सुनंदा पुष्कर यांची हत्याच, दिल्ली पोलिसांच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणाचा अद्याप पूर्णपणे उलगडा झालेला नाही. दिल्ली पोलिसांच्या रिपोर्टमुळे या प्रकरणात काही धक्कादायक खुलासे करण्यात आल्याचं कळतंय. सुनंदा पुष्कर यांनी आत्महत्या केलेली नाही तर त्यांची हत्याच झालेली आहे, असा धक्कादायक दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आल्याची माहिती आहे. हा खटला अद्याप कोर्टात सुरु आहे त्यामुळे दिल्ली पोलिसांनी याबद्दल बोलणं टाळलंय, मात्र योग्य वेळी सर्व माहिती सांगितली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. 

सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू-

सुनंदा पुष्कर यांनी 2010 साली काँग्रेस नेते शशी थरुर यांच्यासोबत विवाह केला होता. जानेवारी 2014 मध्ये घराची डागडुजी सुरु असल्यामुळे दोघेही दिल्लीच्या चाणक्यपुरीतील लीला हॉटेलमध्ये मुक्कामी होते. 17 जानेवारी 2014 शशी थरु यांना आपली पत्नी झोपेतून उठत नसल्याचं लक्षात आलं. त्यांनी याप्रकरणी दिल्ली पोलिसांना माहिती दिली. सुरुवातीला ड्रग्जच्या ओव्हारडोसमुळे मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत होतं, मात्र नंतर ही हत्या असल्याच्या संशयावरुन दिल्ली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. 

Related image

दिल्ली पोलिसांच्या रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?

सुनंदा पुष्कर यांच्या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. ज्या जखमा आहेत त्या मारहाणीमुळे झाल्याचं म्हटलंय. सुनंदा पुष्कर यांच्या मृतदेहावर एक दोन नव्हे तर 15 जखमा होत्या. साधारणतः चार दिवसांच्या आतील त्या सर्व जखमा होत्या. 10 नंबरची जखम ही इंजेक्शमुळे तर 12 नंबरची जखम दातांनी चावा घेतल्यामुळे झालीय. धक्कादायक बाब म्हणजे इंजेक्शनमुळे झालेली जखम सर्वात ताजी होती, अशीही माहिती या अहवालात असल्याचं कळतंय. 

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय म्हटलं होतं?

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूच्या कारणावर ठोस भाष्य करण्यात आलं होतं. विष खाल्ल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं.

Related image

शशी थरुर यांच्यावर संशयाची सुई-

सुनंदा पुष्कर ही शशी थरुर यांची तिसरी पत्नी होती. घराची डागडुजी सुरु असल्यामुळे दोघे हॉटेलमध्ये राहात असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे अर्थातच शशी थरुर यांच्यावर संशयाची सुई होती. त्यातच सुनंदा पुष्कर यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळून आल्या आहेत. रिपब्लिक टीव्हीने याप्रकरणी नुकत्याच काही टेप्सच्या आधारे शशी थरुर यांच्यावर सुनंदा पुष्कर यांच्या हत्येचे आरोप केले होते, अर्थात शशी थरुर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आणि रिपब्लिक टीव्ही तसेच संपादक अर्णब गोस्वामीविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली.

आता दिल्ली पोलिसांनी आपल्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे केल्यानं हे प्रकरण वेगळंच वळण घेण्याची शक्यता आहे. पोलीस लवकरच आपला रिपोर्ट कोर्टात मांडणार आहेत, मात्र या रिपोर्टमध्ये केलेले दावे खरे असतील तर काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.