शरद पवार पंतप्रधान होत असतील तर पाय कशाला ओढता???

लोकसभेच्या २६ जागा असलेल्या गुजरातचा व्यक्ती पंतप्रधान होऊ शकतो कारण तिथे प्रांताचा माणूस म्हणून आपुलकी आहे, पण लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्राचा व्यक्ती पंतप्रधानपदाचा दावा करत असेल तर तो पंतप्रधान होऊ शकत नाही, असे म्हणणारे लोक त्याच्याच राज्यात आहेत. हीच बाब महाराष्ट्रासाठी कलंक आहे. हा कलंक महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या काळापासून अस्तित्वात आहे आणि ह्या मातीशी गद्दारी करून इंग्रजांना फितूर होण्याचा इतिहाससुद्धा ह्याच मातीत आहे हे ह्या मातीचे दुर्दैव आहे… 

पवारसाहेब पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील तर या कमळीचा विचार न करता मी शरद पवारांच्या पाठीशी ताकद उभा करेल, महाराष्ट्रीयन माणूस पंतप्रधान व्हावा हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे स्वप्न होते आणि ते जाहीर सभेत बोलत असत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचेच नाही तर अखंड महाराष्ट्राचे ७० वर्षांपासून अपूर्ण असलेले स्वप्न पूर्ण होण्याची संधी आदरणीय शरद पवारसाहेबांच्या रूपाने महाराष्ट्राला मिळते आहे की नाही हे २८ मार्चला आपल्याला कळेलच. ह्या संधीला २६ राज्यातील ३० पेक्षा अधिक पक्षांचे समर्थन असणार आहे. तेव्हा फक्त महाराष्ट्राच्या खासदारांच्या जागा मोजू नका तर ह्या ३० पक्षांच्या २०१९ ला निवडून येणाऱ्या जागांचा सुद्धा आकडा काढा!

असे असले तरी पवारसाहेब यांच्या पाठीशी फक्त ते महाराष्ट्रीयन आहेत म्हणून त्यांना समर्थन द्या, असे आंधळे समर्थन करणाऱ्यातला मी नाही, पवारसाहेबांना समर्थन का ह्यासाठी खालील काही मुद्दे जाणून घ्या!

– किल्लारी भूकंपानंतर पुनर्वसन केलेला पॅटर्न हा जगभरासमोर आदर्श ठरेल, असे भरीव काम करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 

– स्वामिनाथन आयोगाच्या १५ पैकी १४ शिफारसी दर वर्षी शक्य तितके बजेट वाढवून जशाच्या तशा लागू करणारे कृषिमंत्री

– दुष्काळग्रस्त बारामतीला सुजलाम सुफलाम बनवून भारतातल्या प्रत्येक ग्रामीण नेत्यासमोर विकासाचा आदर्शाचा पॅटर्न घालून देणारे स्थानिक नेतृत्व 

– जगातली सगळ्यात मोठी कर्जमाफी करून पिचलेल्या शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्याची सुवर्णसंधी निर्माण करून देणारे कृषिमंत्री 

– सैन्यदलात महिलांना १५% आणि राजकारणात महिलांना ३३% आरक्षण देऊन त्याची यशस्वी अंमलबजावणी करून घेणारे संरक्षणमंत्री 

– BCCI च्या अध्यक्षपदी न भूतो न भविष्यती अशी अतिशय उत्कृष्ठ कामगिरी करून त्यांच्या कारकिर्दीच्या अखंडतेसाठी वयाची अट शिथील करण्याची गरज पडावी इतकी मोलाची कामगिरी बजावणारे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येसुद्धा आपला दबदबा निर्माण करणारे ICC अध्यक्ष 

– खेळाडूंसाठी आणि कलाकारांसाठी कुठलीही सुविधा नसल्यामुळे कलागुणांना वाव न मिळण्याची परंपरा नष्ट करून त्यांना भविष्याची चिंता पडू नये म्हणून वेगवेगळ्या योजना आणि कायमस्वरूपी तरतुदींची अंमलबजावणी करणारे मुख्यमंत्री 

