आडतास कसं झालं?…

आडतास या मराठी व्यक्तिचित्र संग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते व प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री वीणा जामकर, लेखक विकास गोडगे व समिक्षक राजकुमार घोगरे यांच्या उपस्थित नुकतेच जुन्नर (पुणे) येथे झाले. इर्जिक प्रकाशनची निर्मिती असलेल्या या पुस्तकाचे लेखक आहेत गोपाळ बाळू गुंड. लेखकाची ही पहिलीच कलाकृती असून राज्यभरातील आणि परदेशातील वाचकांचाही त्यास अतिशय उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला आहे. आडतास… नावापासूनच सगळं काही वेगळं आहे, त्याच्या निर्मितीचा प्रवासही तेवढाच रंजक आहे. आडतासच्या निर्मितीचा पट मांडला आहे, प्रसिद्ध ब्लॉग लेखक आदित्य गोपाळ गुंड यांनी….

कुठल्याही निर्मितीचा प्रवास बहुधा सरळधोपट आणि क्षणिक नसतो. पुस्तक निर्मितीही याला अपवाद नाही. आडतास हा व्यक्तिचित्रसंग्रह लेखक गोपाळ गुंड (दादा) यांना त्यांच्या उभ्या आयुष्यात वेळोवेळी भेटलेल्या सामान्यातील सामान्य माणसांच्या असामान्य जगण्याचा पट आहे. सत्तर वर्षांपूर्वी कोरडवाहू एकत्र शेतकरी कुटुंबात जन्म, अतिशय हालअपेष्टांमध्ये शिक्षण, पुढे बॅकेत निरनिराळ्या ठिकाणी नोकरी, सर्वसामान्य व्यक्तीकेंद्रीत उत्तम सेवा, सेवानिवृत्ती, कौटुंबिक आणि सामाजिक योगदान असं त्यांचे जगणे बहुआयामी आहे. हे सारं काही सुरळीत असतानाच त्यांना २०१३ च्या ऑगस्ट महिन्यात दादांना हार्ट अटॅक आला. अँजिओप्लास्टी करावी लागली. यातून ते बरे होतच होते तोवर सप्टेंबरमध्ये त्यांना ब्रेन हॅमरेज झाले. पुन्हा एकदा रवानगी हॉस्पिटलमध्ये झाली.

मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्या यशस्वी झाल्या. तीन महिने आयसीयूमध्ये काढल्यानंतर दादांना घरी आणले तेव्हा त्यांच्या डोक्याच्या कवटीचा डावीकडचा अर्धा भाग काढून ठेवलेला होता आणि वरून फक्त कातडी शिवून टाकली होती. त्यामुळे त्यांच्याकडे बघायलाही एखाद्याला भिती वाटत असे. वजन कमी होत होत अगदी ४५ किलोवर आले होते. कुठलीच गोष्ट त्यांना स्वतः करता येत नव्हती. नाकातून एक नळी, घशाला बाहेरून भोक पाडून त्यातून एक नळी अशी अवस्था होती. या अवस्थेतही त्यांची इच्छाशक्ती शाबुत होती. मी यातून बरा होणार, किंबहुना मला बरं झालंच पाहिजे असा विचार कदाचित त्यांच्या मनात आला असेल.

घरी आणल्यानंतरही दादा झोपूनच होते. हळूहळू प्रकृतीमध्ये सुधारणा होत होती. त्यांचे फिजिओथेरपिस्ट वेगवेगळे व्यायाम त्यांच्याकडून करून घेत होते. बिछान्यावर नीट बसता सुद्धा न येणारे दादा आता उठून बसू लागले होते. त्यांची जिद्द कायम होती. काही दिवसांनी घशाची नळी काढून टाकली गेली. त्यानंतर अजून काही दिवसांनी नाकाला लावलेली नळी काढून तोंडातून अन्न जायला सुरुवात झाली. निसर्गाने ठरवून दिलेल्या पद्धतीने अन्न शरीरात जाऊ लागल्याने ते अंगी लागू लागले. दादांचे वजन वाढले, ते थोडेफार चालू लागले. आम्ही त्यांची फिजिओथेरपी त्यानंतरही सुरूच ठेवली. कुठेतरी आपले दादा पुन्हा आधी होते तसे दिसतील याची आम्हा सगळ्यांना आशा होती. दादा स्वतःहून चालू लागल्यावर त्यांचा स्टॅमिना वाढवण्याचे काम सुरु झाले. त्यासाठी साधे पण परिणामकारक व्यायाम त्यांच्याकडून डॉक्टरांनी करून घेतले. त्याचा परिणाम थोड्याच दिवसात दिसू लागला. काही पावले टाकल्यावर दमणारे दादा आता बरेच अंतर न थकता चालू शकत होते. अंगात शक्ती आल्याने स्वतःच्या हाताने जेवणे त्यांना जमू लागले होते. हॉस्पिटलमधून घरी आणल्यानंतर जवळजवळ ७ महिन्यांनी दादांची अजून एक शस्त्रक्रिया झाली. यावेळी त्यांच्या कवटीचा काढून ठेवलेला भाग पुन्हा होता तसा बसविण्यात आला. आता दादा एकदम ओके दिसू लागले. या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होऊ लागली. दोनच महिन्यात दादा अगदी पूर्वी होते तसे हिंडू फिरू लागले. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना भेटायला गेलो तेव्हा ते आपल्या खुर्चीत ताडकन उभे राहिले. त्यांच्या आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. नकळत ते बोलून गेले, 

इतके दिवस आजारात काढून पुन्हा पूर्ववत झाल्यानंतर दादांना हॉस्पिटलमध्ये आपल्याबरोबर काय झाले हे अजिबात आठवत नव्हते. ते एका दृष्टीने आमच्यासाठी बरेही होते. ऑगस्ट २०१३ मध्ये हार्ट अटॅक, सप्टेंबर २०१३ मध्ये ब्रेन हॅमरेज यानंतर जवळजवळ १ वर्षानी दादा पुन्हा आधी होते तसेच बरे झाले होते. त्यांची स्मृती शाबूत होती, त्यांचे शरीर पूर्ववत झाले होते.

दादांनी आपल्या आधीच्या सवयीप्रमाणे वाचन सुरु केले. दिवसभर मोकळेच असल्यामुळे सतत वाचूनही कंटाळा येई. टीव्ही असा कितीक बघणार? दरम्यान मी दादांनी सांगितलेल्या एक दोन जुन्या गोष्टी माझ्या ब्लॉगवर टाकल्या होत्या. त्या पोस्ट्सला प्रतिसादही चांगला मिळाला होता. मी दादांना बोलायला लावून आणि त्यांचे बोलणे रेकॉर्ड करायचो. नंतर वेळ मिळेल तेव्हा ते रेकॉर्डिंग ऐकून लिहून काढायचो आणि माझ्या ब्लॉग वर टाकायचो. पण ही प्रक्रिया वेळखाऊ होती. कधीकधी मला खूप काम असे, कधी लिहायचा कंटाळा येई. त्यामुळे या पोस्ट्स मध्ये सातत्य नव्हते. मग एक दिवस मीच दादांना म्हटलं, 

“दादा तुम्हीच का नाही लिहीत?”

“मला जमेल का एवढं लिहायला?” इतके दिवस हातात पेन धरलाच नसल्याने दादांनी प्रश्न उपस्थित केला.

“तुम्ही लिहा तर खरं. मग बघू.” मी दादांना उभारी देण्याचा प्रयत्न केला.

“अरे पण एवढं सगळं लिहायचं. कसं जमणार मला?” दादा अजूनही साशंक होते.

“तुम्ही जमेल तसं लिहा. अमुक पानं लिहीलीच पाहिजेत असं अजिबात नाहीये. वाटलं तर लिहिलं, कंटाळा आला तर थांबलं. कुठं आपल्याला लोकांना दाखवायचंय.” मी पुन्हा दादांना धीर दिला.

“बरं. तू म्हणतोस तर करतो प्रयत्न.” दादा तयार झाले.

दादा लिहू लागले. विषयाचे बंधन नव्हतेच. जे मनात येईल ते लिहीत गेले. मी लगेच काही वाचायला नको म्हणून शांत होतो. एक महिन्यात दादांनी बरेच कागद संपवले होते. असेच एकदा मला कामानिमित्त कुठेतरी जावे लागले. दोन तीन दिवसांनी आलो तर माझ्या बेडवर उशाशी एक-दोन कागद टाचणी मारून ठेवले होते. आपल्या मुलांनी काही वाचावे असे दादांना वाटले तर ते त्यांच्या उशाशी ठेवायचे ही दादांची आमच्या लहानपणापासूनची सवय. मी फ्रेश होऊन ते कागद हातात घेऊन वाचू लागलो आणि संपवूनच थांबलो.

“एक नंबर झालंय हे. आवडणार हे लोकांना. मी लगेच टाईप करायला घेतो.” मी उत्साहाच्या भरात एकदम बोलून गेलो.

“नक्की झालंय ना चांगलं? टाईप करून मला एकदा दाखव. मगच कुणाला पाठवायचे ते पाठव.” दादांनी मला आज्ञा केली.

मी जेवण करून लगेच टायपिंगला बसलो. एका झटक्यात ४-५ पानं टाईप करून संपवली. पात्राचे नाव होते ‘संभा’. दादांचा बॅंकेतला जिगरी दोस्त. म्हणायला शिपाई पण दादांना जीव लावणारा, त्यांच्यासाठी लोकांबरोबर भांडण करणारा एक दिलदार यार.

हा ब्लॉग पब्लिश करायला मी उत्सुक होतो पण अजून काही सुधारणा असतील तर कराव्यात म्हणून तो ब्लॉग आमचा फॅमिली फ्रेन्ड, पत्रकार संतोष डुकरे याला पाठवला. वाचून त्याचा फोनच आला,

“हे कोणी लिहिलंय?”

“दादांनी.”

“लईच भारी झालंय हे. दादांना सांग लिहीत रहा. थांबू नका.” तो पलीकडून म्हणाला.

“अरे त्यांनी अजूनही बरंच काय काय लिहिलंय.” मी त्याला सांगितले.

“मी उद्या घरी येतो. मला दाखव.” तो न राहवून बोलून गेला.

दुसऱ्या दिवशी घरी येऊन संतोषने दादांचे सर्व लिखाण पाहिले आणि म्हणाला, “दादा, आपण याचं पुस्तक करू. हे लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. तुम्ही लिहीत रहा. बाकीचं मी आणि आदित्य बघतो.”

“अरे पण हे खरंच एवढं चांगलं आहे का?” दादांनी शंका उपस्थित केली.

“आहे. खुप चांगलं आहे. तुम्ही कसलीच काळजी करू नका. फक्त लिहीत रहा.” संतोषने पुन्हा दादांना धीर दिला.

“ठीके पण विषय काय घ्यायचा?” दादा लिहायला तयार झाले होते. आम्ही अर्धी लढाई जिंकली होती. दादांचा होकार आल्यावर आम्ही पुन्हा एकदा लिहिलेले कागद चाळून पाहिले तेव्हा लक्षात आलं की दादांनी बरीच व्यक्तिचित्र लिहिली आहेत.

“आपण एक काम करू. पहिलं पुस्तक व्यक्तिचित्रांचे करू. ही जवळजवळ २०-२५ आहेत. तुम्ही अजून लिहा. कमीतकमी ४०-४५ तरी झाली पाहिजेत. लिहिताना हात आखडता घेऊ नका. आवडेल न आवडेल याचा विचार करू नका. ते आम्ही बघतो. ही लिहून झालेली व्यक्तिचित्रं मी आणि आदित्य मिळून टायपिंगला घेतो. तुम्ही जसजसं लिहून संपवाल तसतसं आम्ही टाईप करत जाऊ. दिवाळीत आपण प्रकाशन करू.” संतोषने त्याच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे एका दमात पुस्तकाच्या सुरुवातीपासून ते अगदी प्रकाशनापर्यंतचे नियोजन सांगून टाकले.

संतोष १० व्यक्तिचित्रं टाईप करायला घेऊन गेला आणि १० माझ्याकडे राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळीच संतोषचा इमेल आला. त्याने १० पैकी ५ व्यक्तिचित्रं टाईप करून संपवली होती. मला धडकी भरली. आपण काम केले नाहीतर तर काही खरे नाही हे माझ्या लक्षात आले. मी वेळ मिळेल तसा टायपिंग करू लागलो. एकेक पात्र संपवत राहिलो. दादांनी लिहून दिलेली २० व्यक्तिचित्रं आमच्याकडून टाईप होईपर्यंत दादांनी अजून ९-१० लिहून संपवली होती.

दरम्यान, संतोष पुण्याहून गडचिरोलीला रहायला गेला होता. आता त्याला भेटणं अवघड होतं. जे काही होत होतं ते फक्त फोनच्या माध्यमातून. नंतरच्या १० व्यक्तिचित्रांपैकी त्याने ५ आणि मी ५ अशी विभागणी करून आम्ही टायपिंगचे काम संपवले.

