पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर रडणाऱ्या मुलाचा फोटो का टाकला???

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी फेसबुकवरील आपल्या अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये गोपिनाथ मुंडे यांच्या फोटोसोबत एका रडणाऱ्या लहान मुलाचा फोटो आहे. पोस्टमध्ये एक इंग्रजी वाक्यही आहे, ज्याचा मराठीत अर्थ “मला तुमची कमी जाणवतेय” असा होतो. पंकजा मुंडे यांची वडिलांशी चांगलीच अटॅचमेंट होती. वडिलांच्या एकाकी जाण्यानं त्या कोसळल्या होत्या. निवडणुकांमध्ये याचा प्रत्यय आला. मात्र पुढच्या काळात त्यांनी स्वतःला सांभाळलं. आता त्यांना पुन्हा एकदा वडिलांची कमी जाणवतेय…

पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. पंकजा मुंडे नाराज असल्याचं सांगितलं जातंय. त्यांच्याकडे असलेल्या खात्यांचे निर्णय त्यांना विश्वासात घेऊन घेतले जात नाहीत अशीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांना एकटेपणा जाणवतोय. त्याच एकटेपणातून त्यांना वडिलांची कमी जाणवतेय असं बोललं जातंय. 

पंकजा मुंडे का आहेत नाराज???

-अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावण्यावरुन विधीमंडळात चांगलंच रणकंदन पहायला मिळालं. विरोधी पक्षांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त करत सरकारवर हल्ला चढवला. विरोधकांचं लक्ष्य अर्थातच महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे होत्या. 

-सरकारनं मेस्मा लावण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे पंकजा मुंडे निर्णयावर ठाम होत्या. विरोधक जोरदार हल्ला चढवत असतानाही त्यांनी 3 दिवस सरकारची बाजू जोरकसपणे मांडण्याचा प्रयत्न केला.

-पंकजा मुंडे 3 दिवस सभागृहात सरकारची बाजू लावून धरत होत्या तेव्हा त्यांच्या मदतीला शिक्षणमंत्री विनोद तावडे वगळता सत्ताधारी मंत्री धावलेले पहायला मिळाले नाही. 

-मेस्मावरुन पंकजांना विरोधकांनी घेरले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात होतो, मात्र एकदा तर त्यांनी चक्क गोंधळानंतर सभागृह सोडून जाणं पसंत केलं. अशा परिस्थितीत पंकजांनी एकाकी खिंड लढवल्याचं पहायला मिळालं.

-पंकजा अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावण्याची बाजू लावून धरत असताना मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी सेविकांना मेस्मातून वगळण्याचा निर्णय घेतला. तसा निर्णय रात्री पंकजा मुंडे यांना कळवण्यात आला होता असं कळतंय.

-दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी सेविकांना मेस्मातून वगळण्याचा निर्णय सभागृहात जाहीर केला. तेव्हा पंकजा मुंडे सभागृहात नव्हत्या त्यामुळे त्यांची नाराजी उघडपणे समोर आली. 

-तत्पूर्वी रात्री उशिरा त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली होती. ज्यामध्ये “बाबा मला तुमची कमी जाणवतेय” असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यामुळे पंकजा मुंडे राज्याच्या राजकारणात एकट्या पडल्या आहेत का? मुख्यमंत्री त्यांना विश्वासाघात घेऊन निर्णय घेत नाहीत का? असे प्रश्न उपस्थित झालेत.

 

मेस्मा म्हणजे काय?

-मेस्मा म्हणजे महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम-२०११…

-अत्यावश्यक सेवा जसे की दवाखाने, सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेसंबंधी सेवा तसेच औषधविक्री सेवा यांचा मेस्मामध्ये समावेश आहे.

-अशा सेवा देणाऱ्यांना कायद्यानुसार लोकहित ध्यानात घेऊन संप करण्यास मनाई करण्यात येते. आदेशाची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. 

-अंगणवाडी सेविका आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संप करतात त्यामुळे त्यांना या कायद्यांतर्गत आणण्याचा सरकारचा प्रयत्न होता. 

पंकजा मुंडे यांचे फेसबुक पोस्ट-