माझ्या एका वाक्यावर भाऊसाहेब शिंदे खळखळून हसला. निरागसपणे…

हिंगणी आणि गव्हाणवाडीसारख्या खेड्यातून भाऊराव कऱ्हाडे आणि भाऊसाहेब शिंदे ही दोन पोरं चित्रपट बनवण्याच्या इर्षेनं शहरात येतात. खूप मेहनत करतात. चित्रपटाचं तंत्र अवगत करतात. ते ज्या शेतकरी कुटुंबातुन आलेले असतात त्या कुटुंबातील लोकांना टाकीत जाऊन पिक्चर बघणं ही गोष्ट अशक्य ठरावी, कोठे गावात 16 एम एमच्या पडद्यावर आला तरच पिक्चर बघणारी ही माणसं. त्याच शेतकरी कुटुंबातील भाऊराव कऱ्हाडे यांचा ख्याडा चित्रपट येतो, मराठी चित्रपट रसिक त्याला डोक्यावर घेतात. अनेक पुरस्कार ‘ख्याडा’ला मिळतात. भाऊराव कऱ्हाडे आणि भाऊसाहेब शिंदे या दोन नावाची चर्चा यानिमित्ताने सुरू होते. ‘ख्याडा’ने मराठी चित्रपटाला एक वेगळं वळण दिलेलं असतं.

गेल्याच चार दिवसांपूर्वी भाऊचा बबन आलाय. बबन हा ग्रामीण भागातील सद्यस्थितीचं वास्तव समोर आणणारा अलीकडच्या काही वर्षातला एकमेव चित्रपट आहे. बबन हा एका दारुड्या बापाचा पोरगा दुधाचा व्यवसाय करून शिक्षण घेतो. त्याची आई व आजी यांची त्याला साथ असते. गावातील चेअरमनच्या दुध डेयरीत कमी दर मिळतो म्हणून तो थेट कंपनीला दूध घालतो. गावातील चेअरमन आणि त्याचे गावगुंड यांना बबनचा राग येतो. स्वतःच्या कुटुंबासाठी कष्ट करून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करणारा बबन आणि त्याला त्रास देणारा चेअरमन, त्याचा मुलगा आणि गावगुंडांशी होणारा बबनचा संघर्ष, बबनची बंडखोरी आणि त्यासाठी त्याला चुकवावी लागणारी किंमत, बबन आणि कोमल यांचं प्रेमप्रकरण या गोष्टी चित्रपटात येतात. गावगाड्यातील राजकारण समोर आणण्याचा प्रयत्न बबन मधून झाला आहे.

‘बबन’चे वैशिष्ट्य म्हणजे अलीकडच्या काळात ग्रामीण भागातील वास्तवावर नेमकेपणानं बोट ठेवलं आहे. ग्रामीण भागातील राजकारण शहरी राजकारणाची कार्बन कॉपी झालंय. शहरातील कॉर्पोरेट राजकारण, चंगळवाद या बाबी गाव-खेड्यातील राजकारणातही आलेल्या आहेत. गावातील दोन पुढाऱ्यांचा सत्ता आणि पैसा मिळवण्यासाठीचा संघर्ष आणि त्यात स्वतःच्या कष्टाने जगणाऱ्या सामान्य माणसाची होणारी होरपळ, गावातील गरीब-श्रीमंत यांच्यातील वर्गीय संघर्ष, गरिबांनी जगायचं ते श्रीमंत पुढाऱ्यांची मर्जी राखूनच. कोणी बबन व्हायला गेले तर त्याच आयुष्य उद्ध्वस्त करायला पुढाऱ्यांना खूप वेळ लागत नाही. बैजू पाटील यांचा पोरगा असलेल्या बबनवर गावातील धनाढ्य चेअरमन कुरघोडी करतो. बबन एकाकी झुंज देतो पण त्याची ताकद तोकडी पडते आणि हेच वास्तव आहे. आजवरच्या अनेक चित्रपटात नायकाचा विजय झालेला दाखवून लोकांचे समाधान करण्याचा प्रयत्न झाला आहे पण वास्तवाशी भिडण्याचा प्रयत्न झालेला नाही. बबनने वास्तवाचा विस्तव मांडलाय.

परवा पुण्यात बबनचा प्रीमियर शो होता. या शो साठी मोठमोठी माणसं होतीच. पण भाऊराव कऱ्हाडे आणि भाऊसाहेब शिंदे यांच्या गावातील लोकही आलेले. ही माणसं पहिल्यादाच एवढी भारी टाकी बघायला आलेली होती. आपल्याच पोरांनी केलेला दुसरा चित्रपट बघताना त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघण्याचं भाग्य मला मिळालं. भाऊसाहेबचे ऐंशी वर्षाचे आजोबा या वयातही आलेले. पिक्चर सुटल्यावर आजोबा प्रेक्षकांच्या गर्दीत असलेल्या नातवाजवळ आले. त्याच्या गालावरून हात फिरवला. ही थोर शाबासकी आणि थोर पुरस्कार….

भाऊराव कऱ्हाडे यांचा ‘ख्याडा’नंतरचा बबन सगळीकडं हाऊसपुल्ल सुरू आहे. शो सुरू असताना टाळया आणि शिट्ट्याचा पाऊस पडतोय. ग्रामीण भागात बबन जोरात सुरू आहे पण शहरातही ‘बबन’नं धुमाकूळ घातला आहे.

काल रात्री भाऊसाहेब शिंदेसोबत पुण्यातील एका हॉटेलमध्ये जेवण करत होतो. आम्ही आत बसलो होतो. वरून एका तरुणाने पाहिले. “अरे बबन….” असे म्हणत तो खाली आला. तोपर्यंत कोणाच्याही लक्षात आले नव्हते. तो आल्यावर सगळेच लोक भाऊजवळ आले. फोटो घेऊ लागले. काही काळ हॉटेलमध्ये गोंधळ झाला. हॉटेलचे मालक, वेटरही फोटो काढण्यासाठी आले. भाऊला सोडायला गाडीजवळ गेलो, तिथं कॉलेजची पोरं होती. त्यातील एक पोरगा लगेच ओळखून पुढं आला,”तुम्ही बबन आहात का? मी कालच बघितला. “भारी”… मग तिथंही त्या पोरांनी फोटो काढले.

गाडीत बसताना मी भाऊला म्हणालो, “तरी बरं रात्रीची वेळ आहे. दिवस असता तर ट्राफिकफुल्ल झाली असती. थिएटर हाऊसफुल्ल झाली आहेतच.”

भाऊसाहेब शिंदे खळखळून हसला. निरागसपणे…

-संपत मोरे, लेखक मुक्त पत्रकार आहेत