“आपल्याला दिवाळी २०१७ ला पुस्तक प्रकाशित करायचे आहे.” संतोषने डेडलाईन दिली होती.

ऑगस्ट २०१७ मध्ये दादा माझी बहीण दिप्ती हिला भेटायला नेदरलँडला गेले. तिथे गेल्यानंतरही ते लिहीतच होते. इनमीन सव्वा महिन्यासाठी आपल्याकडे परदेशात आलेले सासरे रात्री बेरात्री कधीही उठून लिहीत बसतात, हे त्यांच्या जावयाला काही पटले नाही. त्याने मला फोन करून तसे सांगितलेसुद्धा.

“त्यांना लिहू देत. थांबवू नको.” मी दादांची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केला. त्याला माझे बोलणे फारसे पटले नाही.

दरम्यान, माझी बायको कामानिमित्त परदेशात गेली, सुनबाईंच्या उपस्थितीतच पुस्तक प्रकाशित  व्हावे, या दादांच्या इच्छेमुळे दिवाळी २०१७ चा मुहूर्त हुकला. संतोष आणि मी शांत झालो. दादा मात्र लिहीतच होते. एक एक करत त्यांनी जवळजवळ ६०-६५ व्यक्तिचित्रे लिहिली. डिसेंबर संपता संपता माझ्या लक्षात आले की आपण नियोजनाच्या खूप मागे पडलो आहोत. असेच सुरु राहिले तर दादांचे पुस्तक होणे अशक्य आहे. १ मार्च २०१८ ला दादांचा सत्तरावा वाढदिवस असणार होता. त्याचे निमित्त साधून पुस्तकाचे प्रकाशन केले तर त्याहून चांगली भेट अजून काय असणार होती? मी संतोष बरोबर फोनवर बोललो. त्यालाही माझा प्लॅन पटला आणि आम्ही पुन्हा कामाला लागलो.

दरम्यान, संतोषने नागपूरमध्ये नोकरी पत्करली होती. आधी तो वेळ देऊ शकत होता पण आता मात्र वेळ देणे त्याला अवघड जात होते. त्याची समस्या ओळखून मी एकट्यानेच टायपिंगचा धडाका लावला. वेळ मिळेल तसा टायपिंग करू लागलो. दादांनी लिहिलेले कागद माझ्या नोकरीच्या भ्रमंतीत बरोबर ठेवून विमानात बसून टायपिंग करू लागलो. फ्लाईट लेट झाली तर एअरपोर्टवर बसून फोनमध्ये टाईप करू लागलो. एकेक करत सगळी व्यक्तिचित्रं मी टाईप करून संपवली. जवळजवळ चाळीस टक्के मोबाईलवर टाईप केलं गेलं.

आता संतोषचे काम सुरु झाले होते. टाईप करून दिलेला मजकूर तपासणे, वाक्यरचना, शब्द बरोबर आहेत याची खातरजमा करणे ही कामे तो करू लागला. टाईप केलेल्या व्यक्तिचित्रांपैकी नक्की कोणती पुस्तकात घ्यायची याबाबत त्याने दादांबरोबर चर्चा केली. चर्चेच्या एक दोन फेऱ्या झाल्यानंतर ५१ व्यक्तिचित्रे पुस्तकासाठी निश्चित केली गेली. हे झाल्यानंतर मी आणि दादा पुस्तकात समाविष्ट असलेल्या आणि हयात असलेल्या लोकांना भेटत होतो. त्यांच्याबद्दल काय लिहिले आहे हे त्यांना वाचून दाखवत होतो. लिहिलेला मजकूर छापण्यासाठी त्यांची हरकत नाहीये याची खात्री करून घेत होतो. शक्य होईल तेवढ्या व्यक्तींना आम्ही स्वतः जाऊन भेटलो. हयात नसतील त्यांच्या वारसांना भेटून किंवा फोन करून लिहिलेल्या मजकुराची कल्पना दिली. आमचे सौभाग्य की कोणीही दादांच्या लिखाणाला हरकत घेतली नाही.

हे सगळं सुरु असताना पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ कसे असावे, पुस्तकाचे नाव काय असावे याबाबत विचार विनिमय सुरु होता. एक दिवस बंगलोरहून येणारी माझी फ्लाईट लेट झाली. एअरपोर्ट वर बसल्या बसल्या पुस्तकाचे नाव अजून ठरले नाहीये, आपल्याकडे दिवस कमी आहेत असे बोलून मी संतोषचे डोके खात होतो. त्या चर्चेतून एक दोन नावे पुढे आली. त्यातलेच एक ‘आडतास’.

“दादांना हे नाव मेसेज करून ठेव. सकाळी उठल्यावर ते बघतील. त्यांना हे नाव नक्की आवडेल याची मला खात्री आहे.” संतोषने मला मेसेज केला.

त्याने सांगितल्याप्रमाणे मी दादांना ‘आडतास’ असा एकाच शब्दाचा मेसेज केला. रात्री उशिरा घरी पोहोचून झोपलो. सकाळी उठून पहिल्यांदा दादांसमोर गेलो तर ते माझ्याकडे बघून फक्त हसले. मी काय समजायचे ते समजलो. लगेचच संतोषचा त्यांना फोन आला. नाव आवडल्याचे त्यांनी त्याला सांगितले. असा नेमका शब्द शोधून काढल्याबद्दल त्याचे कौतुकही केले.

एव्हाना माझी आर्टिस्ट बहीण पूजाने मुखपृष्ठाचे पहिले डिझाईन बनवले होते. त्याची बरीच व्हर्जन्स झाल्यानंतर ‘आडतास’चे आत्ताचे मुखपृष्ठ आकाराला आले. दादांनी पुस्तकात उल्लेख आलेल्या लोकांना संपर्क साधून त्यांचे फोटो गोळा करायला सुरुवात केली होती. फोटो आला की लगेच मला आणि पूजाला पाठवत होते. पूजा त्यावरुन स्केचेस करत होती. ‘आडतास’ आता आकाराला येत होते. अनेक पीडीएफ फाईल्स करेक्शनसाठी इमेलवर इकडून तिकडे, तिकडून इकडे झाल्यानंतर अखेरीस शेवटची फाईल तयार झाली. संतोषनेच शोधून काढलेल्या शनिवारातल्या ओम डिजिटलकडे पुस्तक छपाईसाठी गेले.

हे सगळे होत असताना संतोषने उत्तम कांबळे सरांकडे प्रकाशन सोहळ्यासाठी शब्द टाकला होता. पुस्तकाची छपाईला गेलेली एक प्रत वाचनासाठी कांबळे सरांना पोच केली. पूजाची अत्यंत जिवाभावाची मैत्रीण असलेल्या प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री वीणा जामकर हिनेही चित्रिकरणांच्या अत्यंत बिझी शेड्युल मधून वेळ काढून प्रकाशनास उपस्थित राहण्याची निश्चिती दिली. परिंदा फेम प्रसिद्ध लेखक विकास गोडगे सर व त्यांचे स्नेही जेष्ठ साहित्य समिक्षक राजकुमार घोगरे सर यांनीही पुस्तकाची कल्पना आणि त्यातील आशय ऐकल्यावर प्रकाशनास उपस्थित राहण्याची ग्वाही दिली. प्रकाशन समारंभाचे सर्व नियोजन जुन्नरचे आमचे स्नेही सुनिल ढोबळे, त्यांचे चिरंजीव सोहम ढोबळे आणि शंबुपाचे ढमाले सर यांनी सांभाळले.

४ मार्च २०१८ रोजी सकाळी ११ वाजता ‘आडतास’चे प्रकाशन पार पडले. सर्वच मान्यवरांनी पुस्तकाचे, त्याची शैली, आशय, विषय व सादरीकरणाचे कौतुक केले. साहित्यातील हा सर्वात अवघड असलेला प्रकार अतिशय ताकदीने साकारल्याबद्दल श्री. कांबळे यांनी विशेष कौतुक केले. बलस्थाने स्पष्ट करुन पुढील आवृत्तीसाठीच्या सुचनाही दिल्या. मराठी साहित्यातील व्यक्तिचित्र या प्रकारात हे पुस्तक आवर्जून दखल घ्यावी असेच असल्याच्या या सर्व मान्यवरांच्या परखड शाबासकीने गेली ८-१० महिने दादा, मी, संतोष, पूजा आणि इतर सगळ्याच आडतास टीमच्या प्रयत्नांचे सार्थक झाले.

1 Comment

Comments are closed.