– १९९९च्या काळात काळीपिवळी आणि रिक्षावाल्यांकडून सुद्धा हफ्तावसुली व्हायची, ती बंद करण्यापासून ते आज पोलीसभरती प्रक्रियेत एक रुपयाही न भरता नोकरी मिळवण्याइतपत स्वच्छ कारभार करणारी यंत्रणा बदल्यात यशस्वी ठरलेले एक साधारण कार्यकर्ता ते आदर्श गृहमंत्री महाराष्ट्राला देणारे पवारसाहेब 

– केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना वेतन आयोग आजन्म जसाच्या तसा लागू व्हावा म्हणून कायदा करणारे मुख्यमंत्री

असे अनेक मुद्दे मला मांडता येतील, पण हे काही सुचले ते मांडलेत…

मोदीलाटेमुळे २०१४ मध्ये महाराष्ट्रात ४ खासदार निवडून आले, त्यावरून ४ आसनी नॅनो गाडीच्या क्षमतेवरून नॅनो पार्टी म्हणून चिडवणाऱ्यांनी ह्या बाबीचा विचार करावा…

४ खासदार 
४४ आमदार 
४४४ पंचायत समित्या 
४,४४४ जिल्हा परिषद सदस्य 
४४,४४४ ग्रामपंचायत सदस्य 
४,४४,४४४ पक्षाच्या शाखा 
४४,४४,४४४ कुटुंब पक्षाशी जोडलेले 
४,४४,४४,४४४ इतका जनसमुदाय पक्षाशी जोडलेला…

राष्ट्रवादीचे हे पुनर्वसन झाले आहे ते फक्त ४ वर्षाच्या कालखंडात, २०१४ ते २०१८ ह्या कालखंडात राष्ट्रवादीने गमावलेला विश्वास पुन्हा मिळवला आहे आणि साहेब पंतप्रधान होवोत अथवा न होवोत पण २०१९ ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रातली सर्वाधिक मोठी पार्टी म्हणून उसळणार म्हणजे उसळणारच! आणि ह्याला कारण आहे राष्ट्रवादी ह्या संपूर्ण पक्षाने केलेलं मागच्या १५ वर्षातील काम आणि पार्टीला हे काम करणे शक्य झाले ते पवार साहेबांच्या मार्गदर्शनामुळे. प्रत्येक गावातील कार्यकर्त्याला नावानिशी ओळखणारे आणि त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती ठेवणारे भारतातील एकमेव नेतृत्व. जातील त्या गावात सभेत पक्षवाढीविषयी न बोलता शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे आणि विविध योजनांची माहिती पुरवणारे, ८०% समाजकारण आणि २०% राजकारण हा नियम पाळणारे, परिस्थितीचा अचूक अभ्यास करून निष्कर्ष काढणारे, कधीही द्वेषाचे राजकारण न करणारे, विरोधकांचे सुद्धा काम करणारे, कृषी ते क्रीडा अश्या सर्वच क्षेत्रात ठसा उमटवणारे अष्टपैलू नेतृत्व श्रीयुक्त शरदचंद्रजी पवार साहेब हे आज दिल्लीच्या राजकारणाचा महत्वाचा दुवा ठरु पाहता आहेत ह्यातच त्यांच्या कार्यशैलीचा विजय आहे….

तोपर्यंत जर तरच्या बाबींवर हास्य विनोद करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तुम्हाला महाराष्ट्राच्या स्वप्नाला पूर्ण करणारा मावळा व्हायचे आहे कि इंग्रजांचे मांडलिकत्व पत्करणाऱ्यांच्या वंशजांशी हातमिळवणी करून महाराष्ट्राच्या मातीशी फितुरी करायची आहे याचा निर्णय पक्का करून घ्या. 

आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन, अखंड महाराष्ट्राचा विजय असो…

~ योगेश गावंडे- 9822366553, ygawande@gmail.com

( लेखक शरद पवार यांचे खंदे समर्थक आहेत )

 

( लेखातील मते लेखकाची स्वतःची आहेत. त्या मतांशी संपादक/मालक सहमत असतीलच असे नाही. आम्हाला आपले लेख contact@thodkyaat.com वर पाठवा )