आईचं प्रेत घरी ठेवून मुलीनं दिला दहावीचा विज्ञानाचा पेपर

काळ क्रूर असतो असं नेहमी म्हणतात. तो कुणावर आणि कधी काय वेळ आणेल याचा नेम नाही. नागपूरजवळच्या मौदा तालुक्यातील धर्मापूरमध्ये अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलीय. 

दीक्षा अरुण लाडेकर… मोदा तालुक्यातील विश्वमेध महाविद्यालयात 10 वीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी… मूळची वाकेश्वरची… बुधवारी तिचा विज्ञान विषयाचा पेपर होता. सकाळी 11 वाजता पेपर सोडवायला पोहोचायचं होतं, मात्र सकाळी 9 वाजता दीक्षाच्या आईचा आकस्मिक मृत्यू झाला. 

दीक्षावर आभाळ कोसळलं. आई वडिलांची दीक्षा एकुलती एक मुलगी. जिनं जन्म दिला ती आता या जगात नव्हती. अश्रूचा बांध फुटला होता. दहावीचं वर्ष महत्त्वाचं मात्र दुसरीकडे डोळ्यासमोर आईचं प्रेत… जिथं भल्याभल्यांचा धीर सुटतो तिथं त्या कोवळ्या जिवाला काय करावं हे थोडीच कळणार… 

घरी अठराविश्व दारिद्रय त्यामुळे दहावीचा पेपर देणं गरजेचं होतं. दीक्षानं धीर एकवटला. काका, मामा आणि जमलेल्या नातेवाईकांना मी येईपर्यंत आईवर अंत्यसंस्कार करु नका म्हणून सांगितलं. काळ कठीण होता, मात्र दीक्षानं खंबीर होत परिस्थितीला सामोरं जायचं ठरवलं. त्या इवल्याश्या पोरीच्या धैर्यानं काळाचंही काळीज थरथरलं असेल.

डोंगराएवढं दुःख उराशी घेऊन दीक्षा परीक्षाकेंद्रावर दाखल झाली. विज्ञानाचा पेपर देण्याची कोणती मानसिकता अशावेळी आपल्यात असेल? मात्र त्या पोरीनं पेपर दिला आणि गाव गाठला. आईच्या अंत्यसंस्कारीच तयारी झाली होती, नातेवाईक तिचीच वाट पाहात होते. एवढा वेळ धरलेला संयम सुटला आणि दीक्षानं हंबरडा फोडला. ते हृदय हेलावून टाकणारं दृश्य पाहून उपस्थितांच्या डोळ्यालाही पाण्याची धार लागली.