राज ठाकरे मनसेला नवी संजीवनी देणार?

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या आधी गुजरातचे तेव्हाचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी राज ठाकरेंनी उघड पाठिंबा दिला होता. नरेंद्र मोदीच भारताला प्रगतीपथावर नेऊ शकतील, असं त्यांनी ठामपणे सांगितलं होतं. मोदींच्या लाटेवर स्वार होऊन मनसेला त्याचा फायदा मिळेल, असा कदाचित त्यांचा होरा असावा. पण तसं झालं नाही. विधासभेला मनसेचा सुपडा साफ झाला. पुढे मग मुंबई, पुणे, नाशिकमध्येही मनसेला फारसं काही साध्य करता आलं नाही. साहेब एकटे पडल्यासारखं झालं. त्यानंतर “तुमच्या राजाला साथ द्या” अशी साद घालणारं गाणंही गुप्तेंनी काढलं. पण परिस्थिती फार काही बदलली नाही. 

खरं तर राजसाहेबांनी महाराष्ट्राची ब्लूप्रिंट सादर केली, तेव्हा माझ्यासारख्या अनेक तरुणांना त्या ब्लूप्रिंटने भुरळ घातली होती. परदेशात राहणाऱ्या कित्येक तरुण तरुणींनी फेसबुकवर ह्या ब्लूप्रिंटचा व्हिडीओ शेअर करून राजसाहेबांना पाठिंबा दर्शवला होता. आपला महाराष्ट्र असाच असला पाहिजे असं कुठंतरी या तरुण तरुणींना वाटलं होतं. राजसाहेब हे आधीपासून बोलत होतेच. २०१४ ला फक्त निवडणुकीचा मुहूर्त साधला. तरीही लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा फक्त एक आमदार निवडून आला. तो मनसेचा उमेदवार म्हणून निवडून आला नव्हता असे म्हणतात. 

“एकदा सत्ता देऊन तर बघा” म्हणून साद घालणाऱ्या राजसाहेबांना नाशिकच्या जनतेने साथ दिली. एकहाती सत्ता आली तरीही नाशिकमध्ये मनसे फार काही करू शकली नाही. बरंचसं श्रेय कुंभमेळ्यालाच गेलं. साहेबांनी फक्त नाशिकला वरचेवर भेट दिली असती तरी काम झालं असतं असंही बरेचजण म्हणाले. पुढच्या निवडणुकीला नाशिकमध्ये मनसेचं संख्याबळ ४० वरून ५ वर आलं यावरून काय ते समजून घ्या. इतर शहरांची आकडेवारी न दिलेलीच बरी. 

सगळीकडेच सत्ता गेल्यावर राजसाहेब काहीकाळ शांत राहिले. अधूनमधून टोलनाक्यांचं आंदोलन, पाकिस्तानी कलाकारांवरची टीका, बॉलिवूड कलाकारांवरची टीका आणि अगदी अलीकडे मुंबईतले फेरीवाले अशी आंदोलने करत राजसाहेब चर्चेत राहिले. पण या सगळ्यात जुने जहाल राजसाहेब कुठेतरी हरवल्यासारखे वाटत होते. मनसे कुठेतरी दिशाहीन वाटत होती. 

दरम्यानच्या काळात 

“राज ठाकरे फक्त बोलतो, करत काहीच नाही.” 

“राज ठाकरे म्हणजे तोंडाची हवा आहे नुसती. बाकी काही नाही.”

“मनसे संपली रे. आता अवघड आहे.”

“लोक करमणूक म्हणून राज ठाकरेच्या सभेला जातात. पोरं शिट्ट्या मारून घरी जातात. मनसेला मतं मात्र कोणीच देत नाहीत.”

अशा प्रकारची वाक्य गल्लीत, नाक्यावर सगळीकडेच ऐकू येत होती. 

