी तात्पुरतं लग्न-

‘वॉयस फ्रॉम सीरिया 2018’ या अहवालात सीरियात महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबाबत विश्लेषण करण्यात आलं आहे. हा अहवाल सांगतो, की खाणं-पिणं आणि इतर गोष्टींसाठी काही मुली तसेच महिला इथल्या अधिकाऱ्यांसोबत तात्पुरतं लग्न करतात. त्याबदल्यात अधिकाऱ्यांची एकच मागणी असते ती म्हणजे सेक्स… 

आणखी काही बाबींचा या अहवालात उल्लेख करण्यात आला आहे. मदतकार्य करणारे स्वयंसेवक महिला तसेच मुलींकडे त्यांचे फोन नंबर मागतात. त्यांना स्वतःच्या घरी घेऊन जातात. यामध्ये विधवा तसेच घटस्फोटीत महिलांचं प्रमाण सर्वाधिक आहे. 

3 वर्षांपूर्वी असे प्रकार घडले होते-

3 वर्षापुर्वी डेनिएल स्पेन्सर ही महिला एका संघटनेसाठी सीरियात काम करत होती. तिच्या हा प्रकार लक्षात आला होता. काही स्थानिक महिलांनी तिच्याकडे यासंदर्भात तक्रार केली होती. 

जोपर्यंत सेक्सची मागणी महिला पूर्ण करत नाही तोपर्यंत त्यांचं अन्नधान्य रोखून ठेवलं जातं, असं स्पेन्सरनं सांगितलं. एक महिला तिच्या खोलीत बसून रडत असल्याचं मी पाहिलं. तिच्यावर काय प्रसंग ओढवला असेल याची कल्पना करुनच मी दुःखी झाले होते, असं स्पेन्सरनं सांगितलं. 

Photo- pixabay

संयुक्त राष्ट्राला आहे या प्रकाराची कल्पना?

द इंटरनॅशनल रेस्क्यू कमिटीने जून 2015 मध्ये सर्वेक्षण केलं होतं. ज्यामध्ये 190 महिला आणि मुलींनी सहभाग घेतला होता. यातील 40 टक्के महिलांनी मदतीच्या बदल्यात आपल्यावर अत्याचार झाल्याचं मान्य केलं होतं. 

धक्कादायक बाब म्हणजे संयुक्त राष्ट्राला या प्रकाराची कल्पना होती, मात्र त्यांनी या प्रकाराकडे डोळेझाक केल्याचा आरोप आहे. युनिसेफच्या प्रवक्त्याने याबाबत सहयोगी संस्थांची चौकशी करत असल्याचं म्हटलंय. तसेच अशाप्रकारच्या कोणत्याही तक्रारी आल्या नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.