19 व्या वर्षी शेतीतून सोनं पिकवणारी कृषिकन्या, करते लाखोंची उलाढाल

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये महिला चांगलं काम करत असेल. शेतीमध्ये तर अनादी काळापासून कामांचा गाडा ओढण्याचं काम महिला वर्गाने केलं आहे. आजही शेतीत काम करणाऱ्या महिलांचं प्रमाण सर्वाधिक आहे, मात्र वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी शिक्षण सोडून मुलीनं शेतीची जबाबदारी खांद्यावर घेणं आणि शेतीतून लाखो रुपये कमावणं याचा तुम्ही विचार करु शकता का? तुम्ही काहीही विचार करा मात्र हे खरं आहे…

जालना जिल्ह्यातील कडवंची गावात नारायण क्षीरसागर नावाचे इसम राहतात. नारायणरावांचा 5 वर्षांपूर्वी अपघात झाला आणि ते अंथरुणाला खिळले. त्यांना शेती आहे 6 एकर मात्र अपघातामुळे ही शेती कोण कसणार असा सवाल नारायणरावांना पडला. कारण नारायणरावांना एकूण 7 मुली पैकी 6 मुलींची लग्न झालेली. घरात उरली एकुलती एक मुलगी तीही अवघ्या 13 वर्षांची… मुलगा नसल्याचं दुःख नारायणरावांना ठसठशीतपणे जाणवलं मात्र त्यांच्या याच दुःखावर फुंकर घालण्याचं काम त्यांच्या त्या लहानग्या लेकीनं केलं….

नाव उमा क्षीरसागर… सध्याचं वय 19 वर्षे… एक दोन नव्हे तर तब्बल 6 एकर शेती उमा एकटी कसतेय. 

आपल्या लेकीबद्दल नारायणराव कौतुकानं बोलतात, “दोन-तीन वर्षांपासून शेतीचं सगळं काम उमा करते. पुरुषासारखं काम करते. पिकाला पाणी देणं, ड्रीप वगैरे करणं सगळंकाही ती करते. मला मुलाची गरज नाही, अशी मुलगी काम करुन राहिली”, असं नारायणराव म्हणतात. 

 

उमालाही आपल्या कर्तव्याची चांगलीच जाणिव आहे. तिच्या बोलण्यातून ते स्पष्टपणे जाणवतं. “13 वर्षांची होते तेव्हा माझ्या वडिलांचा अपघात झाला. माझ्या 6 बहिणींची लग्नं झाली होती. अपघातामुळे वडिलांकडे लक्ष द्यायला कुणी नव्हतं. वडील उदास रहायचे. तेव्हा मी सातवीत होते, मात्र शाळा सोडून मुलासारखी मी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिले. पहिल्या वर्षी मला द्राक्षबागांबद्दल फारशी माहिती नव्हती, त्यामुळे फक्त 50 हजारांचे उत्पन्न काढले. हळूहळू माहिती वाढली तसं द्राक्षशेती वाढवली. आज अडीच एक द्राक्षशेतीमधून मी तीन-साडेतीन लाखाचं उत्पन्न काढते, असं उमा अभिमानाने सांगते.  

जालना जिल्हा म्हटलं तर पाणी समस्या तीव्र, मात्र उमानं त्यावरही मात केलीय. आपल्या सहा एकर शेतीसाठी तीनं शेततळं बांधलंय.

उमाच्या आईलाही आपल्या या लेकीचा सार्थ अभिमान आहे. वय झालंय त्यामुळे आता उमाला स्थळं येऊ लागली आहेत. त्यावर तिची आई सांगते, “उमा सगळी कामं करते. स्वयंपाक करते, झाडलोट करते, दुधं काढते. रात्री बाराला लाईट आली की मोटर चालू करुन पिकांना पाणी देते. तुमचा मुलगा काय करीन ते सगळं आमची मुलगीच करते.”

 एकूण 6 एकर असलेल्या शेतीपैकी उमाने दोन एकरात द्राक्ष, दीड एकरात ज्वारी, दीड एकरात कापूस, अर्धा एकरात गहू तर उरलेल्या अर्धात एकरात हरभरा लावलाय. 2 एकरापैकी 35 गुंठ्यातील द्राक्षांची काढणी झालीय. यातून तिला 80 क्विंटल उत्पादन मिळालंय. तिच्या द्राक्षांना 36 रुपये प्रति किलोचा दर मिळालाय. या 35 गुंठ्यांमधून तिला तब्बल 3 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय. 

उमाला शेतीच करायची होती का? तर नाही… इतर मुलींसारखी तिचीही काही स्वप्न होती. उमाला शिकायचं होतं, मोठं व्हायचं होतं, मात्र काळ जालीम असतो असं म्हणतात. काळानं तिच्यापासून तिची स्वप्नं हिरावून घेतली. 

“स्वप्नं तर खूप होती, मला डॉक्टर व्हायचं होतं. मात्र ज्या आई-वडिलांनी मला जन्म दिला त्यांना दुःख नको म्हणून मी शेतीकडे वळले. आता शेती कधीच सोडणार नाही. माझ्या आई-वडिलांना तिळाएवढं सुद्धा दुःख देणार नाही, असं उमा सांगते.  

शेती हातात घेऊन उमाला आता तब्बल 5 वर्षांचा काळ लोटलाय. त्यामुळे तिच्यामधील प्रयोगशीलता चांगलीच वाढलीय. तिची प्रयोगशीलता वाढतेय तशी ती द्राक्षशेती वाढवतेय. चांगलं उत्पन्न कमावणं एवढंच फक्त तिच्या डोक्यात नाहीये, तर तिला तिच्या आई व़डिलांचा मुलगा व्हायचंय. त्यांना आयुष्यभराचा आधार द्यायचाय. उमाच्या या कामाला त्यामुळेच हॅट्स ऑफ….