सामनाच्या अग्रलेखाला राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्याचं प्रत्युत्तर

अजितदादांवर खालच्या थराला जाऊन टीका करणाऱ्यांनी आधी तुमच्या घरात कोण कोणापासून जन्माला आले आहे याचे इतिहास संशोधन करावे. फक्त सार्वजनिकच नव्हे तर न्यायालयीन चौकशीचा लज्जास्पद भाग ठरलेल्या या प्रकाराचं संशोधन करून नंतर ‘अवलाद’ या विषयावर निष्कर्ष काढण्याच्या भानगडीत पडावे.

कोट्या करण्याची ठाकरे परिवाराला आणि त्यांच्या बोरुबहाद्दर संपादक उंदराला भारी खोड आहे. आयुष्यात एकही निवडणूक लढवण्याचे धाडस न झालेल्या माजघरातील या ऐतखाऊ मांजरांना बारामतीच्या राजकारणावर तोंडसुख घ्यायचा फार नाद. गेली कित्येक दशकं मराठी जनतेला भावनिक आणा-भाका देऊन मातोश्रीच्या गोठ्यात बांधून ठरवलेली दुभती मुंबई महानगरपालिका पण आता कासरा सोडून पळ काढते आहे हे लक्षात आल्यावर रडीचा डाव रचला गेला आणि हे एेतखाऊ मांजर निघाले महाराष्ट्रावर भाष्य करायला.

भाजीपाला, धान्य, फळफळावळ आकाशात उगते की जमिनीत हे ज्यांच्या कित्येक पिढ्यांना ठावूक नाही, त्यांनी आधी शेतीचा अभ्यास सुरु केला असता तर ‘खान हवा की बाण हवा’ अशा लुच्च्या आणि बेअक्कल जाहीरनाम्यावर निवडणुका लढवायची वेळ आली नसती.

‘हल्लाबोल’सारखी राज्यव्यापी यात्रा काढणारी, जनतेच्या प्रश्नांसाठी ४०-४५ डिग्री उन्हातान्हात वणवण भटकणारी शेतकऱ्यांची पोरं आहेत. मातीतून उगवलेले आणि मातीत राहून मातीसाठीच संघर्ष करणारे बळीपुत्र आहेत. मातोश्रीच्या वातानुकुलीत गढीवरची भोंदू मढी नव्हेत.

अजितदादा यांचा उल्लेख आपण खोडसाळपणे ‘साप’ असा केला असला तरी साप हा शेतकऱ्यांचा मित्र असतो. शेतीतले माहित नसल्याने अशी फाजील बोरुबहादारी केली गेली. साप शेतकऱ्याच्या अन्न-धान्याची नासाडी करणाऱ्या, त्यांचे घर पोखरणाऱ्या तुमच्यासारख्या उपद्रवी उंदरांचा कर्दनकाळ असल्याने त्याला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात. ‘जय भवानी अन् टाक खंडणी’ असं वागून माया जमवलेल्यांना काय कर्तृत्व विचारणार आम्ही तरी???

अजितदादा यांनी उभ्या केलेल्या संस्था… सहकार, सिंचन, ऊर्जा आणि शिक्षण क्षेत्रातले योगदान त्यामुळे बऱ्यापैकी स्वावलंबी केलेला शेतकरी… तालुक्याच्या, जिल्ह्याच्या कॉलेजात शिकून शहरात नोकरी करणारी त्याची पुढची पिढी, हा आमचा जिता जागता विकास आहे. मनगटावर धागे-दोरे बांधून हातात दगड देत वयाचा पन्नाशीतही वडाप चालवायला लावून, काळी-पिवळी भरायला लावून, कुठे नाक्यावर वडापाव विकायची वेळ आणून मराठी माणसाच्या पिढ्याच्या पिढ्या बरबाद करत आपल्या पुढच्या पिढ्यांची सोय लावून ठेवलेल्यांना आत्मपरीक्षण करण्यास पुरेसा वाव आहे.

कष्टाळू बापाने अख्खा पक्ष पन्नाशीत पोचलेल्या निष्क्रीय ‘उद्धवस्त’ पोराच्या दावणीला बांधूनही त्याचे कर्तृत्व दिसेना म्हणून जाता जाता देखील जाहीर सभेत शिवसैनिकांकडून ‘माझ्या पोराला आणि नातवाला सांभाळून घ्या’ म्हणून वचन घेतले होते. हे आपण विसरलेले दिसताय संपादक महोदय… संपूर्ण संधी आणि पाठबळ देऊनही (राज ठाकरे आणि इतर जेष्ठ नेत्यांचे पाय छाटूनही) या वांड पोराची उंची काही वाढत नाही, हे लक्षात आल्यानेच स्वर्गवासी बाळासाहेबांना ही भावनिक साद घालावीशी वाटली असेल का? सत्तेत येणं, खुर्चीत बसनं यासाठी आधी कष्ट करावे लागतात. सातत्याने ती संधी मतदार संतुष्ट असल्याशिवाय देत नाहीत. आपली चव चाखून झाल्यावर लोकांची ‘भीक नको पण कुत्रं आवर’ (दिवसरात्र केकाटणारी कुत्री कोण हे सांगायची गरज आहे का?) अशी गत झालीय.

याही वेळेस परिस्थिती काही वेगळी नाही हे आमच्या मोर्चांना मिळणारा प्रतिसादच सांगतोय. ज्यांच्या ठेकेदारांच्या विमान आणि चॉपरने फक्त हवाई फोटोग्राफरच्या करमणुकीसाठीच महाराष्ट्रावर घिरट्या घातल्या, त्या गिधाडांना अजितदादा या स्वयंभू गरुडाची झेप धडकी भरवणारच… संपादकांनी वाचाळगिरी करावी पण आपली औकात ओळखून… सामनातून ठाकरी भाषेचा अविष्कार आपणच पिसारा फुलवून दाखवतोय, असं या डोमकावळ्याने मोराच्या थाटात समजू नये. फुललेला शाब्दिक पिसारा फक्त पुढूनच नव्हे तर जनता आता मागूनही बघायला शिकलेली आहे. तोच तुमचा खरा नजारा आणि औकात आहे!

लेखक- रविकांत वरपे ( लेखक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत.)

( लेखातील विचार लेखकाचे स्वतःचे आहेत. मालक/संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही )