लाडक्या पत्नीला अखेरचा निरोप देताना बोनी कपूर यांचं भावनिक पत्र

श्रीदेवीच्या ट्विटर अकाऊंटवरुन 28 तारखेला सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास एक ट्विट पडलं. तिच्या चाहत्यांसाठी हा धक्का होता, मात्र ट्विट वाचल्यानंतर लक्षात आलं, की हे ट्विट श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी केलं होतं. आपल्या पत्नीच्या विरहात त्यांनी एक पत्र लिहिलं होतं आणि हेच पत्र त्यांनी ट्विटरवरुन शेअर केलं होतं.

नक्की काय म्हटलंय बोनी कपूर यांनी या पत्रात????

मी माझी अत्यंत जवळची मैत्रीण, पत्नी आणि माझ्या दोन तरुण मुलींची आई गमावली. हे  नुकसान आहे मी शब्दात व्यक्तच करू शकत नाही.

आमच्यासाठी गेले काही दिवस खूपच कठीण होते. या कठीण काळात ज्यांनी माझी सोबत केली ते माझे कुटुंबिय, मित्र, सहकारी, कलाकार आणि श्रीदेवीच्या हजारो चाहत्यांचे मी मनापासून आभार मानतो.

माझा मुलगा अर्जुन आणि मुलगी अंशुला या दोघांनी मला खंबीर साथ दिली. त्यांच्यामुळेच मी, खुशी आणि जान्हवी या धक्क्यातून सावरत आहोत. एकत्र कुटुंब म्हणून आम्ही आता या दु:खाला सामोरं जाण्याचा प्रयत्न करत आहोत.

श्रीदेवी या जगासाठी चांदनी होती… ती एक उत्कृष्ट अभिनेत्री होती…  मात्र ती माझं निस्सीम प्रेम होती… माझ्या मुलींसाठी तर ती सर्वकाही होती… त्यांचं संपूर्ण विश्व होती…  खरंतर आम्हा सगळ्यांचं आयुष्य तिच्या अवतीभोवती फिरत होतं….

Photo- Shridevi Twitter

 

लाडक्या श्रीदेवीला निरोप देताना आज मी तुम्हा सगळ्यांना एक विनंती करतो आहे… आमचं दु:ख खासगी राहू द्या. श्रीदेवी अशी अभिनेत्री होती की तिची जागा दुसरं कुणीही घेऊ शकत नाही. खरंतर कुठल्याच कलाकाराचं आयुष्य कधीच संपत नाही, कारण रुपेरी पडद्यावर तो नेहमी चमकत राहतो.

मला आता माझ्या मुलींची चिंता लागली आहे. मला त्यांचा सांभाळ करायचाय आणि श्रीच्या सोबतीशिवाय पुढं जायचं आहे. ती आमचं आयुष्य होती, आमची ताकद होती आणि आम्हाला सतत हसतमुख ठेवण्याचं कारण होती. आम्ही तिच्यावर खूप खूप प्रेम केलं…

माझ्या प्रेमाला शांती मिळो… आमचं आयुष्य आता पूर्वीसारखं कधीच राहणार नाही!

– बोनी कपूर