…आणि क्षणिक मोहापायी महाराष्ट्र एका साधू अन् राज्यमंत्र्याला मुकला!

दृढ निश्चय करुन सकाळी उठलो, आवरलं, आणि पिशवी भरायला घेतली.

बायको: कुठं निघालात?

आम्ही: हिमालयात

बायको: ट्रेकिंगला?

आम्ही: संन्यास घेतोय. (बायकोने आमच्या कपाळाला वगैरे हात लाऊन पाहिले, बहुतेक ताप चेक करत असावी)

बायको: आता हे काय मध्येच?

आम्ही: संन्यासी लोकांना सध्या चांगला स्कोप आहे. 2024 पर्यंत या अखंड महाराष्ट्राचा राज्यमंत्री…………

बायको: अहो, पण तो पर्यंत मार्केट राहील का संन्याशांच?

आम्ही: जो पर्यंत सुर्य-चंद्र…………

बायको: (किंचाळत) आणि हे काय? या तांब्याच्या तांब्याचे हे हाल कोणी केले?

(काल आम्ही गुपचुप तांब्याला दोन भोकं मारुन नायलॉनची दोरी बांधली होती.)

आम्ही: ते कमंडलु आहे.

बायको: (रागाने) आपल्या लग्नात मिळालेला तांब्या होता, माझ्या बाबांनी ………

आम्ही: हे बघ आता मोह, माया यापासुन दूर राहिले पाहिजे. आम्ही दोन वर्षाने परत येऊ, पण आपण 14 वर्ष तपश्चर्या केली असं लोकांना सांगायचं.

बायको: (ओरडत) कायपण काय? अजून लग्नाला दहा वर्ष झाली नाहीत.

आम्ही: गणित चुकतंय काय?

बायको: साफ चुकतंय.

आम्ही: ठिक, मग सात वर्ष दिवस रात्र घोर तपश्चर्या केली असे सांगू.

बायको: (त्राग्याने) काय करायचे ते करा, माझी मला कामे पडलीत.

(आम्ही आमचे उरकुन निघायच्या तयारीत,बायकोची परत एंट्री)

बायको: (किंचाळत) अहो काय घातलंय हे?

आम्ही: (निर्विकारपणे) भगवी वस्त्रं

बायको: कसली डोंबलाची वस्त्रं, माझा गाऊन आहे तो.

आम्ही: पण भगवाच आहे ना?

बायको: गप काढा तो.

(मधेच पोराची एंट्री, कापडी पिशवी घेऊन)

मुलगा: बाबा पैसे द्या.

आम्ही: कशाला?

मुलगा: मटण आणायचेय.

बायको: (आमचे पाकिट काढुन घेत) हे पाकिट आणि एटीएम इथंच ठेवा, याची गरज नसतेय संन्याशाला, (मुलाला उद्देशुन) हे घे पैसे.

मुलगा: बाबा तुमचं फायनल झालंय का?

आम्ही: काय बेटा?

मुलगा: हिमालयात जायचे.

आम्ही: कारे?

मुलगा: नाही म्हणजे जाणार असाल तर मटण आमच्या दोघांच्या पुरतेच आणायला. (मनात चलबिचल)

बायको: जा, दोघांसाठीच आण, यांचं डोकं फिरलंय.

(मुलगा चप्पल घालुन बाहेर पडणार, एवढ्यात)

आम्ही: थांब, हे बघ मांडीचं जास्त दे म्हणावं, आणि थोडे चॉप्स, चरबी जास्त टाकू नको म्हणावं, मागच्या वेळी…………

मुलगा: माहित आहे सगळं (आम्हाला दुर्लक्षित करुन बाहेर)

बायको: अहो इकडं या, जरा कांदा कापायला घ्या.

(सदर क्षणिक मोहापायी अखंड महाराष्ट्र एका हुशार आणि प्रामाणिक राज्यमंत्र्याला मुकला)

नुकताच कांदा कापून झाल्यावर अश्रुनयनांच्या साक्षीने पोस्ट टाईपली आहे.

लेखक- अमोल शिंदे, amolshinde25@gmail.com