पवारांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरणं म्हणजे मोदींना मदत केल्यासारखं…

नेहमीप्रमाणे लोकसभा निवडणुका जवळ येत असताना शरद पवार यांच्या पंतप्रधान होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत…. याबद्दल कोणत्याही अधिकृत बातम्या नसल्यामुळे अनेक तर्क वितर्क आणि अफवांना ऊत आला आहे… जर खरंच असं असेल तर त्याचा माझ्यासह प्रत्येक महाराष्ट्रीयन आणि मराठी माणसाला मनापासून आनंद होईल. परंतु सद्य परिस्थितीत या चर्चा मला चुकीच्या वाटतात. कधी कधी अशा अतिउत्साहीपणाचा संबंधित नेत्याला आणि पक्षालाही तोटा होऊ शकतो.

आज एकीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते राज्य सरकार आणि केंद्र सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन करुन जनतेत थेट मिसळून त्यांच्या आक्रोशाला वाट मोकळी करून देत आहे. असे असताना सोशल मीडियावर अशा आंदोलनाला त्याच प्रमाणात प्रमोट करण्यात समर्थक कमी पडत आहेत. इथे सगळ्यांना वेध लागले आहेत ते साहेबांच्या पंतप्रधानपदाचे… अशा अतिउत्साही समर्थकांनी पवारांच्या सर्व राजकीय चाली समजून घेण्याचा प्रयत्न करुन त्याप्रमाणे वागणे खुप महत्वाचे आहे.

सोशल मीडियामध्ये किती ताकद असते हे 2014 साली भाजपने सर्वांना दाखवून दिले. आज हाच सोशल मीडिया भाजपवर उलटला असताना त्यांच्या विरुद्ध रान पेटवायाचे सोडून लोक सध्या निरर्थक चर्चांमध्ये आपली ऊर्जा वाया घालवत आहेत. समजा सध्या जसं वातावरण आहे त्याप्रमाणे खरंच काँग्रेसने भाजपला नेस्तनाबूत करण्यासाठी पवारांना पुढे करायची चाल खेळलीच तर पवारांची लाट आपोआप तयार होऊ शकते. राज्यातल्याच नाही देशातल्या प्रमुख प्रादेशिक पक्षांशी शरद पवार यांचे चांगले संबंध आहेत. हे संबंध पाहता पवार एक मोठं आव्हान उभं करु शकतात… तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जमिनीवरील हल्लाबोल आंदोलनाप्रमाणे सोशल मीडियावरसुद्धा केंद्र आणि राज्य सरकारवर हल्ला चढवून पवार साहेबांच्या डावपेचांना मदत होईल, अशी वातावरण निर्मिती केली पाहिजे.

शरद पवार यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे, त्यामुळे एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात देशभरातील विरोधी पक्ष एकवटण्याची गरज असताना पवार सोडा पण कोणत्याही एका प्रादेशिक पक्षाच्या नेत्याने पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरणे म्हणजे अप्रत्यक्षपणे मोदींना मदत केल्यासारखेच आहे. याचे प्रमुख कारण मोदी आणि भाजपविरोधी मतांमध्ये फूट. गुजरातमध्ये राष्ट्रवादी आणि बसपाने काँग्रेसला मदत केली असती तर आज भाजपचा मुख्यमंत्री बसूच शकला नसता. अर्थात यातून सर्वात जास्त बोध घ्यायला लागणार आहे तो काँग्रेसला, इतर छोट्या पक्षांना योग्य सन्मान देऊन त्यांना आपल्याबाजूने वळवावे लागणार आहे.

सध्याच्या परिस्थितीत देशभरात भाजपला कोणी टक्कर देऊ शकत असेल तर तो पक्ष काँग्रेसच आहे. कारण तळागाळात मजबूत संगठन आणि गुजरात किंवा काही पोट निवडणुकांनंतर त्यांच्यात संचारलेला उत्साह. पवार समर्थकांना सध्या पवार पंतप्रधान होणं जास्त महत्वाचं वाटतं की मोदी त्या पदावरून पायउतार होणं? हे ठरवावं लागणार आहे. कारण काँग्रेसची संमती नसताना यातला पहिला पर्याय निवडला तर मोदी पुढची टर्म सुद्धा मारतील. पवार साहेबांचे डावपेच बघता महाराष्ट्रातला हा तेल लावलेला पहिलवान आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा डाव खेळायला सज्ज झालाय असंच वाटतं, हा डाव महराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचा आहे कारण पवारांनंतर अशी उडी घेऊ शकणारा नेता राज्यात नाही…

लेखक- संग्राम देशमुख ( लेखक ‘एज्यकेट टू ऑटोमेट’चे संचालक आहेत )