फेसबुकवर तुमची माहिती चोरणारे अॅप्स कसे डिलीट कराल???

फेसबुकवरुन माहिती चोरल्याचा आणि त्याचा गैरवापर केल्याचा प्रकार उघड झालाय. या प्रकारामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. अमेरिका आणि कॅनडामध्ये कोट्यवधी लोकांनी फेसबुकला रामराम ठोकला आहे. फेसबुकची या प्रकरणात मोठी बदनामी झाली असून फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गनं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये डाटा चोरी झाल्याचं मान्य केलं आहे. यापुढे अशी खबरदारी घेण्याचं आश्वासन त्यानं फेसबुक वापरकर्त्यांना दिलं आहे. 

फेसबुक वापरकर्त्यांना डाटा सुरक्षित राहण्यासाठी काळजी घेईल अथवा न घेईल मात्र आपण आपला डाटा सुरक्षित रहावा यासाठी काळजी घ्यायला हवी. अनेकजण फेसबुक डिलीट करण्याचा निर्णय घेत आहेत. खरंतर आपली माहिती सुरक्षित ठेवण्याचा हाच सर्वात सोपा आणि चांगला प्रकार आहे, मात्र फेसबुक हे एक प्रकारचं व्यसन आहे आणि व्यसन जसं सुटत नसतं तसं फेसबुक वापरल्याशिवाय अनेकांना चैन पडत नसते. त्यामुळे फेसबुक वापरुनही आपली माहिती सुरक्षित ठेवता आली तर किती बरं ना? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. असं करता येतं का? तर हो… ते कसं करायचं ते आम्ही आपल्याला समजून सांगूच मात्र आधी पाहुयात…

फेसबुकवरुन माहितीची चोरी नेमकी होते कशी???

फेसबुक स्वतः आपली माहिती चोरतं का??? तर या प्रश्नाचं उत्तर आहे “नाही, फेसबुक आपली माहिती चोरत नाही”… कारण फेसबुकला आपली माहिती चोरण्याची गरज नसते. जेव्हा तुम्ही फेसबुकचं खातं उघडता तेव्हा तुम्ही फेसबुकच्या टर्म्स अँड कंडीशन वाचणं आवश्यक असतं, मात्र आपल्यापैकी बहुतेकजण ते करत नाही. त्यामध्ये फेसबुकनं जे मुद्दे सांगितले आहेत ते पाहिलं तर तुमच्या सहज लक्षात येईल की फेसबुकला तुमची माहिती चोरण्याची काहीच गरज नाही, कारण तुम्ही खुद्द त्यांना तुमची माहिती वापरण्याची परवानगी दिलेली असते. 

तुम्ही फेसबुकला स्वतःची माहिती वापरण्याची परवनगी दिलेली असली तरी फेसबुकनं तिचा गैरवापर केल्याचं अद्याप तरी निदर्शनास आलं नव्हतं. अटलांटा प्रकरणातही फेसबुकने स्वतः त्यांना माहिती दिली नाही तर त्यांनी ती चोरल्याचं समोर आलं आहे. अटलांटानं जशी माहिती चोरली तशीच माहिती इतर अनेक अॅप्स चोरत असतात मात्र तुम्हाला त्याची कल्पना नसते. 

हल्ली “तुम्ही राजकारणात जाल तर कोणत्या खात्याचे मंत्री व्हाल”… “तुम्ही कोणत्या अभिनेत्या/अभिनेत्रीसारखे दिसता”… “तुमचे सर्वात चांगले १० मित्र कोणते”…. “तुम्ही आतापर्यंत किती मुलींचं हृदय तोडलं आहे”… असे प्रश्न विचारणाऱ्या अॅप्सनी फेसबुकवर धुमाकूळ घातला आहे. हे आणि अशाच प्रकारच्या अॅपवर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा जाता तेव्हा ते तुम्हाला तुमची माहिती वापरण्याची परवानगी मागते. आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी एवढे वेडे झालेलो असतो की आपण आपली महत्त्वाची माहिती त्यांना वापरण्याची परवानगी देतोय याचाच आपल्याला विसर पडतो. कोट्यवधी लोकांची माहिती हे अॅप्स असेच गोळा करतात आणि एखाद्या एजन्सीला लाखो-करोडो रुपयांमध्ये विकतात. अटलांटा प्रकरणाप्रमाणे त्या माहितीचा गैरवापर केला जातो. हल्ली तुमच्या मेलबॉक्समध्ये अनावश्यक मेल येण्याची संख्या वाढली असेल तर समजून जा की तुमची माहितीही विकली गेलीय.

माहिती चोरणारे अॅप्स फेसबुकवरुन कसे डिलीट कराल???

कळत-नकळत असे अनेक अॅप्स तुम्ही तुमच्या फेसबुकमध्ये अॅड केलेले असतात. सर्वात आधी हे अॅप्स तुमच्या फेसबुकवरुन हटवा. ते हटवण्यासाठी खालील स्टेप्स वापरा…

फेसबुकच्या सेटींगमध्ये जा…

वर दाखलेल्या फोटोत दाखवल्याप्रमाणे Apps वर क्लिक करा.

तुम्हाला तिथे जेवढे अॅप्स दिसतील तेवढे अॅप्स सध्या तुमची माहिती वापरत आहेत. ज्यामध्ये तुमचं नाव, वय, पत्ता, इमेल आयडी पासून ते अगदी फोन नंबरचा समावेश आहेत. 

प्रत्येक अॅपच्या पुढे edit आणि delete हे दोन पर्याय दिसतील. जे अॅप्स तुम्हाला विश्वासार्ह वाटत नाहीत ते सगळे डिलीट करा…

अॅप्स डिलीट केल्याने तुमची माहिती चोरणे थांबेल का?

याबद्दल निश्चित सांगता येणार नाही. वरील अॅप्सला तुम्ही अगोदरच परवानगी दिल्याने त्यांनी तुमचा डाटा चोरल्याची शक्यता आहे. तो डाटा त्यांच्याकडे सेव्ह असणार. तुम्ही ते अॅप डिलीट केल्याने त्यांच्याकडे साठलेला डाटा नक्कीच डिलीट होणार नाही. मात्र भविष्यात तुमचा डाटा कोणी चोरेल ही शक्यता कमी होईल.

भविष्यात फेसबुक वापरताना काळजी घ्या. लोक एखाद्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेतात म्हणून आपणही जाणून घ्यायचं अशा प्रलोभनांपासून दूर राहा. अॅप्सना परवानगी देताना ते नक्की काय माहिती घेतात याकडे लक्ष द्या… तुमची माहिती सुरक्षित राहील याची काळजी घ्या… 

(आम्ही दिलेली माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. ही पोस्ट शेअर करा…)