शनिवारीही पतंगरावांचं हेलिकॉफ्टर आलं मात्र….

मी लहान होतो तेव्हा आमच्या आप्पानी ( आप्पा म्हणजे माझ्या आईचे चुलते. त्यांचं नाव किसन दादू यादव ) मला भवानीनगरच्या घाटातून वर येताना पतंगराव कदम नावाच्या माणसाची गोष्ट सांगितली होती. याच डोंगरात एक गणपतीचं छोटं मंदिर आहे. त्याच मंदिराच्या सावलीत आम्ही भर उन्हात विसावा घेतला होता. माझ्या पायात चप्पल नव्हती म्हणून आप्पा मला खांद्यावर बसवून घेऊन आले होते.

उन्हं खाली झाल्यावर पुन्हा आम्ही पाडळीच्या दिशेनं आलो. डोंगरावरून खाली उतरताना मला दिसत होतं सोनकिर, पाडळी आणि दूरवरचं सोनसळ गाव….

तेव्हा मला आप्पा म्हणालेलं आठवतं,”संपत, ते सोनसळ दिसतंय. ते कदम सायेबाच गाव आहे.”

तेव्हा कदम सायेब कोण? कळण्याचं वय नव्हतं. पण नंतर मात्र पतंगराव कदम यांच्या कामाची पद्धत जवळून पहायला मिळाली.

पतंगराव कदम १९६७ च्या सुमारास त्यांच्या गावातून सोनसळमधून पुण्याला जाताना शेणोली या गावापर्यंत चालत गेले होते. तिथून कराडपर्यंत एसटीने आणि कराडवरून दुसऱ्या एसटीने गेले होते. हा माणूस पुण्याला जातानाही तीन टप्प्यात गेला होता. दोन ठिकाणी थांबावे लागले होते. असा हा माणूस स्वतःच्या कर्तबगारीवर खूप मोठा झाला.

एकेकाळी पायी चालत आणि एसटीने पुण्याला गेलेले पतंगराव कदम गावाकडे हेलिकॉफ्टरने यायला लागले. त्यांचं हेलिकॉफ्टर जेव्हा पलूस-कडेगावच्या अवकाशात दिसायचं, तेव्हा रानात राबणारी माणसं त्या आकाशात दिसणाऱ्या हेलिकॉफ्टरकडे पहात बसायची… साहेबांचं हेलिकॉफ्टर पाहून त्यांना खूप आनंद वाटायचा. छाती अभिमानाने भरून यायची.

“आपलं साहेब हेलिकॉफ्टरमधून आल्याती” याचं त्यांना कौतुक वाटायचं.

ती माणसं बराच वेळ आकाशात बघत बसायची. हेलिकॉप्टरचा आवाज ऐकला की लोकांना ते साहेबांचच आहे, असं वाटायचं. मग ते कोणाचंही असलं तर लोकांना ते साहेबांचं आहे, असं वाटायचं. गेल्या काही वर्षात साहेब बऱ्याचदा हेलिकॉफ्टरने आले. साहेबांचं हेलिकॉप्टर जवळून बघायला माणसं घरातल्या बारक्या पोरांनाही घेऊन गेली. ज्यांनी साहेबांचं हेलिकॉफ्टर जवळून पाहिलं, ती आपल्या पैपाहुण्यांना त्याबद्दल सांगत रहायची.

मागच्या शनिवारीही सोनसळ गावच्या अवकाशात हेलिकॉफ्टर घिरट्या घालू लागलं आणि लोकांनी हंबरडा फोडला… कारण त्या हेलिकॉफ्टरमधून साहेब उतरणार नव्हते… नेहमीप्रमाणे हेलिकॉफ्टरमधून उतरून जमलेल्या लोकांच्या दिशेनं पहात हात उंचावणार नव्हते… तर शांत झोपलेले, लोकांशी काहीही न बोलू शकणारे साहेब त्या हेलिकॉफ्टरमधून येणार होते… साहेबांचा तो आश्वासक आवाज लोकांना ऐकायला मिळणार नव्हता… साहेब कोणाशी बोलणार नव्हते…. हे माहिती होतं म्हणून सोनसळ गावातील लोक आक्रोश करत होते.

काही वर्षांपूर्वी जो माणूस चालत पुण्याला गेला, तो सायेब बनून हेलिकॉप्टरने परत आला. तो सायेब आणि त्यांचं हेलिकॉफ्टर याचा लोकांना अभिमान वाटत होता. शनिवारी हेलिकॉप्टर आलं, त्यातून साहेब आले पण ते कोणाशीही बोलले नाहीत. माणसं हाका मारत होती, साहेबांच्या नावानं हंबरडा फोडीत होती, हेलिकॉफ्टर आलं पण साहेबाला पैल्यासारखं धडस घेऊन आलं नाही. एरव्ही हेलिकॉफ्टर वाजलं, की चैतन्य निर्माण व्हायचं पण शनिवारी हेलिकॉफ्टर आल्यावर ऐकू येत होता जनतेचा आक्रोश….

 

लेखक- संपत लक्ष्मण मोरे, 9422742925