नाना फडणवीस… तू इतका कठोर कसा झालास?

स्थळ: बांद्रा हवेली…

गंभीर वातावरणात उधोजी राजे पाठीमागे हात बांधून येरझाऱ्या घालत होते, नुकत्याच झालेला अपमान त्यांच्या जिव्हारी लागला होता, अचानक ते थांबले, खिडकीतून बाहेर पहात (स्वगत) To be or not to be that is d question… धरावं की सोडावं हा एकच सवाल आहे. ह्या सत्तेच्या ऊकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगाव बेशरम लाचार आनंदानं? का फेकून द्यावं सत्तेचं लक्तर मिठीच्या काळाशार डोहामध्ये? आणि करावा शेवट सरकारचा एकाच प्रहाराने?माझा तुझा ह्याचा अन त्याचाही…. सत्तेच्या या महासर्पाने जीवनाला असा डंख मारावा… की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही… पण मग… पण मग त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं सत्तेचं तर….? तर…तर…इथेच मेख आहे. नव्या निवडणुका येऊ घातल्या तर सामोरे जायचा धीर होत नाही म्हणून आम्ही असं सहन करतोय रोज अवमान… सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने अभिमानावर होणारे बलात्कार… अस्तित्वाच्या सत्तेत असणाऱ्या युतीची विटंबना… आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं आमच्याच सरकारच्या दाराशी…  नाना… तू इतका कठोर का झालास?

“महाराज… महाराज… भानावर या काय बडबडताय”

“कोण?

मिलिंदा?

तू कधी आलास?”

“बराच वेळ कोपऱ्यात बसून तुमचं नटसम्राट बघत होतो”

“अपमान … अपमान केला रे आमचा”

“काय सांगता? कोणी केला? नाव सांगा, आत्ता लाथा घालून येतो”

“आमच्या समोर आमच्या दुश्मनाला भेटायला वेळ आहे, आणि आम्हाला अडीच तास … अडीच तास ताटकळत ठेवलं रे”

“शक्य आहे महाराज”

“मिलिंदा”(रागावून)

“तुम्ही रिकामटेकडे असाल, पण बाकी लोकांना कामधंदा असतो महाराज”

“मिलिंदा, काय बोलतोयस तू”

“माफी असावी महाराज, गंमत केली, पण कोणी तुमचा अपमान केला?”

“तेच ते आपले नाना फडणवीस”

“त्यांची एव्हढी हिम्मत?”

“आम्हाला भेटायला बोलावून, अडीच तास ताटकळत बसवले रे…, साधा चहा पण नाही दिला…, पण बिल हातात ठेवले”

“म्हणजे चहा दिला नाही म्हणून राग आला का? मी दोन कप पाजतो पण शांत व्हा”

“मिलिंदा, चहासाठी आम्ही रागावू हे वाटलंच कसं तुला?”

“मग?”

“अडीच तास, अडीच तास”

“अहो इथं घरी बसला काय आणि तिथं बसला काय ,सारखेच की, नाहीतर असेही तुम्ही बसूनच असता,

एव्हढं मनाला काय लावून घ्यायचं?”

“मिलिंदा पण आमच्या समोर त्या कोकणातल्या गद्दाराला भेटायला वेळ दिला, आणि आम्हाला …… श्श्या, आता सहन होत नाही हे”

“महाराज तुम्ही आत्ता आदेश द्या, लगेच लाथ मारतो”

“नाही, आता आपल्याला दुसरेच काहीतरी करायला लागेल”

मिलिंदा शर्टच्या आत लपवलेली सुरळी काढून समोर धरत “हे घ्या महाराज, राजीनामा”

“आता तू कशाचा राजीनामा देतोस?”

“माझा नाही, आपल्या मंत्र्यांचे राजीनामे आहेत.”

उधोजी चिंताग्रस्त होत… “आता यालाही घाबरत नाहीत रे ते”

“मग काय करायचं?”

“नानांच्या फोनची वाट पहायची, ते माफी मागून समजूत घालतीलच, तरच समाधान होईल बघ”

तेव्हढ्यात फोनची घंटा वाजली, आनंदाने मिलिंदा फोन उचलायला धावला….

 

लेखक- अमोल शिंदे, amolshinde25@gmail.com (नटसम्राटांची माफी मागून)