…ही लोकं बदलली आहेत हे त्यांच्या देहबोलीवरून लक्षात येतं!

साधारणपणे एक वर्ष झाले असेल. महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी संपूर्ण कर्जमाफीसाठी संघर्षयात्रा काढली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अन इतर लहान विरोधी पक्ष यामध्ये सहभागी झाले होते….

मी कोल्हापूर मध्ये Times Of India साठी बातमीदारी करत होतो. सकाळी सकाळी सर्व नेत्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. कडक इस्त्रीचा स्वच्छ पांढरा कुर्ता पायजमा, अव्वल गॉगल्स पायात काळे बूट, सँडल्स हातात साधारण रोलेक्स चे घडयाळ घातलेले नेते संघर्ष करायला निघाले होते. संघर्षबस ही वातानुकूलित असल्यामुळे नेत्यांचा नैसर्गिक रंग टिकून होता. दसरा चौकात भाषणे झाली. संपूर्ण मंत्रिमंडळ भाषण देत आहे असे वाटू लागले होते. धोरणात्मक विरोध करता येत नव्हता. तहहयात सत्तेत असल्यामुळे विरोध कसा करावा कळत नव्हतं. अजित पवार, माजी मुख्यमंत्री चव्हाण बाबा, अशोकराव चव्हाण हे भाषण करताना अनेकदा अडखळत होते. सभा कशीबशी संपवली आणि नेतेमंडळी वातानुकूलित बसमध्ये निघून गेले.

आज साधारणपणे राष्ट्रवादीचे नेते हल्लाबोलच्या निमित्ताने पुन्हा कोल्हापूरला आल्याचे फोटो पाहिले. आता मात्र बदल जाणवत होता. कंबरेवरचा भाग लोकं पाहून वाकत आहे. अख्ख्या मराठवाड्यात अन् विदर्भात चालून चालून चेहरे बदलेले आहे. कुर्ते चुरगळलेले दिसत होते. चेहऱ्यावरचे कृत्रिम तेज जाऊन त्याला मातीचा रंग प्राप्त झाला आहे. दुसऱ्या फळीतल्या या लोकांना भूगोलाचे आकलन झाल्याचे दिसून येत होते.

पृथ्वीराज चव्हाण यांचे दोन्ही जबडे आता नीट उघडायला लागले आहेत. सूचना न देता निवेदने देण्यासाठी हात सरसावत आहेत.

ही लोकं बदलली आहेत ते त्यांच्या देहबोलीवरून लक्षात येते. सत्ता गेल्यानंतर साधारण तीन वर्षांनी त्यांना आपण विरोधी पक्ष आहोत याची जाणीव झालेली असावी. देवेंद्र फडणवीस नामक मुख्यमंत्र्याने त्यांना पुन्हा संधी देऊ केली आहे, त्याचा लाभ उठवणे आता यांच्या हातात आहे.

लेखक- शेखर कल्याणी पायगुडे, shekhar.paigude91@gmail.com ( लेखक मुक्त पत्रकार आहेत )