#शालजोडीतून | राणे-अग्रवालांना गटवलं आणि आम्हाला कटवलं!

“पकडा … पकडा … पकडा” 

असं ओरडत आम्ही नवी दिल्लीच्या लुटेन्स भागातील पंडित दीनदयाळ उपाध्याय मार्गावर असलेल्या भाजपच्या मुख्यालयात घुसलो.

पुढच्या व्यक्तीला पकडणार, इतक्यात मध्येच एक हात आडवा आला…

“ठहीरो….”

“मुझे जाने दो, अंदर आतंकी घुसला है’

आमचं हिंदी बघून पुढची व्यक्ती मराठीवर आली…….

“कोण तुम्ही?”

“आम्ही देशभक्त”

“काय झालं?”

“ते सांगतो नंतर, पण मला अडवणारे तुम्ही कोण?”

“आम्ही अमित मालवीय”

एव्हढं भारदस्त व्यक्तिमत्व समोर पाहून आम्हाला अजून हुरूप आला….

त्यांचा हात धरून त्यांना ओढत म्हणाले,

“चला इथं पाकिस्तानी एजंट घुसलाय, त्याला आपण दोघे पकडू”

त्यांनी आमच्या हाताला हिसडा देऊन हात सोडवला, आम्हाला शांतपणे म्हणाले,

“जरा व्यवस्थित सांगा काय झाले ते”

आम्ही जरा दम खाल्ला, म्हणलं…..

“अहो आमच्या समोर या आपल्या पंडित दीनदयाळ रस्त्यावरून आत्ताच एक पाकिस्तानी एजंट सायकलवरून आत घुसलाय”

“काय सांगता? कोण तो?”

“अहो तोच, ज्याला तुम्हीच पाकिस्तानी हस्तक म्हणाला होता, हा तोच ज्याला पाकिस्तानकडून पैसे मिळतात आणि यांची खासदारकी रद्द करायला पाहिजे, असंही तुम्ही म्हणाला होतात”

“शांत व्हा… शांत व्हा… शांत व्हा…..”

“शक्य नाही!!! अहो काही बरे वाईट केलं म्हणजे?”

तसे मालवीय साहेब गालातल्या गालात हसत म्हणाले,

“अहो ते आपले नरेश आगरवाल”

“आपले?”

“हो, आपलेच, ते आता देशभक्त झालेत”

“ऑ आणि ते कसं काय?” आम्ही आश्चर्यचकीत होऊन विचारलं.

“काल संध्येलाच अमित शेठ यांनी गोमूत्रात धुवून पवित्र करून घेतलं त्यांना.”

आम्ही डोकं खाजवत, “म्हणजे?”

“वाघाचे पंजे, अहो ते आता आपल्या पक्षात आले… पावन झाले, कालच आम्ही सर्व ट्विट डिलीट केल्या, हाहाहाहा”

आम्ही थोडंसं नाराजीत पुढे गेलो, चार पायऱ्या चढलो असेन-नसेन तोपर्यंत समोर जेटली काखेत फाईली घेऊन येताना दिसले, आम्ही त्यांना आडवे झालो.

“राम राम”

कपाळावर आठ्या पाडत जेटली गरजले,

“चल हो बाजूला”

एव्हढा अपमान… एव्हढा अपमान तमाम महाराष्ट्रात कधीच झाला नाही आमचा, पण आम्ही मुगासारखा गिळून गप्प न बसता आमचं घोड दामटलं,

“अहो ते रममध्ये राम व्हिस्कीत विष्णू दिसणारे नर……”

“खामोश”

“अहो तुम्हीच तर बाह्या सारून भर राज्यसभेत यांच्या अंगावर गेला होतात, याची देही याची डोळा पाहिले आहे आम्ही.”

गालात हसत हाताने शांत हो असा इशारा करत ते म्हणाले,

“आता त्यांना गोमूत्रात सर्व दर्शन होत आहेत, त्यांनी प्रातःसमयी नमस्ते सदावत्सले पण म्हणून दाखवलं, ते आता सनातन हिंदू धर्माचा कट्टर अविभाज्य भाग झाले आहेत.”

हे असलं ऐकून आम्ही उडालोच, पण म्हणलं जाताजाता अमित शेठ यांची भेट घेऊन निघावं म्हणून आम्ही मोर्चा तिकडं वळवला.

शेठ म्हणजे गोड माणूस, आम्हाला पाहिल्या पाहिल्या हातातील खमंग ढोकळ्याची डिश आमच्या समोर केली,

आम्ही लाजून मानेने नको नको म्हणले, तसे शेठ गरजले,

“शिल्लक राहिलाय, टाकून देण्यापेक्षा तुझ्या मुखात तरी पडेल खा गप”

आम्ही एक ढोकळा उचलला, तस शेठची कळी खुलली, म्हणलं “बोल कशाला टपकलात?”

“ते फडणवीसांनी गेम केली की तुमच्यावर”

तसं तिरकं बघून शेठ गालात हसलं,

आम्हीच पुढं बोललो, “त्यांच्या गळ्यातलं लोढणं तुमच्या गळ्यात अडकवलं की”

शेठ परत गालात हसलं, भुवया उंचावून बघायला लागलं,

आम्ही म्हणलं, “अहो ते कोकणातलं वादळ झेपणार का हो शेठ तुम्हाला?”

तसं शेठ खो खो हसायला लागलं, समोरचा टेबलावरचा ग्लास झटक्यात उलटा करून टेबलावर आपटला, अन् आमच्याकड बघत गालात हसून म्हणलं,

“समजलं?”

आम्ही मानेने नाय म्हणलं,

“पेल्यातलं वादळ” एव्हढं बोलून आमच्याकडं बघत शेठनं डोक्यावरून हात फिरवला,

आम्ही उठलो, शेठचे चरणस्पर्श केले, आणि परतीचा प्रवास धरला.

लेखक- अमोल शिंदेसंपर्क- amolshinde25@gmail.com

(लेखातील मतांशी संपादक/मालक सहमत असतीलच असे नाही. आपले लेख आम्हाला contact@thodkyaat.com वर पाठवा)