काल गुडीपाडवा मेळाव्यात राज साहेबांचं भाषण झालं. ही सभा निश्चितच २०१९ च्या निवडणुकांची तयारी म्हणून बघितली गेली. त्यात तथ्यही आहे. मात्र या सभेचं एक वेगळेपण होतं. ज्या मोदींना राजसाहेबांनी बेशर्त पाठिंबा दिला होता, त्याच मोदींवर त्यांनी कडाडून टीका केली. असे का बरे? खरोखर मोदींनी काहीच केले नाही का? नोटबंदी, जीएसटी यामुळे सर्वसामान्य जनता खरोखर खुश आहे का? व्यापारीवर्ग खुश आहे का?शेतकऱ्यांनी मोर्चे का काढले? धर्मा पाटलांना का टोकाचे पाऊल उचलावे लागले? देशात वेगवेगळ्या ठिकाणी धार्मिक, जातीय मुद्द्यांवर सगळेच हमरीतुमरी वर का येऊ लागलेत? बुलेट ट्रेन खरोखर गरजेची होती का? असली तर ती मुंबई आणि अहमदाबाद या शहरांना जोडणारीच का? आज खरोखर वृत्तपत्र आणि वाहिन्या स्वतंत्र आहेत का? समाजमाध्यमांवर सरकारवर टीका केलेल्या तरुणांना नोटिसा का आल्या? मुंबईच फायनान्शियल सेंटर गुजरातला का गेलं? असे अनेक प्रश्न आहेत. ते भर सभेत बोलून दाखवण्याचं धाडस राज साहेबांनी दाखवलं. ज्येष्ठ पत्रकार अमेय तिरोडकर यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर लिहिलं देखील “Calling spade a spade!” चुकीला चूक म्हटल्याबद्दल तिरोडकरांनी राज साहेबाचं कौतुक केलं. राज साहेबांनी काल जे केलं हे कुठेतरी गरजेचं होतं.  

येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्रच्या जनतेला गेल्यावेळेसारखी “एकदा सत्ता देऊन तर बघा.” अशी साद राजसाहेब पुन्हा घालतील? भाजप-शिवसेनेचे भांडण, राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची ढासळती प्रतिमा यातून मनसेकडे एक पर्याय म्हणून बघा असं राजसाहेब म्हणतील? आपला मराठी मुद्दा २००९ ला ग्लोरीफाय केला तसा आताही करतील? की हे सगळं न करता काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाऊन भाजपला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील? सेना-भाजपची मते खाणारा पक्ष म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीला मदत करतील? एखाद्यावर टीका करून ऐन वेळेस गप्प बसणारा नेता ही आपली प्रतिमा बदलू शकतील? नाशिकमध्ये झाले ते पुन्हा होणार नाही याची खात्री जनतेला देऊ शकतील? निवडणुकांना अजून एक वर्ष आहे. काहीही होऊ शकते. 

कालच्या भाषणानंतरही राजसाहेबांना गांभीर्याने घेणाऱ्या लोकांची संख्या कमीच असेल. लोकांनी कितीही खिल्ली उडवली तरी देशातल्या,महाराष्ट्रातल्या सद्य परिस्थितीमध्ये राजसाहेबांचं भाषण निश्चित योग्य होतं. एक दोन चुका असल्या तरी. बऱ्याच दिवसांनी राजसाहेबांची मुलुखमैदानी तोफ पुन्हा एकदा धडाडल्याचं या भाषणानंतर जाणवलं. इतकी वर्षे चुकत असलेलं टायमिंग यावेळी राजसाहेबांनी साधल्यासारखं वाटलं. कालच्या सभेत पुन्हा एकदा जुने राजसाहेब परतल्यासारखे वाटले. या सभेतून मरगळलेल्या मनसेच्या शिलेदारांना नवी संजीवनी देण्याचा प्रयत्न राज साहेबांनी केल्यासारखे वाटले. त्यात ते कितपत यशस्वी होतात आणि जनता पुन्हा एकदा त्यांना साथ देते का हे मात्र येणारा काळच सांगू शकेल. 

-आदित्य गोपाळ गुंड, aditya.gund@gmail.com ( लेखक एमएनसीमध्ये कामाला आहेत )