शरद पवार खरंच देशाचे पंतप्रधान होणार का???

लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतशी भारताच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होत असल्याचं पहायला मिळतंय. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. शरद पवार यांच्याकडे आगामी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाहिलं जातंय. त्याच अनुषंगाने काँग्रेसने त्यांना ही ऑफर दिल्याची चर्चा आहे.

पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून शरद पवारच का???

पंतप्रधानपदासाठी शरद पवारच का? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. देशाच्या राजकारणात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देऊ शकेल असाृ शरद पवार यांच्या तोडीचा एकही नेता नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उभरतं नेतृत्व आहेत, मात्र अनुभव आणि मुत्सद्देगिरीच्या बाबतीत ते नक्कीच कमी पडतील. दुसरीकडे ममता बॅनर्जी यांच्या नावाची चर्चा आहे, मात्र ममता बॅनर्जी शीघ्रकोपी आहेत. मोदींना टक्कर द्यायची असेल तर सर्व विरोधी पक्षांची मोट बांधावी लागेल आणि ममता बॅनर्जींना ते निश्चितच जमणार नाही. त्यांना नेतृत्त्व सर्व विरोधक मान्य करतील अशी तरी परिस्थिती सध्या देशात नाही. दुसरीकडे शरद पवार यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत सौदार्हाचे संबंध आहेत. त्यांच्या नावाला सहसा कोणी विरोध करणार नाही अशी परिस्थिती आहे. मोदींविरोधात लढण्यासाठी त्यामुळेच शरद पवारांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता आहे. 

प्रफुल्ल पटेल यांनी आधीच ओळखलं होतं वारं???

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आधीच हे राजकीय वारं ओळखलं होतं का? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनापूर्वी झालेल्या चिंतन बैठकीत त्यांनी शरद पवार हे आगामी पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या दृष्टीने कामाला लागावे, अशी घोषणा केली होती. प्रफुल्ल पटेल यांनी ही घोषणा केली, मात्र शरद पवार यांना ती मुळीच पटली नव्हती. चिंतन शिबीराच्या समारोपाच्या भाषणात बोलताना त्यांनी यावरुन प्रफुल्ल पटेल यांचे चांगलेच कान ओढले होते. मात्र सध्याचं राजकीय वारं पाहता प्रफुल्ल पटेल यांनी वर्तवलेलं भविष्य खरं होण्याची शक्यता दिसतेय.

काँग्रेसमध्ये सामील होणार की राष्ट्रवादीतच राहणार???

पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून काँग्रेस शरद पवार यांच्याकडे पाहात असेल तर सहाजिकच शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये सामील व्हावं हाच काँग्रेसचा पहिला प्रयत्न असणार आहे. शरद पवार यापूर्वीही स्वतंत्र पक्ष काढून पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाल्याचा इतिहास आहे.

दुसरीकडे स्वतःच्या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व ठेऊन पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करावे याकडेच शरद पवार यांचा कल राहील. त्यासाठी ते मोठ्या प्रमाणावर प्रयत्नही करतील. काँग्रेस सोडून इतर पक्षांची याविषयावर काय भूमिका राहते यावर सगळं ठरण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेस स्वतःच्या मागणीवर ठाम राहीलं तर पवार पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याच्या पर्यायाचाही विचार करु शकतात.