सांगलीचा कोंबडा ‘अण्णा अण्णा’ केकाटला अन् चमत्कार झाला…

कर्ता करविता परमेश्वर आहे, त्याच्या मर्जीशिवाय इथं पानही हालत नाही, प्रत्येक गोष्टीचा उचित काळ हा ठरलेला आहे…

पृथ्वीतलावर भारत नामक राज्यात, नरेंद्र आणि देवेंद्र रुपी अवतार घेतलेल्या राहू आणि केतू नामक आपले पाल्य संकटात आल्याने, नागपूर नगरीत रेशीम दरबारी तातडीची बैठक बोलावून खलबते चालू झाली.

सरतेशेवटी नागपूर नरेशांनी एका गंधर्वाला बोलावून, कानामध्ये मंत्र दिला. नागपूर नरेशांना वंदन करून, त्या गंधर्वाने सुक्ष्म रुप धारण करून एका कोंबडीच्या अंड्यात प्रवेश केला, सदर अंडे नागपुर मार्गे सांगली नामक नगरीत एका शेतकऱ्याच्या घरी पोहचले, उचित काळ येताच त्या अंड्यातुन एक देखणा कोंबडा जन्म पावला. या कोंबड्याच्या चोची वरचे तेज पाहुन शेतकरी दिपून गेला, आणि त्याने त्याचा उत्तम सांभाळ केला.

आजूबाजूला भरपूर कोंबड्या असल्याने कोंबडा त्यांच्यात चांगलाच रमून गेला, आणि त्याला आपल्या कार्याचा विसर पडला, सदर गोष्ट नागपूर नरेशांच्या लक्षात आली, त्यांनी सूक्ष्म रूपाने जाऊन त्या कोंबड्याला आपल्या अवतार कार्याची आठवण करून दिली, खजिल झालेल्या कोंबड्याने माफी मागून लवकरच आपले कार्य सिद्दीस नेतो हा शब्द नागपूर नारेशांना दिला.

दुसऱ्याच दिवशी डालग्यातून ‘अण्णा’ ‘अण्णा’ ‘अण्णा’ असा आवाज ऐकू येऊ लागला, या आवाजाने दाही दिशा दुमदुमल्या, नागफण्यावरील पृथ्वी डोलू लागली, विजांचा कडकडाट झाला….

आणि काय आश्चर्य? संबंध पृथ्वीतलावरील जनता ज्यांना झोपेतून उठवायचा प्रयत्न करत होती, पण यत्किंचितही फरक न पडणारे, चार युगे झोपलेले अण्णा जागे झाले…. रेशीम दरबारातून फुलांचा वर्षाव झाला….

अण्णा जागे झालेले समजल्यावर आता मोठे आंदोलन छेडलं जाणार, हे वेळीच जाणून आम्ही जिन्स आणि कुर्ता काढला. माळ्यावर गठुड्यात टाकलेली ‘मैं अण्णा हूं’ ची गांधी टोपी काढली, एक मेणबत्ती घेऊन आम्ही मुंबई गाठली…

मुंबईत रस्त्या-रस्त्यावर मेणबत्त्या घेऊन, टोप्या घालून लोक उतरली असतील असं वाटलं… आम्ही सगळी मुंबई पालथी घातली पण कुठं काय हालचाल दिसेना, म्हणलं पत्ता चुकला असेल…

सरळ दिल्ली गाठली, जंतर मंतर पाहिलं… तर तिकडं सामसूम…

दहा लोकांना विचारलं, अण्णा किधर है? तर लोकं म्हणाली, “कोण अण्णा?”

शेवट आम्ही ध्यानाला बसून अंतरज्ञानाने अण्णांचे लोकेशन जाणून घेतले, अण्णांनी दक्षिण मोहीम हाती घेतली आहे हे लक्षात आले….

आम्ही तडक कर्नाटक गाठले, अण्णा लोडला टेकून धोतराच्या सोंग्यात काजू बदाम घेऊन बसले होते, अण्णांना बघून आमच्या जीवात जीव आला…

आम्ही: शरण ही गे शरण शरणार्थी…

अण्णा: शरणार्थी…

आम्ही: निऊ इकडी ह्याग बंदरी? (तुम्ही इकडे कसे?)

अण्णा: अदु होल बिडू, नि इकडी ह्याग टपकास दी? (ते जाऊदे, पण तू इकडं कसा टपकलास?)

आम्ही: असंच बोंबलत, पण तुम्ही मुंबई-दिल्ली सोडून तुम्ही इकडं काय करताय? (जय महाराष्ट्र)

अण्णा: इकडं काँग्रेसचं सरकार आहे ना… आंदोलनाची खरी गरज इथं आहे.

आम्ही: तिकडं महाराष्ट्र पेटलाय, इथल्या पेक्षा तिथं शेतकरी आत्महत्या जास्त आहेत आणि तुम्ही इकडं?

अण्णा: (चेहरा गंभीर) तिथं आपला देवेंद्र आहे रे… आणि इथं इलेक्शन….

तसं आम्ही ताडकन उठलो, अण्णांच्या हाताला धरलं, आणि ओढत म्हणलं चला महाराष्ट्रात… अण्णा तुमची गरज तिथं आहे….

तसा अण्णांनी आमचा हात झिडकारला आणि गरजले…

“जबरदस्ती नको, नाहीतर मी परत झोपी जाईन हं.”

अण्णा परत झोपणार या विचारानेच आमच्या अंगावर काटा आला, आम्ही टोपीची घडी घालून खिशात ठेवली, तिथंच मेणबत्ती पेटवली, सोंग्यातले चार बदाम उचलले, आणि घरचा रस्ता धरला…

लेखक- अमोल शिंदेसंपर्क- amolshinde25@gmail.com

(लेखातील मतांशी संपादक/मालक सहमत असतीलच असे नाही. आपले लेख आम्हाला contact@thodkyaat.com वर पाठवा)